मुंबई : कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने महाराष्ट्र शासन सतर्क झाले असून मास्क सक्ती पुन्हा लागू होण्याचे संकेत मिळत आहेत. टास्क फोर्सने तसा प्रस्ताव दिला असल्याचीही माहिती मिळत आहे.
विशेष उपद्रव न देता तिसरी लाट ओसरली परंतु पुन्हा चौथ्या लाटेची तलवार टांगती असताना देशात आणि राज्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. केंद्र सरकारने या आधीच महाराष्ट्रासह पाच राज्याचा अलर्ट केलेले असून पंचसूत्रीचे पालन करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्याआधीच राज्य शासनाने मास्क मुक्तीचा निर्णय घेतला होता आणि राज्यातील जनतेने मोकळा श्वास घेणे सुरु केले होते. गुढीपाडव्याच्या दिवसापासून कोरोनाचे सर्व निर्बंध हटविण्यात आले होते परंतु आता पुन्हा किमान मास्क वापरण्याची तरी सक्ती होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. (Possibility of compulsory mask in Maharashtra) राज्याच्या टास्क फोर्सची बैठक झाली असून मास्क वापरावाबाबत शासनास प्रस्ताव दिला असल्याचे समजते.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर आज दुपारी व्हिसीद्वारे पंतप्रधान आणि विविध राज्यातील मुख्यमंत्री यांच्यात एक बैठक होत असून या बैठकीत कोरोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. त्यानंतर संध्याकाळी ७ वाजता सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार आहेत. इतर राज्यात कोरोना अधिक प्रमाणात वाढू लागल्यामुळे महाराष्ट्र शासन आणि आरोग्य विभाग पुन्हा सतर्क झाला आहे. राज्यातील विविध भागात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर टास्क फोर्सची महत्वाची बैठक झाली आहे आणि या बैठकीत बंदिस्त ठिकाणी मास्क वापरणे सक्तीचे केले जावे अशी भूमिका घेण्यात आली आणि ती मुख्यमंत्री ठाकरे यांच्या समोर देखील मांडण्यात आल्याचे वृत्त आहे.
अद्याप निर्णय नाही !
राज्यात कोरोना रुग्ण वाढत असले आणि टास्क फोर्सची बैठक झालेली असली तरी अद्याप राज्यात मास्क संदर्भात कोणताही निर्णय मात्र झालेला नाही. मॉल्स, नाट्यगृह, चित्रपटगृह अशा ठिकाणी मास्क सक्तीची शिफारस करण्यात आल्याची माहिती असून मुख्यमंत्री काय निर्णय घेतात यावर हे अवलंबून आहे.
केंद्राच्या सूचना
केंद्र शासनाने या आधीच राज्य शासनाला सतर्क केले आहे आणि मास्क वापरणे, सामाजिक अंतर ठेवणे अशा काही बाबींची अंमलबजावणी करावी अशा सूचना दिलेल्या होत्या पण राज्याचे आरोग्य मंत्री यांनी राज्यात सद्या तरी मास्क वापराची आवश्यकता नसल्याचे म्हटले होते. आता टास्क फोर्स ने प्रस्ताव दिल्यास राज्यात पुन्हा किमान बंदिस्त ठिकाणी तरी मास्क सक्ती लागू होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
हे वाचले का ?
खालील बातमीला टच करा !