BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जुलै, २०२३

पंढरीच्या विठ्ठल मंदिरात भक्ती आणि दातृत्व यांचा सुरेख संगम !



 पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात भक्ती आणि दातृत्व यांचा आगळावेगळा संगम पहायला मिळाला असून मिळालेल्या पेंशनच्या रकमेतून एका वृध्द भाविकाने लाडक्या विठुरायाला एक सुवर्णहार अर्पण केला आहे.


भक्तीची शक्ती कुठल्याही शक्तीपेक्षा मोठी असते हे अनेकदा सिध्द झाले आहे. हल्ली पैशाला सर्वाधिक मोल आले आहे, या पैशापुढे माणूस माणुसकीलाही पारखा होत आहे, संपत्तीपुढे नातीगोतीही क्षीण झाली आहेत. मुलगा आई वडिलांच्या जिवावर उठत आहे. पण जेंव्हा भक्तीची शक्ती जागृत होते तेंव्हा सोने नाण्याची चमक देखील फिकी होते. पंढरीच्या पांडुरंगाला गरीबाचा देव म्हणून ओळखला जातो. विठ्ठल भक्त गरीब असला तरी त्याच्याएवढी मनाची श्रीमंती भल्याभल्यांकडे नाही हे देखील वारंवार अनुभवाला येत असते. केरसुणी विकून कसेबसे पोट भरणारी महिला देखील विठूमाऊलीच्या चरणी एक लाखाचे दान देते यापेक्षा अन्य उदाहरण काय असू शकते ! नेहमीच सामान्य वर्गातील गरीब भाविक विठूमाऊलीच्या चरणी मोठे दान करीत असतो. या दानापेक्षाही अधिक मोठे त्याचे मन आणि दातृत्व असते.


असंच मोठं मन आणि दातृत्व असलेल्या  एका वृध्द भाविकाने आपल्या पेन्शनच्या रकमेतून विठूमाऊलीच्या चरणी एक सुवर्णहार अर्पण केला आहे. पंचवटी नाशिक येथील औदुंबरनगर येथे राहणाऱ्या ९१ वर्षीय, नामदेव श्रावण पाटील यांनी वनविभागातून सेवानिवृत्त झाल्यानंतर पेन्शनची मोठी रक्कम मिळाली. या मिळालेल्या रकमेतून नाशिकच्या एका भाविकाने पंढरपुरच्या विठ्ठलास १०५ ग्रॅम वजनाचा सोन्याचा सुंदर नक्षीकाम केलेला टेम्पल हार अर्पण केला.


भाविक नामदेव श्रावण पाटील हे वनविभागात नोकरीस होते.  त्यांना सेवानिवृत्तीनंतर मिळालेल्या पेन्शनमधून त्यांनी सोन्याचा 'टेम्पल हार' विठ्ठलास अर्पण केला. (Pandharpur Vitthal devotee gave gold necklace ) या भाविकाचा श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिर समितीकडून कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. पाटील यांनी भेट दिलेला हा सुवर्णहार विठूमाऊलीच्या गळ्यात घालण्यात आला तेंव्हा तर हा हार अधिकच खुलून दिसत होता. भक्तीच्या शक्तीला आणि मोठ्या मनाच्या दातृत्वाला तोड नाही हेच खरे ! 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !