यवतमाळ : काही क्षणात तरुण मुलीचा नरबळी दिला जाणार होता, सगळी तयारी झाली होती आणि आता 'ते' काम करणार तेवढ्यात पोलिसच तेथे पोहोचले आणि महाविद्यालयीन तरुणीचा जीव अगदी अखेरच्या क्षणी वाचला.
विज्ञान युगात देखील अंधश्रद्धेच्या आहारी जावून नको ते पाऊल उचलणारे अनेकजण आजही या समाजात वावरत आहेत आणि भोंदूबुवा आपली घरे भरीत आहेत. खेडोपाडी आणि शहरात देखील अंधश्रद्धेच्या अनेक घटना घडत असतात. अंधश्रद्धा विरोधी कायदा अस्तित्वात असूनही हे प्रकार घडतात. भूत प्रेत, चेटकीण अशा घटना तर सर्रास असतात पण गुप्तधनाच्या आशेने पोटाच्या मुलाचा बळी द्यायलाही कमी केले जात नाही. यवतमाळच्या बाभूळगाव येथे देखील राक्षसी वृत्तीच्या बापाने आपल्याच तरुण मुलीचा नरबळी देवून गुप्तधन मिळविण्याचा प्रयत्न केला पण मुलीच्या प्रसंगावधानाने ती अगदी अखेरच्या क्षणी वाचल्याची घटना समोर आली आहे.
बाभूळगाव तालुक्यातील मादणी गावातील एका अधम बापानेच गुप्तधनासाठी आपल्या मुलीचा बळी देण्याचे कारस्थान रचले. आपल्या घराच्या मागच्या खोलीत गुप्तधन असल्याबाबत हा अधम बाप नेहमी बोलत असायचा. अखेर त्याने एका मांत्रिकाला पाचारण केले. त्यानेही ती खोली पाहून गुप्तधन असल्याचे सांगत नरबळी द्यावा लागेल असे सांगितले. काहीसा विचार करून लगेच त्याने नरबळी देण्यास होकार दिला. मागच्या खोलीत लगेच एक खड्डा खोदण्यात आला आणि पूजा देखील मांडण्यात आली. मध्यरात्री हा वेगळाच प्रकार घरात सुरु झाला होता.
मांत्रिकाशी चाललेली चर्चा आणि ठरत असलेले कारस्थान सदर तरुण मुलगी दरवाजाच्या फटीतून पहात ऐकत होती. जेंव्हा आपलाच बळी दिला जाणार आहे हे त्यांच्या चर्चेतून समजले तेंव्हा मात्र तिच्या अंगाचा थरकाप झाला. अर्ध्या रात्री तिच्या मदतीला कुणीच नव्हते आणि तिच्या बापाने या कृत्यास मदत करण्यासाठी काही लोक बोलावून घेतले होते . अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत देखील या मुलीने आपल्या वडिलाचे मांत्रिकाशी चाललेले बोलणे फटीतून मोबाईलवर चित्रित केले. खोदलेल्या खड्यांचे, मांडलेल्या पूजेचे फोटो काढले आणि ते आपल्या यवतमाळ येथील एका मित्राला पाठवून दिले. आपण मोठ्या संकटात असून तातडीने मदतीची मागणी देखील या मुलीने आपल्या मित्राला केली.
मुलीचा बळी देणार एवढ्यात --
दरम्यान नरबळी देण्याची सगळी तयारी पूर्ण झाली होती. आता एक बाप आपल्याच तरुण मुलीचा बळी देणार होता आणि नेमक्या याच क्षणी पोलीस तेथे हजर झाले. चित्रपटात शोभावी अशी घटना प्रत्यक्षात घडत होती. पोलीस तेथे आल्यानंतर खोदलेला खड्डा, पूजेचे साहित्य, फुलांचा हार, फावडे, पाटी असे सगळे साहित्य जागेवर दिसले. तातडीने पोलिसांनी मांत्रिकासह ९ जणांच्या मुसक्या आवळल्या ! मुलीच्या मित्राने अत्यंत घाई करून सगळा प्रकार पोलिसांपर्यंत पोहोचविला होता त्यामुळे मुलीचा जीव वाचला होता.
पोलिसांनी ठोकल्या बेड्या !
पोलिसांनी कारवाई करीत राक्षस पिता, मांत्रिक आणि त्यांना मदत करणारे लोक यांना बेड्या ठोकल्या. जयंत धकाते, विजय शेषराव बावणे, रमेश गुंडेकर, वाल्मिक वानखेडे, विनोद चुनाकर, दीपक श्रीरामे, आकाश धनकसार याच्यासह राळेगाव येथील दोन महिलावर गुन्हे दाखल करून त्यांच्या हातात बेड्या ठोकल्या.
सुट्टीसाठी आली होती मुलगी
सदर पिडीत मुलगी ही सुट्टी लागल्यामुळे घरी आली होती. औरंगाबाद येथील एका महाविद्यालयात ती बी. फॉर्मसी च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. तिने प्रसंगावधान (Attempt by father to sacrifice daughter) राखून मित्राची मदत घेतल्यामुळे पोलिसांपर्यंत माहिती पोहोचली आणि पोलीस अवघ्या वीस मिनिटात घटनास्थळी पोहोचले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !