BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ एप्रि, २०२२

विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा !



पंढरपूर : विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर असतानाच चेअरमन भगीरथ भालके आणि प्रभारी कार्यकारी संचालक यांच्यासह चौघांच्या विरोधात पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याने पंढरपूर तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 


विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तोंडावर आहे त्यात राष्ट्रवादी अंतर्गत गटबाजी कायम आहे आणि अशा परिस्थिती चेअरमन भगीरथ भालके (Bhagirath Bhalake) आणि अन्य काही जणांवर आर्थिक  बाबतीत फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे,  न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर कारखान्याचा पेट्रोल डीझेल पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी भैरवनाथ पेट्रोलियम सरकोली येथून विठ्ठल कारखान्यासाठी डीझेल आणि पेट्रोल खरेदी करून ८ लाख ३६ हजार ५३ रुपयांचा अपहार झाल्याचा आरोप करीत रोपळे येथील विलास शिवाजी पाटील यांनी पंढरपूर येथील प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी यांच्या न्यायालयात याचिका दाखल केली होती. 


विलास पाटील यांच्या याचिकेवर सुनावणी होऊन न्यायालयाने पंढरपूर तालुका पोलीसाना गुन्हा दाखल करून  तपास करण्याचा आदेश आज दिला. या आदेशानुसार पंढरपूर तालुका पोलिसांनी विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन भगीरथ भालके, बी.पी, करपे यांच्यासह सरकोली येथील भैरवनाथ पेट्रोलियम सरकोलीचे मालक आणि व्यवस्थापक यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल केला गेला आहे. भारतीय दंड विधान कलम ४२०, १०२ ब, ४०६, ४०९, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ४७७ अ, ३४ अशा कलमानुसार हा गुन्हा (Fraud case against Bhagirath Bhalke, chairman of Vitthal factory) दाखल करण्यात आला आहे. 


विठ्ठल कारखान्याचा पंप असताना गैरव्यवहार करता यावा यासाठी सरकोली येथील भैरवनाथ पेट्रोल पंप येथून कारखान्यासाठी लागणारे पेट्रोल डिझेल खरेदी केले. कारखान्याचे सभासद यांचे हित विचारात न घेता आणि भैरवनाथ पंपाकडून इंधन न घेताही कारखान्याची बिले काढण्यात आली अशी पाटील यांची तक्रार आहे ! 



चौकशी झाली पाहिजे - भालके 
सदर प्रकरणी चौकशी होण्याची गरज आहे. पाच वर्षांपुवीचे हे प्रकरण असून कारखान्याचा पंप हा व्यावसायिक आहे त्यामुळे केंद्र शासनाच्या नियमाप्रमाणे येथील दर जास्त आहेत. त्यामुळेच ठराव करून खाजगी पंपावरून डीझेल खरेदी करण्यात आले आहे असे भगीरथ भालके यांबी  म्हटले आहे. भैरवनाथ पेट्रोल पंपाने ना नफा ना तोटा या धर्तीवर इंधन दिलेले आहे. यात कसलाही  भ्रष्टाचार झालेला नसून चौकशीतून सत्य समोर येणार आहेच, केवळ बदनामीचा हा उद्योग असून काही दिवसापूर्वी साखरेबाबत देखील असेच आरोप केले गेले होते त्याचे काय झाले असा सवाल भालके यांनी विचारला आहे. 


हे देखील वाचा : (क्लिक करा ) 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !