BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२७ सप्टें, २०२२

कुऱ्हाडीने खून, न्यायालयाने सुनावली मरेपर्यंत जन्मठेप !



शोध न्यूज : एका महिलेचा कुऱ्हाडीने खून केल्याच्या आरोपाखाली पंढरपूर येथील सत्र न्यायालयाने आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.


केवळ चिलारीचे सामाईक असलेले झाड तोडण्याच्या कारणावरून कुऱ्हाडीने घाव घालून एका महिलेचा जीव घेण्यात आला होता तर या महिलेच्या मुलालाही ठार मारण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सांगोला तालुक्यातील वाटंबरे येथील शेरे वस्तीवर २६ मार्च २०१७ रोजी ही धक्कादायक घटना घडली होती.  महेश पवार त्याचे वडील मारुती पवार, आई कुसुम पवार हे सामाईक असलेले चिलारीचे झाड तोडत होते. विमल शंकर पवार आणि त्यांचा मुलगा शरद पवार यांनी त्यांना हटकले. सामाईक असलेले झाड कशासाठी तोडत आहात अशी विचारणा केली. यातूनच वादाला सुरुवात झाली आणि आरोपींनी हातातील कुऱ्हाडीचा घाव विमल शंकर पवार यांच्यावर घातला. यात विमल पवार या रक्तबंबाळ झाल्या. त्याचा मुलगा शरद यालाही मारहाण करण्यात आली आणि जीवे ठार मारण्याची धमकी या आरोपींनी दिली.


कुऱ्हाडीच्या वारामुळे विमल पवार यांचा मृत्यू झाला आणि सांगोला पोलिसांनी  महेश पवार त्याचे वडील मारुती पवार, आई कुसुम पवार यांच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२, ३०७ सह अन्य कलमानुसार गुन्हा दाखल केला होता. या खटल्याची सुनावणी पंढरपूर येथील सत्र न्यायालयात होऊन न्यायालयाने आरोपी महेश पवार यास दोषी धरले. महेश मारुती पवार याला त्याच्या जीवनाचा नैसर्गिक अंत होईपर्यंत सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.  वास्तविक या खटल्याचा निकाल २२ एप्रिल २०२१ रोजीच न्यायालयाने दिला होता आणि तीनही आरोपींना दोषी धरून शिक्षा सुनावली होती. आरोपी महेश पवार यास आजन्म कारावासाची शिक्षा तर आरोपी मारुती पवार आणि कुसुम पवार यांना पाचशे रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने दिली होती. 


पंढरपूर सत्र न्यायालयाने ही शिक्षा दिल्यानंतर आरोपी महेश पवार याने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते आणि वैद्यकीय अधिकाऱ्यांचा उलट तपास घेतला नाही, बचावाचे साक्षीदार तपासण्याचे संधी दिली नाही असे मुद्दे उपस्थित करीत हे अपील दाखल केले होते.  मुंबई उच्च न्यायालयाने वैद्यकीय अधिकारी यांचा उलट तपास घेऊन बचाव साक्षीदार तपासण्याची संधी देऊन सदर प्रकरणाबाबत दोन महिन्यात  निर्णय घेण्याचे आदेश पंढरपुर न्यायालसास दिले होते. त्यानुसार सदर  प्रकरणाची पंढरपूर सत्र न्यायालयात पुन्हा सुनावणी झाली. या सुनावणीत आरोपीतर्फे डॉक्टर गणेश कुमार सातपुते यांचा उलट तपास घेण्यात आला तर बचावाचा साक्षीदार घेण्यार नसल्याचे न्यायालयात सांगण्यात आले.

 

पंढरपूर सत्र न्यायालयाने दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून आरोपी महेश मारुती पवार यास भारतीय दंड विधान कलम ३०२ सह अन्य कलमान्वये दोषी धरण्यात आले आणि आजन्म कारावासासह दहा हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली. (Murder with an axe, life imprisonment till death) भारतीय दंड विधान कलम ३०७ नुसार  सात वर्ष सक्षम कारावास आणि साडे सात हजार रुपयांचा दंड,  कलम ५०६ नुसार दोन वर्ष सश्रम कारावास आणि दीड हजार रुपये दंड, कलम २०१ नुसार एक वर्ष सश्रम कारावास आणि  एक हजार रुपयांचा दंड अशी शिक्षा सुनावली असून या सर्व शिक्षा एकत्रित भोगायच्या आहेत. दंडाच्या रकमेतील वीस हजार रुपये मयत विमल पवार यांच्या वारसांना नुकसान भरपाई म्हणून दिले जावेत असा आदेश पंढरपूर सत्र न्यायालयाने दिला आहे. सदर खटल्यात एकूण अकरा साक्षीदार तपासण्यात आले.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !