BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० नोव्हें, २०२३

सोलापूर जिल्ह्यात धाडींचा मोठा धडाका !

 


शोध न्यूज : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात जोरदार धाडी टाकल्या असून, मिठाईचे नमुने तर घेण्यात आलेच  पण मोठ्या प्रमाणात मिठाईचा साठा जप्त देखील करण्यात आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील विविध तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे.


अन्न पदार्थात भेसळ होणे ही काही नवी बाब नाही, त्यात सणावाराच्या कालावधीत तर हे प्रकार सगळीकडेच वाढीस लागतात, अशा वेळी अन्न आणि औषध प्रशासनाचीही जबाबदारी वाढत असते. दिवाळीच्या आधीपासून बाजारात अनेक भेसळयुक्त पदार्थ आणि मिठाई मोठ्या प्रमाणात येत असते. या सगळ्यांवरच कारवाई होते असे नाही पण काही कारवाईचा धसका तरी व्यापाऱ्यांना बसतो. पाणी मारून वजन वाढविण्याचे प्रकार देखील अधिक प्रमाणात दुकानात दिसून येतात. किराणा दुकान, काही ठराविक छोटे मॉल अशा ठिकाणी हे प्रकार दिसून येत आहेत. पंढरपूर येथे देखील अनेक दुकानातून पाणी मारून वजन वाढवलेली हरभरा डाळ, शेंगदाणे ग्राहकांच्या माथी मारले जातात. सर्रास दुकानातून हेच प्रकार होत असल्याने ग्राहकांना पर्याय उरत नाही. पाणी मारलेले असल्यामुळे वजनात वाढ होते आणि ग्राहकांना जादा रक्कम देवूनही कमी माल खरेदी करावा लागतो, अशा बाबीवर देखील कारवाई होण्याची मागणी होऊ लागली आहे. 


सोलापूर अन्न आणि औषध प्रशासनाने एक आठवडाभर जिल्ह्याच्या विविध भागात धाडी टाकून तपासणी केली आहे. यात ११३ धाडींचा समावेश आहे. या कारवाईत  दुधाचे ५५ नमुने तर दुग्धजन्य पदार्थांचे १८ नमुने, तेल व वनस्पती तेलाचे  ५ नमुने, रवा, मैदा, आटा आणि  इतर असे एकूण २२ नमुने तसेच तुप, खवा, पनीर या अन्न पदार्थाचे एकूण ११ नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत, मोहोळ, माळशिरस, माढा या तालुक्यात ही कारवाई करण्यात आली आहे. मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे बॉम्बे स्वीट मार्ट व बेकरी या ठिकाणी धाड टाकण्यात आली आणि चाळीस किलो स्पेशल बर्फी आणि जवळपास दहा हजार रुपयांचा साठा जप्त करण्यात आला, (Food and Drug Administration raid in Solapur district) भवानी पेठेतील एक ठिकाणी छापा टाकून ६८ किलो स्पेशल बर्फी जप्त करण्यात आली. या स्पेशल बर्फीची किंमत जवळपास १७ हजार रुपये आहे. 


माढा तालुक्यातील टेंभुर्णी येथे देखील अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली असून,  टेंभुर्णी येथील 'ध्रुव एजन्सी' याठिकाणी धाड टाकून दूध भेसळीसाठी वापरण्यात येणाऱ्या विविध कंपन्यांचे पावडर एकूण १ हजार ८१३ किलो सुमारे १ लाख ५९ हजार ६४० किमतीचा साठा जप्त करण्यात आला.येथे भगवान राम पालिवाल या पेढीवर धाड टाकून, २५ हजार ७५० रुपयाचा स्पेशल बर्फीचा  १०३ किलो साठा जप्त करण्यात आलेला आहे तर माळशिरस तालुक्यातील कोंढारपट्टा येथील शौर्य गूळ उद्योगावर धाड टाकून तपासणी करण्यात आली. यावेळी ३५ हजार १२५ रुपये किंमत असलेला गूळ आणि साखरेचा साठा जप्त केला गेला आहे. या धाडसत्राने भेसळखोर हादरले असले तरी, आणि ग्राहकांत समाधान असले तरी देखील, ही कारवाई एवढ्यावरच थांबू नये अशी मागणी होत आहे. प्रत्येक तालुक्यातील मोठी दुकाने तपासली जावीत, केवळ कागदावर दाखविण्यासाठीची कारवाई करून या विभागाने थांबू नये अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !