BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२३

आजपासून राज्यात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे 'आपला दवाखाना' सुरु !


शोध न्यूज : आज महाराष्ट्र दिनापासून राज्यात विविध ठिकाणी 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु होत असून सोलापूर जिल्ह्यातील आठ ठिकाणी हा मोफत दवाखाना कार्यान्वित करण्यात आला आहे. यामुळे गरीब, सामान्य रुग्णांना मोफत सेवा मिळणार आहे. 


महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, नागरिक आरोग्यवर्धिनी आरोग्य केंद्र, १५ वा वित्त आयोग अंतर्गत स्थापित करण्यात आलेल्या, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, राज्यभरात आज सोमवार, १ मे २०२३ पासून कार्यान्वित होत आहेत. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील आठ तालुक्यांचा समावेश आहे. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्गदर्शक सूचनांनुसार योग्य त्या उपाययोजना करण्यात करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. सोनिया बागडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील यांनी दिली.नगरपालिका अथवा  भाड्याच्या इमारतीत हे दवाखाने सुरु राहणार आहेत. यात ओपीडी स्वरूपात सेवा देण्यात येणार आहे. या योजनेद्वारे मोफत वैद्यकीय तपासणी, औषध उपचार, किरकोळ जखमावर मलमपट्टी यांसह रक्त चाचणीची सेवा, मोफत स्वरुपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय एक्स-रे, सोनोग्राफी यांसारख्या चाचण्या पॅनलवरील डायग्नोस्टिक केंद्राद्वारे स्वस्त दरात उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. सोलापूर जिल्ह्यात आठ ठिकाणी 'आपला दवाखाना' सुरु होत असून याचा लाभ रुग्णांना मिळणार आहे. 


अक्कलकोट नगरपरिषद, नगरपालिका मराठी शाळा माणिक पेठ, अक्कलकोट, बार्शी नगरपरिषद लोढा प्लॉट, बार्शी. कुर्डुवाडी नगरपरिषद नागरिक आरोग्य केंद्र, कुर्डुवाडी. माळशिरस नगरपंचायत नगरपंचायत इमारती आवार, माळशिरस, मंगळवेढा नगरपरिषद योग भवन नाका, मंगळवेढा. मोहोळनगरपरिषद दत्त मंगल हॉल, मोहोळ, पंढरपूर नगरपरिषद क्लॉक रूम सांगोला नाका, पंढरपूर. सांगोला नगरपरिषद जि. प. शाळा चांदोलीवाडी, सांगोला या ठिकाणी आपला दवाखाना आजपासून कार्यान्वित होत आहे.


या दवाखान्यात  विशेष तज्ज्ञांच्या सेवा देखील उपलब्ध होतील. बाह्य रुग्णसेवा, टेली कन्सल्टीशन, गर्भवती माताची तपासणी, लसीकरण आदी सेवाही देण्यात येणार आहेत. महिन्यातून निश्चित दिवशी नेत्र तपासणी, बाह्य यंत्रणेद्वारे रक्त तपासणीची सोय, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन सेवा, आवश्यकतेनुसार, विशेषतः संदर्भ सेवा, योगा व व्यायामबाबतीचे प्रात्यक्षिक देखील करण्यात येणार आहे. आपापल्या तालुक्यात सुरू होणाऱ्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखान्यात देण्यात येणाऱ्या मोफत आरोग्यविषयक सेवांच्या लाभ घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. (Hindu Heart Emperor Balasaheb Thackeray  'Apala Dawakhana') गरीब आणि सामान्य रुग्णांना याचा योग्य लाभ मिळणे मात्र अपेक्षित आहे. 


ठिकठिकाणी आपला दवाखाना सुरु होत असला तरी, रुग्णांना प्रत्यक्षात कशी सेवा मिळतेय यावर मात्र या दवाखान्याचे यश अवलंबून असणार आहे. शासकीय रुग्णालये आजही कार्यान्वित आहेत परंतु, या रुग्णालयात कशा प्रकारे रुग्ण सेवा होते, याची माहिती सर्वांनाच आहे. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आणि ग्रामीण भागात देखील आजही शासकीय रुग्णालये कार्यान्वित आहेत. या रुग्णालयांचे अनुभव फारसे चांगले नाहीत. मोफत उपचार असताना देखील अशा रुग्णालयाच्या पायऱ्या चढायला लोक अनुत्सुक असतात. येथील अनास्थेमुळे गरीब लोक देखील, कर्ज काढून खाजगी रुग्णालयात जाणे पसंत करतात. आपल्या दवाखान्याचीही अवस्था अशी होऊ नये एवढीच सामान्य रुग्णांची अपेक्षा असणार आहे. 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !