BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० जाने, २०२२

बंद ! सोलापूर जिल्ह्यातील शाळांना पुन्हा एकदा कुलूप !


सोलापूर : आज सोमवारपासून सोलापूर जिल्ह्यातील शाळांना कुलूप लावण्यात आले असून सद्यातरी १५ फेब्रुवारीपर्यंत या शाळा बंदच राहणार आहेत. 


कोरोना आणि ओमीक्रॉनचा प्रभाव राज्यात वाढीस लागला असताना राज्य शासन सतर्क झाले आहे आणि एकेक निर्बंध लागून करणे सुरु करण्यात आले आहे. तिसऱ्या लाटेचा वेग हा प्रचंड असल्यामुळे रोजच्या आढळणाऱ्या पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या अत्यंत वेगाने वाढू लागली आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा अलीकडेच सुरु झाल्या होत्या आणि विद्यार्थी, पालक यांना दिलासा लाभला होता. अजून शाळांची घडी व्यवस्थित बसायची होती तोच तिसऱ्या लाटेने पुन्हा ही घडी विस्कटून टाकली असून भविष्यात काय घडेल याचा नेमका अंदाज कुणालाही नाही. आज १० जानेवारीपासून सोलापूर जिल्हयातील पाचवी ते बारावीपर्यंतच्या सर्व शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले असून १५ फेब्रुवारी नंतर कोरोनाची परिस्थिती विचारात घेऊन शाळांचे दरवाजे उघडण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे. तोपर्यंत म्हणजे १५ फेब्रुवारी पर्यंत तरी या शाळा बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आलेला आहे. काल प्राप्त अहवालानुसार सोलापूर शहरात ५५ आणि ग्रामीण विभागात ६२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. ग्रामीणच्या ६२ रुग्णांत बार्शी तालुक्यात सर्वाधिक २३ रुग्ण आहेत. अक्कलकोट - ३, करमाळा - १, माढा - ११, माळशिरस - ९ मंगळवेढा- २ उत्तर सोलापूर- १ पंढरपूर- ४, दक्षिण सोलापूर -६ आणि पंढरपूर - ४ अशा रुग्णांचा सामावेसा आहे. 


मुंबई पुण्यात कोरोनाने उद्रेक  निर्माण केलेला आहेच पण सोलापूर जिल्ह्यातील रुग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. गेल्या नऊ दिवसात ४४० नव्या रुग्णांची भर पडली असून रोज हे आकडे वाढतच निघाले आहेत. या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्हा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. सोलापूर ग्रामीण आणि सोलापूर शहरासाठी हा निर्णय घेण्यात आलेला आहे.  सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या पहिली ते सातवी अशा २ हजार ७९६ शाळा आहेत आणि या शाळामंधून साडे तीन लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. जिल्ह्यात १ हजार ८७ शाळा या माध्यमिकच्या असून माध्यमिक शाळांमधून सव्वा चार लाख विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतलेला आहे. शाळा सुरु झाल्याने विद्यार्थ्यांनी सुटकेचा निश्वास टाकला होता. राज्यात अनेक भागात शिक्षक आणि विद्यार्थी कोरोनाबाधित झाले होते पण सोलापूर जिल्हयातील एकही शाळेत असा प्रकार अजूनतरी  समोर आला नाही. असे असले तरी रुग्णांची होत असलेली वाढ पाहता जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि महानगर पालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहर आणि जिल्ह्यातील शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सोमवार दि. १० जानेवारीपासून एकही विद्यार्थ्यांना शाळेत बोलावले जाऊ नये अशा स्पष्ट सूचना मुख्याध्यापक आणि शिक्षकांना केल्या आहेत. पुण्यात आणि मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढू लागताच तेथील शाळा या आधीच बंद करण्यात आल्या आहेत. आता हे कुलूप सोलापूर जिल्यातील शाळांनाही लागले आहे.


पहिली ते बारावी शाळा या शासनाच्या आदेशानुसार बंद होणार असल्या आणि विद्यार्थ्यांना शाळेत बोलावण्यात येऊ नये असे जरी आदेश असले तरी शिक्षकांना मात्र शाळेत यावे लागणार आहे. शिक्षकांची उपस्थिती शंभर टक्के असणार आहे आणि त्यांनी दीक्षा ऍप, इ लर्निंग ऍप, पारावरील शाळा, गृह भेटीतून विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरूच ठेवावे असते आदेश आहेत.

 

दहावी बारावी परीक्षा ?


दहावी आणि बारावी विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शिकवून अभ्यासक्रम पूर्ण करण्यात आलेला आहे. तोच अभ्यास पुन्हा ऑफलाईन शिकवला जात आहे पण कोरोनाच्या धोक्यामुळे हे वर्ग आता पूर्णपणे बंद ठेवले जाणार आहेत. १४ फेब्रुवारीपासून बारावीच्या तोंडी परीक्षा आणि २५ फेब्रुवारी पासून प्रात्यक्षिक परीक्षा घेण्याचे आधीचे नियोजन होते. ४ मार्च ते ७ एप्रिल दरम्यान बारावीची लेखी परीक्षा आणि १५ मार्च ते १८ एप्रिल दरम्यान दहावीची परीक्षा घेण्याचे निश्चित झालेले आहे पण कोरोनाची परिस्थिती काय असेल यावर या परीक्षा अवलंबून असणार आहेत.


दहावी आणि बारावीचे वर्ग एक दिवसाआड भरविण्याचे आदेश शिक्षण विभागाकडून काढण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाने पहिली ते नववीपर्यंतचे वर्ग ऑनलाईन सुरु ठेवावेत आणि दहावी बारावीचे वर्ग एक दिवसाआड भरविण्यात येतील अशी माहिती माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी दिली आहे 

  


राज्याची परिस्थिती बिकट


राज्यात कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचे तज्ञांनी सांगितले आहेच आणि त्याचे परिणाम समोरही येताना दिसत आहेत. ओमीक्रॉन रुग्णांची संख्याही आता वेगाने वाढू लागली आहे. काल एका दिवसात राज्यात ४४ हजार ३८८ नवे रुग्ण आढळून आले आहेत तर ओमीक्रॉनचे २०७ नवे रुग्ण आढळले आहेत. बारा रुग्णांचा मृत्यूही झाला आहे. 


राज्यातील सक्रिय रुग्णांचा संख्या २ लाख २ हजार २५९ एवढी असून कोरोनाची साथ सुरु झाल्यापासून राज्यातील १ लाख ४१ हजार ६३९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. ओमीक्रॉन रुग्णांची राज्यातील संख्या आता १ हजार २१६ वर पोहोचली आहे. रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ९४.९८ टक्के असून मृत्युदर २.०४ टक्के आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लाटेपेक्षा तिसऱ्या लाटेत बाधित होण्याचा वेग अधिक आहे त्यामुळे बाधितांचे आकडे मोठ्या फरकाने रोज वाढताना दिसत आहेत. 


वाचा : लाच घेताना प्रांताधिकारी आणि सरपंच रंगेहात !    


 




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !