शोध न्यूज : पंढरपूर येथील भीमा नदीवरील अहिल्या पुलावर पुन्हा एकदा अपघात झाला असून या अपघातात, एक दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे, या अपघातानंतर दोन्ही बाजूची वाहतूक कित्येक काळ ठप्प झाली होती त्यामुळे वाहनधारकांची अडचण झाली.
पंढरपूर येथील सरगम चौक ते अहिल्या पूल या दरम्यान सतत लहान मोठे अपघात होत असतात. जड वाहनांची वाहतूक होत असल्यामुळे अपघाताचे प्रमाण अधिक असल्याचे या आधीही दिसून आले आहे. आता पुन्हा काल गुरुवारी रात्री या पुलावर एक अपघात झाला आणि यात एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. मालट्रक आणि दुचाकी यांच्यात झालेल्या या अपघातात, दुचाकीस्वार तरुण मृत्युमुखी पडला आहे. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. पंढरपूर तालुक्यातील कोर्टी येथील दत्तात्रय बाळू वाघमारे (वय २८) हा तरुण बजाज पल्सर मोटार सायकलवरून (एम. एच. १३/ बी. एफ. ३५०६) पंढरपूरकडून भटुंबरे गावाकडे निघाला होता. यावेळी विरुद्ध दिशेने एक मालट्रक पंढरपूरकडे येत होता. यावेळी दुचाकी आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक झाली आणि ही घटना घडली.
भीमा नदीवरील अहिल्या पुलावर ही दोन्ही वाहने समोरासमोर आल्यानंतर ट्रकने दुचाकीला धडक दिली. ही धडक बसताच दत्तात्रय वाघमारे हे दुचाकीस्वार खाली पडले आणि ते थेट या ट्रकच्या चाकाखाली आले. ट्रकच्या टायरखालीच आल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची आठ वाजण्याची ही वेळ असल्याने या मार्गावर वाहतुकीची वर्दळ होती. दोन्ही बाजूनी वाहने ये जा करीत होती परंतु पुलावरच अपघाताची घटना घडली त्यामुळे दोन्ही बाजूची वाहतूक ठप्प झाली. (Accident on ahilya bridge Pandharpur, one killed) अपघातस्थळी बघ्यांनी गर्दी तर केलीच पण पुलावरील अपघातामुळे दोन्ही बाजूनी वाहने खोळंबून राहिली.
या अपघातामुळे रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या, अहिल्या पुलापासून सरगम चौकापर्यंत वाहनांची मोठी गर्दी झाली होती . सरगम चौकात देखील वाहने थांबलेली असल्यामुळे पंढरपूरकडून वाखरीकडे जाणारी वाहनेही अडकून पडली होती. अनेक वाहने पंढरपूर - कराड रस्त्याने वळवून, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय चौकाच्या दिशेने गेली. बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती. सरगम चौक ते अहिल्या पूल दरम्यान सतत अपघात होत असल्याने यावर कायमस्वरूपी तोडगा काढला जावा अशी मागणी यावेळी नागरिक आणि वाहनधारक करीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !