शोध न्यूज : अवघ्या बारा वर्षांच्या आपल्याच मुलीला नराधम बापाने आठ वेळा कला केंद्रात विकले असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे, पैशासाठी बापाने पवित्र नात्याचं अमानुष सौदा केल्याने संताप व्यक्त होत आहे.
लेकीचा बापावर जीव असतो, बापाच्या कुशीत लेक वाढत असते, मोठ्या लाडाने बाप आपल्या लेकीचा सांभाळ करून, तिचे हात पिवळे करून तिला सासरी पाठवत असतो. लग्न करून मुलगी सासरी निघाली की, सगळ्यात जास्त वेदना बापाला होत असतात. बाप लेकीचं नातं काही वेगळंच असतं पण सोलापूर जिल्ह्यातील एका बापानेच आपल्या गोंडस आणि अवघ्या बारा वर्षे वयाच्या लेकीला एकदा दोनदा नव्हे तर, तब्बल आठ वेळा वेगवेगळ्या कला केंद्रात विकून पैसे घेतले असल्याचा अत्यंत लाजीरवाणा आणि तितकाच संतापजनक प्रकार समोर आला आहे. बापाच्या या काळ्या कृत्याचा अखेर पर्दाफाश झाला असून या मुलीच्या आईच्या हृदयाला पाझर फुटला आणि तिने आपल्या लेकीसाठी थेट सोलापूर येथील जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात धाव घेतली. मुलीच्या आईमुळेच बापाचे काळे कारस्थान उघडकीस आले आहे.
करमाळा तालुक्यातील या नराधम बापाने आपल्याच बारा वर्षे वयाच्या मुलीला पुण्यातील कला केंद्रात चार वेळा विकले, सहा लाख रुपयांना मुलीची विक्री करून बापाने त्या पैशावर मजा मारली. एवढे करून तो थांबला नाही तर त्याने पुन्हा सोलापूरमधील चार कला केंद्राला अडीच लाख रुपयांना विकले. या मुलीच्या आईला मात्र हे सहन झाले नाही आणि तिने तडक पोलीस ठाणे गाठले. त्यानंतर ही धक्कादायक बाब उजेडात आली. पोलिसांनी या नराधम बापाच्या मुसक्या आवळल्या तेंव्हा त्याने कबुलीही दिली. कोरोनाच्या काळात सगळ्यांचेच व्यवसाय बंद होते, आर्थिक अडचणी उभ्या राहिल्या होत्या. याच काळात कर्ज झाले म्हणून आपण मुलीला विकले असल्याचा बहाणा या बापाने केला आहे. कर्ज झाले म्हणून तरी कुणी नात्याचा असा सौदा करीत नाही. परंतु या बापाचा हा बहाणा देखील पोलिसांपुढे चालू शकला नाही. पोलीस चौकशीत वेगळीच वस्तुस्थिती समोर आली आहे.
पोलिसांनी या मुलीच्या हरामखोर बापाला आणि मध्यस्थी असलेल्या एका महिलेला बेड्या ठोकल्या आहेत. अल्पवयीन असलेल्या या पिडीत मुलीची देखील सुटका पोलिसांनी केली असून या बालिकेस वैद्यकीय तपासणीसाठी सोलापूर सिव्हील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या नालायक बापाला एक गोंडस मुलगी झाली आणि त्यानंतर त्याच्या डोक्यात सैतान शिरला. मुलीचे कोडकौतुक करण्याऐवजी त्याच्या डोक्यात वेगळेच विचार घोळत राहिले, मुलीचे वय वाढत होते तसा याच्या सैतानी डोक्यातले काहूर वाढत चालले होते. मुलगी बारा वर्षांची होताच एकेका कला केंद्रात दीड दोन लाखांना व्यवहार करून त्याने चार कलाकेंद्रात मुलीची विक्री केली. ही रक्कम फिटेपर्यंत मुलगी त्या कलाकेंद्रात असायची. तिथले पैसे फिटले की पुन्हा बाप तिला दुसऱ्या कला केंद्रात विकायचा. या काळात या अल्पवयीन मुलीच्या शरीराचे लचके अनेक गिधाडे तोडत राहिली. अखेर आईचे काळीज पाझरले तेंव्हा कुठे या मुलीची सुटका झाली. असेही बाप या दुनियात असू शकतात यावर कुणाचा विश्वास बसणार नाही पण, करमाळा तालुक्यात अशा नालायक बापाचा चेहरा समोर आला आहे.
या घटनेबाबत पोलिसांनी सखोल तपास सुरु ठेवला आहे, या घटनेची माहिती समजली तेंव्हा ऐकणारेही थक्क झाले, बाप लेकीच्या नात्यातला गोडवा, पावित्र्य, स्नेह अशा सगळ्याच बाबींचा मुडदा या बापाने पाडला आहे. (A twelve-year-old girl was sold eight times by her father) त्यामुळे समाजातून देखील अत्यंत संतप्त अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.
.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !