BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३ सप्टें, २०२२

भूसंपादन घोटाळ्याचा आरोप, उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यवस्थ !




शोध न्यूज: भूसंपादनाचा कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप करीत उपोषणास बसलेल्या प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी यांची प्रकृती अत्यवस्थ झाली असून त्यांना रात्री सोलापूर रुग्णालयात हलविण्यात आले आहे. 


मंगळवेढा आणि सांगोला तालुक्यात भूसंपादन करताना सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यावर अन्याय झाल्याची तक्रार करीत प्रहार संघटनेच्या वतीने बेमुदत उपोषण सुरु करण्यात आले होते. रत्नागिरी- नागपूर या राष्ट्रीय महामार्गावरील दोन तालुक्यातील शेतकऱ्यांवर मोबदला देण्यात आणि अन्य प्रकारे गैरप्रकार झाल्याचा अत्यंत गंभीर आरोप प्रहर संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे. मंगळवेढा येथे  तब्बल २१ दिवसांपासून  प्रहार संघटनेने मंगळवेढा उपविभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरु केले आहे आणि न्याय मिळेपर्यंत माघार न घेण्यावर प्रहार संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते ठाम राहिले आहेत.

 

रत्नागिरी - नागपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ साठी सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यतील जमिनी संपादन करण्यात आल्या पण  शेतकऱ्यांना मोबदला मिळालेला नाही. ज्या काही शेतकऱ्यांना जमिनीचा मोबदला मिळाला त्या शेतकऱ्यांकडूनही मोबदला देण्यासाठी टक्केवारी घेतली गेली असून सांगोला आणि मंगळवेढा तालुक्यातील  भूसंपादन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अपहार झाला असल्याचा आरोप प्रहार संघटनेकडून करण्यात आला आहे. काही अधिकारी मंडळीनी हा प्रकार केला असून त्यांच्यावर कसलीही कारवाई होत नाही असा आरोप देखील आंदोलनकर्त्यांनी केला आहे. यामुळे बाधित शेतकऱ्यांवर मोठा अन्याय झाला आहे असे या संघटनेचे म्हणणे आहे.   


सदरचे प्रकरण मोठ्या घोटाळ्याचे असून काही गावातील पुढारी, एजंट आणि अधिकारी यांनी संगनमताने सरकारी असलेली जमीन खाजगी दाखवून मोबदला लाटला आहे परंतु याबाबत कसलीही कारवाई करण्यात येत नाही. संबंधित अधिकाऱ्यांना त्वरित निलंबित करून शेतकऱ्यांना मोबदला देण्यात यावा अशी मागणी या आंदोलकांची आहे.  मंगळवेढा तालुक्यातील आंधळगाव येथील जमीनीची भूमी अभिलेख कार्यालयाकडून अनधिकृत मोजणी करून तेथील शेतकऱ्याची दिशाभूल करण्यात आली आहे त्यामुळे उप विभागीय कार्यालयातील आणि भूमी अभिलेख कार्यालयातील संबंधित अधिकारी यांच्याविरुद्ध त्वरित कारवाई करण्यात यावी अशी मागणी आंदोलनकर्त्यांची आहे. यासाठी प्रहार अपंग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष सिद्राय्या माळी हे तब्बल २१ दिवसापासून  उपोषणाला बसलेले आहेत. या उपोषणाची अपेक्षित दखल मात्र घेण्यात आली नाही.


प्रहार संघटनेचे (Prahar Sanghatana) अध्यक्ष बच्चू कडू यांनीही या कार्यकर्त्यांची पुरेशी दखल घेतली नाही आणि प्रशासनाने कानाडोळा केला त्यामुळे हे उपोषण २१ दिवसांपासून सुरूच राहिले आहे आणि आता उपोषणकर्ते सिद्राया माळी यांची प्रकृती अत्यवस्थ बनली त्यामुळे त्यांना रात्रीच एका रुग्णवाहिकेतून सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळण्यासाठी आणि भूसंपादन प्रक्रियेतील गैरप्रकाराची चौकशी करून संबंधीतांवर कारवाई करण्यासाठी सुरु केलेले उपोषण २१ दिवस चालूच आहे याचे देखील आश्चर्य व्यक्त होत आहे. 


उपोषणाच्या २१ व्या दिवशी म्हणजे काल दुपारपासून सिद्राया माळी यांची प्रकृती ढासळू लागली होती आणि याबाबतची माहिती संघटनेचे तालुकाध्यक्ष समाधान हेंबाडे यांनी पोलिसांना दिली. पोलिसांकडून याबाबत वेळीच हालचाल करण्यात आली आणि त्यांनी ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर अधिकारी उपोषणस्थळी पोहोचले. उपोषणकर्ते माळी यांची प्रकृती पाहून त्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे ठरले परंतु रुग्णवाहिका उपलब्ध होत नव्हती. (The health of the hunger striker deteriorated, he was admitted to the hospital) पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी आपल्या गाडीतून घेवून जाण्याची तयारी दाखवली परंतु उपोषणकर्ते आपल्या मागणीवर ठाम राहिले. अखेर रात्री रुग्णवाहिकेची व्यवस्था होताच त्यांना सोलापूर येथे पुढील उपचारासाठी पाठविण्यात आले.  


यापूर्वीही झाली आंदोलने !

भूसंपादन प्रक्रियेत मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करीत यापूर्वी देखील आंदोलन झाले आहे, विशेष म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये प्रहार संघटना सहभागी होती आणि 'प्रहार' चे प्रमुख बच्चू कडू हे या सरकारमध्ये मंत्री होते. मंगळवेढ्यात प्रहार संघटनेनेच केलेल्या आंदोलनाकडे त्यावेळीही लक्ष दिले गेले नाही. त्यानंतर पुन्हा हे उपोषण सुरु झाले होते. याकडेही प्रशासनाने ठोस हालचाल न केल्याने उपोषणकर्त्याची प्रकृती अत्यवस्थ झाली आहे. 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !