शोध न्यूज :आली निवडणूक की उमेदवारी अर्ज भरणारे पंढरीतील 'हे' नेते म्हणजे पंढरीचे 'बिचुकले' आहेत अशा शब्दात विरोधकांची जोरदार खिल्ली आज सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी उडवली आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथील वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक आता एका महत्वाच्या टप्प्यावर येवून पोहोचली आहे. वसंतदादा काळे यांनी प्रचंड परिश्रम घेवून भाळवणीच्या माळरानावर सहकारी साखर कारखाना उभा केला. यावेळी त्यांना प्रचंड अडचणी आल्या होत्या पण सगळ्याच अडचणींवर मात करीत त्यांनी हा कारखाना उभा केला. काही झाले तरी मी कारखाना उभा केल्याशिवाय राहणार नाही म्हणत त्यांनी पाठपुरावा केला, प्रसंगी या पक्षातून त्या पक्षात गेले पण त्यांनी तालुक्याला दिलेला शब्द पूर्ण केला आणि तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते भाळवणीत हा साखर कारखाना उभा राहिला. आज मात्र त्याच साखर कारखान्याची खुर्ची मिळविण्यासाठी अनेकांच्या उड्या पडताना दिसत आहेत. त्यामुळे पहिल्यांदाच या कारखान्याची निवडणूक वाजत गाजत होऊ लागली आहे.
कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे यांनी चेअरमन पदावरून चांगले काम केले की नाही केले ? या प्रश्नांचे उत्तर आता काही दिवसात सभासदच देणार आहेत त्यामुळे तोपर्यंत वाट पहावी लागणार आहे. निवडणुकीतील त्यांचे विरोधक वारेमाप टीका आणि आरोप करीत आहेत पण हे सगळे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर होत असल्याने त्याकडे फारसे गंभीरपणे पाहण्याची गरज नाही. काही करून चंद्रभागा कारखाना ताब्यात घायचा असा चंग काही मंडळीनी बांधलेला दिसत आहे. अर्थात याचा निर्णय कारखान्याचे सभासदच मतदानातून घेणार आहेत. तोपर्यंत मात्र आरोप प्रत्यारोप, टीका टिपण्णी रंगात येवू लागल्या आहेत. अर्ज माघारी घेण्याची मुदत संपेल त्यानंतर तर या फैरी अधिकच आवाज करतील अशी शक्यता आहे. दरम्यान कल्याणराव काळे यांनी मात्र सुरुवातीपासूनच विरोधकांना नामोहरम करण्यास सुरुवात केली आहे.
विरोधक एका बाजूने प्रखर तयारी करीत असताना कल्याणराव काळे हे मात्र अत्यंत आत्मविश्वासाने सामोरे जाताना दिसत आहेतच पण त्यांनी पहिल्या दिवसांपासूनच आपला इरादा स्पष्ट केला आहे. विरोधकांच्या विरोधाला ते जुमानणार नाहीत हे त्यांनी सुरुवातीलाच स्पष्ट केले असून मोठ्या आत्मविश्वासाने त्यांनी ही लढत देण्यास सुरुवात केली आहे. विरोधकांना नामोहरम करण्याची एकही संधी ते सोडत नाहीत की कसली तडजोड करण्याच्या मनस्थितीत ते दिसत नाहीत. आज तर त्यांनी विरोधकांवर आरोप अथवा टीका करण्यापेक्षा त्यांची अत्यंत कमी शब्दात खिल्ली उडवली आहे. विरोधक बी पी रोंगे यांचा विषय निघताच कल्याणराव काळे यांना सातारा येथील अभिजित बिचुकले यांची आठवण झाली.
सातारा येथील बिचुकले पाहिजे तेंव्हा उमेदवारी अर्ज दाखल करतात, तसे त्यांचे झाले आहे. त्यांच्याकडून मर्चंट बँकेची निवडणूकच कशी सुटली ते कळत नाही, कदाचित सहकार शिरोमणीच्या निवडणुकीच्या नादात मर्चंट बँकेची निवडणूक त्यांच्या लक्षातच आली नाही असे दिसतेय. हरकत नाही, मागच्या वेळी रोंगे सर असतील, किंवा अजून कुणाचा पॅनल असेल, त्या दोन्ही पॅनलचे डिपॉझिट आमच्या सभासदांनी जप्त केले आहे. यावेळी देखील तसेच होणार आहे. या दोन्ही पॅनलचे डिपॉझिट जप्त होईल असे कल्याणराव काळे यांनी सांगितले आहे. ही निवडणूक वन वे आहे आणि घोडा मैदान जवळ असल्याने ते तुम्हाला दिसेलच, विरोधकाकडे असलेली गर्दी ही केवळ बिगर सभासदांची आहे, विरोधकांचे डिपॉझिट जप्त केल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. असा विश्वास काळे यांनी व्यक्त केला.
आपण कुणाचेही शेअर अडवले नाहीत, ज्याचा ऊस येतो त्यांना प्राधान्य दिले जाते, ज्यांच्या शेअरची रक्कम पूर्ण होईल त्यांना शेअर देण्यास आम्ही आजही तयारच आहोत, कारखान्याचे साथ ते सत्तर टक्के बिल वाटप झालेले आहे, उरलेल्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोतच, त्यातच निवडणूक लागल्याने पैसे उपलब्ध होण्यास काही अडचणी निर्माण होत आहेत पण त्यातूनही आम्ही मार्ग काढणार आहोत. (Sahakar shiromani sugar factory election, Kalyanrao kale aggressive)कुणाचेही बिल ठेवले जाणार नाही अशी स्पष्ट ग्वाही देखील काळे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे. कारखाना निवडणुकीत भालके गटातील लोकांना संधी मिळावी अशी मागणी होऊ लागली आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले असता, 'भालके आणि काळे गट एकत्रच आहे आणि सगळे लोक भालके, काळे गटाचेच आहेत' असे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !