BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२५ मे, २०२३

'ती' बातमी आली आणि पंढरपूर, मंगळवेढा तालुक्याला बसला मोठा धक्का !






शोध न्यूज : संत दामाजी साखर कारखान्याचे संचालक आणि राष्ट्रवादीचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष प्रा. पी बी पाटील यांच्या अपघाती निधनाची बातमी पसरली आणि पंढरपूर, मंगळवेढा तालुक्याला मोठा धक्का बसला परंतु पाटील सर यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती त्यांच्या चिरंजीवांनी दिली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे मंगळवेढा तालुकाध्यक्ष, दामाजी कारखान्याचे विद्यमान संचालक प्रा. पी.बी. पाटील यांचा बुधवारी पहाटे २ च्या सुमारास उरूळीकांचन येथे अपघात झाला  आहे. त्यांच्यावर पुणे येथील सिद्धीविनायक हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून त्यांची परिस्थिती चिंताजनक पण स्थिर असल्याची माहिती त्यांचा मुलगा प्रथमेश पाटील यांनी दिली आहे. प्रा.पी.बी. पाटील हे कामानिमित्त मंगळवारी पुण्याला गेले होते, तेथून परतताना उरळी कांचन येथे रस्त्याकडेला गाडी लावून चहा पिण्यासाठी रस्ता ओलांडताना वाहनाने धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले आहेत. 


या अपघातात त्यांच्या डोक्याला मोठा मार लागला आहे. अपघात होताच प्रा. पाटील यांना  उरुळी कांचन येथील रुग्णालयात हलविण्यात आले.  हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत  परंतु काल दुपारपासून प्रा. पाटील सर यांचे अपघाती निधन झाल्याची अफवा पसरली. पाटील सर यांची प्रकृती चिंताजनक आहे आणि डॉक्टर शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. असे असतानाही त्यांच्या निधनाची अफवा सोशल मीडियावरून वेगाने पसरली गेली.  या घटनेबाबत जो तो परस्परांना माहिती देत होता आणि अधिक माहिती मिळविण्याचा प्रयत्न करीत होता. अनेकांनी तर सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली देखील अर्पण केली. त्यामुळे ही बातमी खरी असल्याचा अनेकांना विश्वास बसला. परंतु नंतर या बातमीत काही तथ्य नसल्याचे समोर आले आणि अनेकानी आपले मेसेज अथवा स्टेटस काढून टाकले. 


सगळीकडे अफवा पसरल्यामुळे पाटील सर यांचे चिरंजीव प्रथमेश यांनी याबाबत दुपारनंतर खुलासा करून माहिती दिली आहे.  प्रा. पी.बी. पाटील यांची तब्येत चिंताजनक पण स्थिर आहे. (Prof. P. B. Patil's accident, The news of death is false) डॉक्टरांनी ४८ तास कुठलाही निर्णय देणार नसल्याचे सांगितले असून आमच्या कुटुंबावर प्रेम करणाऱ्या लोकांनी संयम बाळगून त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी प्रार्थना करावी अशो विनंती केल्यानंतर व्हॉट्सअप स्टेटस ला ठेवलेले श्रद्धांजलीचे  फोटो लगेच डिलीट करण्यात आले. त्यांच्या तब्येतीत सुधारणा होण्याच्या प्रार्थना करण्यास सुरुवात झाली. 


प्रा. पी.बी. पाटील हे मूळ मंगळवेढा तालुक्यातील मारापूर येथील असले तरी, त्यांची कर्मभूमी ही पंढरपूर राहिली आहे. काही वर्षे त्यांनी पंढरपूर येथे विद्यार्थ्यांची शिकवणी घेतली. पंढरपूर येथील भजनदास चौकात त्यांचा निवास होता. त्यानंतर त्यांनी लिंक रोडवर बंगला बांधला आणि तेथेच निवास करू लागले. राजकारण आणि ठेकेदारी या दोन्ही विश्वात ते रमले. त्यांनी पंढरपूर विधानसभेची निवडणूक देखील लढवली आहे. सगळीकडे वावर असला तरी अत्यंत संयमी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचाकडे पहिले जाते. त्यांचा मित्र परिवार देखील मोठा आहे. 


मंगळवेढा येथील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक पदावर ते निवडून आले आहेत,राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेपासून आजतागायत पवार घराण्याशी एकनिष्ठ आहेत. राजकीय, सामाजिक क्षेत्रात त्यांचे भरीव योगदान आहे. त्यांची शिकवणी घेणारा शिक्षक ते तालुक्‍यातील विविध पदे भूषवणारे राजकारणी हा प्रवास उल्लेखनीय आहे. शांत संयमी व अभ्यास नेतृत्व म्हणून तालुक्‍यात त्यांची ओळख असून त्यांच्या अपघाताने अनेक जण हळहळ व्यक्‍त करीत आहेत. त्यांच्या निधनाच्या खोट्या बातमीने अनेकांना धक्का बसला असून, अजूनही त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना लवकर आराम मिळावा म्हणून प्रार्थना केल्या जात आहेत.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !