BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मे, २०२२

सोलापूर जिल्हा होरपळला, उच्चांकी तापमानाची नोंद !

 



सोलापूर : राज्यातील तापमान वाढत असतानाच सोलापूरचा पार उच्चांकाकडे पोहोचला असून सोमवारी ४४.३ अंश सेल्सियसची नोंद झाली आहे. यंदाच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तापमान ठरले असून हे आणखी वाढण्याची शक्यता आहे. 


यावर्षी उन्हाळ्याच्या सुरुवातीपासून राज्यात वाढत्या तपमानाने चिंता निर्माण केली आहे. विदर्भ, मराठवाडा येथे तर हा उन्हाळा नागरिकांच्या जीवावर उठला असल्याचे दिसून आले आहे. वाढत्या उष्म्यामुळे उष्माघाताचे बळी आणि उष्माघाताचा त्रास वाढलेला आहे. यावर्षी देशातील तापमान गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक तपमान म्हणून नोंद झाली असतानाच राज्यात देखील यंदाच्या उन्हाळ्याने जगणे कठीण केले आहे. घामाच्या धारा आणि अंगाची लाही लाही होत असून कधी एकदा हा उन्हाळा संपतोय याची प्रतीक्षा लागलेली असताना तपमानात वाढच होताना दिसत आहे. त्यात अधूनमधून उष्णतेची येत असलेली लाट कायम आहे त्यामुळे पुढचे काही दिवस अशीच होरपळ होण्याची भीती व्यक्त होऊ लागली आहे. सोलापूरला तापमान अधिक असते त्यामुळे अनेकदा सोलापूरचा उल्लेख 'शोला'पूर असा देखील करण्यात येतो आणि काल सोमवारी याचा पुन्हा प्रत्यय आला आहे. 


सोमवारी सोलापूरचा पार ४४.३ अंश सेल्सियस पर्यंत पोहोचला असून यावर्षीच्या उन्हाळ्यातील हे सर्वाधिक तपमान नोंदले गेले आहे. सोलापूर जिल्ह्यातही जवळपास अशीच  उष्णता आहे त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. उन्हातान्हात कष्ट करणाऱ्यांना तर अधिक धोका दिसत आहे. वाढत्या उन्हामुळे रस्त्यावर देखील शुकशुकाट दिसू लागला आहे. एप्रिल महिन्यात अखेरच्या सप्ताहात देखील हा पारा ४३.३ अंशावर पोहोचला होता त्यानंतर काल सोमवारी पुन्हा तेवढेच तापमान नोंदले गेले आहे. २८ एप्रिल रोजी ४२.९ आणि २९ एप्रिल रोजी ४३.३ अंशावर सोलापूरचा पारा चढला होता. (The temperature in Solapur reached a record high) त्यानंतर मे महिन्यात देखील उच्चांकी नोंद सुरु झाली असून या महिन्यातील आणखी काही दिवस बाकी आहेत. 


मे महिना तापलेलाच !
काल सोमवारी ९ मे रोजी सोलापूरचे तपमान ४४.३ अंशावर गेले आणि ९ मे १९८८ रोजीचे तपमान देखील ४६ अंशावर पोहोचले होते. १९९३ पासून सोलापुरात मे महिना प्रचंड उष्णतेचा जात असून तेंव्हापासून दहा वर्षातील एक दिवस तरी तापमान हे ४४ अंश सेल्सियसच्या पुढेच राहिलेले आहे. २१ एप्रिल २०१६ रोजीचे तापमान तर ४४.९ अंशावर पोहोचले होते.

 
दुष्काळात तेरावा महिना !
वाढते तापमान आणि भार नियमन असा दुहेरी मार सद्या सहन करावा लागत आहे. यावर्षी तपमान वाढत असल्याने पंख्याची हवा देखील उष्ण येत आहे. कुलर देखील तेवढे प्रभावी ठरत नसताना यावर्षी अधूनमधून होणारे भार नियमन अधिक जाचक ठरू लागले आहे. कडक उन्हामुळे नागरिक बाहेर पडायला तयार नाहीत आणि घरात बसले तरी वीज गायब होत असल्यामुळे घरातही दिलासा नाही. या दुहेरी त्रासामुळे तर हा उन्हाळा अधिकच तीव्र आणि त्रासदायक ठरू लागला आहे. 


उष्माघाताचा त्रास !
वाढत्या तपमानामुळे अनेकांना उष्माघाताचा त्रास जाणवू लागला असून रुग्णांची संख्या देखील वाढताना दिसत आहे. विशेषत: उन्हात कष्ट करणारे आणि जेष्ठ नागरिक यांच्यात या तक्रारीचे प्रमाण अधिक आहे. शरीरातील पाणी कमी होणे, अशक्तपणा वाटणे अशा प्रकारच्या समस्या वाढत असून रुग्ण वाढताना दिसून येत आहेत. वाढत्या तापमानात काळजी घेणे हे अत्यावश्यक ठरले आहे.  


हे देखील वाचा >>>

  




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !