BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ एप्रि, २०२२

निकालाआधी महाविकास आघाडीच्या विजयाचे झळकले पोस्टर !

 


कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली असून निकालाआधीच विजयाचे आणि अभिनंदनाचे पोस्टर झळकू लागले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीचा प्रबळ आत्मविश्वास समोर आला आहे.

 
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक ही महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पक्ष यांनी प्रतिष्ठेची केली होती परंतु मतमोजणी सुरु झाल्यापासूनच महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री चंद्रकांत जाधव (काँग्रेस) या आघाडीवर असून भाजपच्या सत्यजित कदम यांची धोबीपछाड दिसू लागली आहे. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून जयश्री जाधव याच आघाडीवर असून त्यांचे मताधिक्य वाढत चालले आहे. भाजपचे सत्यजित कदम यांच्या बालेकिल्ल्यात देखील कदम यांना मोठे मताधिक्य मिळाले नाही. त्यामुळे उर्वरित भागात काय चित्र असू शकेल याचा अंदाज येताना दिसत आहे.

 
पंढरपूर विधानसभेची पोटनिवडणूक भाजपचे जिंकल्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढत निघाला होता पण पंढरपूर येथील विजय हा राष्ट्रवादीतील दुफळीमुळे झाला होता याकडे दुर्लक्ष करण्यात आले. भारतीय जनता पार्टीवर लोक नाराज आहेत, वाढत्या महागाईने हैराण झालेले आहेत त्यामुळे महाराष्ट्रात भाजप उमेदवार विजयी होणे कठीण असल्याच्या प्रतिक्रिया कोल्हापूर निवडणुकीच्या सुरुवातीपासून व्यक्त होत होत्या आणि आजच्या मतमोजणीत सुरुवातीपासूनच जनभावना प्रकट होऊ लागल्या आहेत. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव यांचा विजय आधीपासूनच निश्चित मानला जात असताना (Kolhapur by Election lead to Mahavikas-Aghadi) मतमोजणी त्याच दिशेने जाताना दिसत आहे. 


महाविकास आघाडीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना विजयाचा प्रचंड आत्मविश्वास असून निकालाच्या आधीच कोल्हापूर जिल्ह्यात बावडा येथे झळकलेले विजयाचे पोस्टर हे मतमोजणी एवढेच चर्चेचे आणि कुतुहलाचे ठरले आहे. कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव यांच्या विजयाचे भले मोठे पोस्टर झळकले असून त्यावर 'आमदारपदी निवड झाल्याबद्धल जयश्री जाधव यांचे अभिनंदन' असा मजकूर लिहिण्यात आला आहे.

 
सुरुवातीपासून पुढेच !

महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव या मतमोजणीच्या सुरुवातीपासूनच आघाडीवर आहेत. प्रत्येक फेरीत जाधव यांना मताधिक्य मिळत असून भारतीय जनता पक्षाचे सत्यजित कदम सतत पिछाडीवर आहेत. सद्याचा कल पाहता भाजपला नामुष्कीची वेळ येणार असल्याचे दिसत असले तरी अजून मतमोजणीच्या १८ फेऱ्या शिल्लक आहेत तथापि ही निवडणूक सांगितली गेली तशी अटीतटीची दिसून येत नाही.

पंधरा उमेदावर रिंगणात 

कोल्हापूर पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यात प्रमुख लढत असली तरी एकूण १५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. सकाळी आठ वाजता मतमोजणीस सुरुवात झाली असून दुपारी बारा ते एक वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे. महाविकास आघाडीने मात्र गुलाल उधळण्याची तयारी केली आहे. 

प्रतिष्ठेची निवडणूक !

भारतीय जनता पक्ष आणि महाविकास आघाडी यांच्या प्रतिष्ठेची ही निवडणूक असली तरी पालकमंत्री सतेज पाटील आणि माजी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. प्रचारात दिसत असलेली चुरस मात्र मतमोजणीत दिसत नसून कोल्हापूरकरांनी भाजपवर रोष व्यक्त केल्याचे दिसत आहे 

अकरावी  फेरी पूर्ण 

सुरुवातीपासून आघाडीवर असलेल्या महाविकास आघाडीच्या जयश्री जाधव या अकराव्या  फेरीअखेर देखील आघाडीवरच असून जाधव यांना ४२  हजार ४७५ मते तर भाजपचे सत्यजित कदम यांना ३४ हजार ३२८ मते मिळाली आहेत. भाजपचे कदम यांची आता मात्र दमछाक होताना दिसत आहे. ८ हजाराहून अधिक मताधिक्य महाविकास आघाडीला मिळाले आहे. 

 

हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )




 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !    


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !