शोध न्यूज : अत्यंत किरकोळ कारणावरून जन्मदात्या पण नराधम असलेल्या बापाने आपल्याच अवघ्या चौदा वर्षाच्या मुलाचा काटा काढला असून थंड डोक्याने खून करून आपला काही संबध नसल्याचे दाखवले पण अखेर नराधमाच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत.
खोड्या करणे हा लहान मुलांचा नैसर्गिक स्वभाव असतो तसेच मोबाईलचा हट्ट घराघरातील मुले करीत असतात. लहान मुलांनी काही खोडी केली अथवा हट्ट केला तर पालक त्याला समजावण्याचा प्रयत्न करीत असतात, प्रसंगी रागावलेही जाते. परंतु सोलापुरातील एका पित्याने केलेली घटना पाहून कुणाच्याही काळजाचा ठोका चुकाल्याशिवाय राहणार नाही. चौदा वर्षांचा मुलगा शाळेत खोड्या करतो, सतत मोबाईलची मागणी करतो अशा कारणाने चिडून जाऊन नराधम पित्याने आपल्याच कोवळ्या मुलाचा, थंड डोक्याने खून केला पण ही घटना उघडकीस आली आहे. सगळे कारस्थान करून बापाने वेगळेच नाटक रचले पण सत्य अखेर अपोआप समोर आले आणि नराधम बापाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
सोलापूर - तुळजापूर रस्त्यावर सर्व्हिस रोडच्या जवळ असलेल्या एका नाल्याजवळ एका लहान मुलाचा मृतदेह १३ जानेवारीस रात्रीच्या दहा वाजण्याच्या सुमारास आढळून आला होता. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाली तेंव्हा त्यांनी तातडीने या मुलाला शासकीय रुग्णालयात दाखल केले होते परंतु त्याचा काही उपयोग नव्हता. त्या आधीच या मुलाचा मृत्यू झाला असल्याचे निष्पन्न झाले. हा लहानसा मुलगा कोण ? कुठला ? याची कुणालाच काही माहिती मिळत नव्हती. पोलिसांनी तपास करून त्याची ओळख पटवली आणि सोलापूर येथील भावनि पेठ येथे राहणारा विशाल विजय बट्टू असल्याचे पोलिसांना समजले. (Cold-blooded murder of son by father) त्यानंतर पोलिसांनी या घटनेचा तपास सुरु केला. पोलिसांनी त्याच्या घरापासून घटना स्थळापर्यंत तपासाच चक्रे फिरवत, सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, यात पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती आली. मयत लहान मुलाच्या वडिलानेच हे पाप केले असल्याचे दिसून आले आणि त्यानंतर पोलिसांनी आपला तपास नराधम बापाकडे वळवला.
पोलिसांनी नराधम बापाला आपल्या पद्धतीने बोलते केल्यावर तो अखेर पोपटासारखा बोलू लागला आणि त्याने आपण केलेल्या गुन्ह्याची कबुलीही दिली आहे. मुलगा शाळेत गेल्यावर आणि घराशेजारील लोकांसोबत नेहमीच खोडकर वागत होता. शाळेतून देखील त्याच्या तक्रारी येत होत्या. तो सतत मोबाईल पहात होता आणि अभ्यास करीत नव्हता. याचाच राग मनात धरून या बापाने आपल्या मुलाचा थंड डोक्याने काटा काढला होता. बापाने मुलाला आपल्या मोटार सायकलवर बसवून त्याला निर्जन ठिकाणी नेले. तेथे गेल्यावर त्याला थम्प्सअप पाजले. या बाटलीत बापाने सोडियम नायट्रेटची विषारी पावडर मिसळली होती. हे विष त्याला पाजले आणि त्याला ठार मारले अशी कबुली देखील त्याने दिली आहे. सदर प्रकरणी सोलापूर येथील जोड भावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जन्मदात्या बापाचे हे कारस्थान ऐकून ज्याला त्याला मोठा धक्का बसला आहे. लहान मुलाने खोड्या करणे, मोबाईलचा हट्ट करणे या स्वाभाविक बाबी असून घराघरातील मुले हेच करीत असतात. या बापाने मात्र अशा लहान मुलाचा अत्यंत थंड डोक्याने खून केला आहे त्यामुळे मानवी मन सुन्न झाले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !