पंढरपूर : कोरोना रुग्णांसाठीच्या बेडशीट आणि चादरीवर देखील डल्ला मारण्याचा प्रयत्न एका चोरट्याने केला असून वॉचमनच्या दक्षतेने ही चोरी पकडण्यात आली.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला तेंव्हा विविध शहरातून तात्पुरते कोविड सेंटर उभारण्यात आले होते. कोरोना रुग्णांसाठी रुग्णालये कमी पडू लागली म्हणून अशा कोविड सेंटरची गरज भासू लागली होती त्यामुळे अनेक खाजगी व्यक्तीही पुढे आल्या आणि त्यांच्या पुढाकाराने कोरोना रुग्णांसाठी रुग्णालये उभी राहिली. पंढरीत देखील ६५ एकरात मोठे कोरोना सेंटर उभे करण्यात आले. कोरोना रुग्णांची संख्या घटल्याने तिसऱ्या लाटेनंतर हे सेंटर बंद ठेवण्यात आले होते. सेंटरमधील चादरी, बेडशीट असे सगळे साहित्य तीन खोल्यात ठेवून या खोल्यास कुलूप लावण्यात आलेले होते परंतु इकडेही चोरांचे लक्ष गेले आणि येथील चादरी, बेडशीट चोरून नेण्याचा प्रयत्न झाला.
चोऱ्या, घरफोड्या आणि भर रस्त्यावर फसवणूक करून लुटण्याच्या घटना तर नित्याच्या झालेल्या आहेतच पण रुग्णांच्या चादरी, बेडशीट देखील चोरांच्या नजरेतून सुटल्या नाहीत. एक चोर ६५ एकरातील कोरोना सेंटरमधून चादरी आणि बेडशीट चोरून दुचाकीवरून पळून जाण्याच्या प्रयत्नात असल्याने तेथील वॉचमनच्या लक्षात आले. वॉचमन अनिकेत जाधव, विजय भादुले यांनी या चोराला पकडून संबंधित डॉक्टरांना फोन करून याची माहिती देण्यात आली. वैद्यकीय अधिकारी डॉ भाऊसाहेब जानकर हे रात्री कोविड सेंटरवर दाखल झाले. कोविड सेंटरची पाहणी केली असता साहित्य ठेवलेल्या खोलीचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले. आतील बरेच साहित्य देखील ठेवलेल्या ठिकाणी दिसून आले नाही.
अधिक चौकशी केली असता वॉचमन यांनी पकडलेल्या व्यक्तीचे नाव चाँद पैगंबर मुजावर असून तो पंढरपूर तालुक्यातील पोहोरगाव येथील असल्याची माहिती मिळाली. त्याने कोविड सेंटर मधील चादरी आणि बेडशीट भरून आपल्या दुचाकीवर ठेवल्या असल्याचे दिसून आले. ५४ चादरी आणि ७४ बेडशीट त्याने चोरून चालवल्या होत्या. या प्रकरणी पोलिसात फिर्याद देण्यात आली असून मुजावर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !