इचलकरंजी : विधवा प्रथा बंद करण्याचा एक आदर्श ठराव शिरोळ तालुक्यातील हेरवाड येथील गावसभेत घेण्यात आला असून राज्यभर या गावाचे कौतुक होताना दिसत आहे.
विज्ञानयुगाने प्रगती केली असली तरी अजूनही काही रूढी परंपरा जपल्या जातात, त्यातीलच एक विधवा प्रथा असून काहीही चूक नसताना विधवेला आयुष्यभर शिक्षा भोगावी लागते. याच समाजाचा घटक असून देखील तिला वेगळी वागणूक दिली जाते आणि सर्व सन्मानापासून तिला वंचित ठेवले जाते. विधवेवर समाजाची अनेक बंधने आजही कायम असून तिला सामाजिक न्याय नाकारला जातो. पतीच्या निधनानंतर तिच्या गळ्यातील मंगळसूत्र तोडले जाते, कपाळावरील कुंकू पुसले जाते, पायाच्या बोटातील जोडावी काढली जातात, बांगड्या फोडल्या जातात आणि संपूर्ण आयुष्यभर तिला सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात मागे ठेवले जाते. पूर्वी पतीच्या निधनानंतर पत्नीने सती जाण्याची अनिष्ठ प्रथा होती परंतु ती बंद झाली तथापि विधवेला मात्र जिवंत राहून देखील मरणयातना सोसाव्या लागतात ही आजची स्थिती आहे.
पतीचे निधन होणे यात पत्नीची काहीच चूक नसताना तिच्या आयुष्यात मात्र तिला वेगळी वागणूक दिली जाते. तिचे सगळे सन्मान हिरावून घेतले जातात. तिच्या हक्कावरच गदा आणली जाते आणि विधवा देखील तक्रार न करता हे सगळे मान्य करीत जगत असते. विधवेने असेच जगायचे असते अशी मानसिकताच तयार झालेली असते पण त्यामुळे विधवा महिलेला आयुष्यभर सन्मानापासून वंचित राहावे लागते. नकळतपणे समाजाची अनेक बंधने तिच्यावर लादली जात असतात. अलीकडी काळात विधवा पुनर्विवाह मान्य होऊ लागले आहेत पण विधवांना सन्मान मात्र मिळत नाही. आणि तिच्या हक्काकडे समाजाचे देखील लक्ष कधी जात नाही त्यामुळे वर्षानुवर्षे ही अनुचित परंपरा तशीच पुढे जात राहिली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड ग्रामस्थांनी मात्र मोठा निर्णय घेतला असून विधवा प्रथा बंद करण्यात आली आहे.
मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने हेरवाड ग्रामस्थांनी पाउल टाकत विधवा प्रथा बंद करण्यासाठीचा ठराव ग्रामपंचायतीने मंजूर केला आहे. वास्तविक असा ठराव मंजूर करण्याचीही आवश्यकता नाही परंतु ही भूमिका आणि त्याला कायदेशीर अधिष्ठान प्राप्त व्हावे यासाठी ग्रामपंचायत ठराव मंजूर करण्यात आला आहे. संपूर्ण गावाने मोठ्या सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने महत्वाचे पाऊल टाकले असून अन्य गावांना देखील यामुळे संदेश देण्यात आला आहे. (Widow method closed villagers good decision) गावोगाव असा निर्णय घेतला तर विधवांच्या वाटलेल्या जीवनात देखील पुन्हा पालवी फुटण्यास मदत होईल !
सन्मानाने जगण्याचा हक्क !
विधवांना देखील समाजात सन्मानाने जगण्याचा हक्क आहे, पण विधवा झाल्यावर तिच्याकडून समानतेचे हक्क हिरावून घेतले जातात आणि आयुष्यभर तिच्यावर अन्याय होतो. हे घडू नये यासाठीच हा निर्णय घेतला असून कायदेशीर अधिष्ठान प्राप्त होण्यासाठीच ठराव मजूर करण्यात आला आहे
प्रमोद झिंजाडे यांची प्रेरणा
करमाळा येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांची ही मूळ संकल्पना असून त्यांचीच प्रेरणा घेऊन हेरवाड गावकऱ्यानी हा सामाजिक परिवर्तनाचा मोठा निर्णय घेतला आहे. विधवा प्रथा पूर्णपणे मोडीत काढण्याचा एक आदर्श उपक्रम समस्त गावकरी मंडळीनी घेतला आहे. सौ. मुक्ताबाई पुजारी यांनी हा ठराव मांडला होता.
हे देखील वाचा >>>
- पोलीस फौजदारानेच केली चोरी आणि वर दंडेलशाही !
- कोरोनाच्या संकटातून सोलापूर 'सुटले' !
- राजकीय नेत्यांनीच आणले महावितरण अडचणीत !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !