BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१० मे, २०२२

शेततळ्यात पडून तीन बालकांचा मृत्यू !


मोहोळ  : शेततळ्यामुळे सोलापूर जिल्ह्यात पुन्हा एक दुर्घटना घडली असून दोन सख्ख्या भावासह तीन बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी आणि काळीज गोठविणारी दुर्घटना मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे घडली आहे. 


गेल्या काही वर्षात अनेक शेतकऱ्यांनी पाण्यासाठी शेतात शेततळी तयार केली आहेत परंतु ही शेततळी महिला आणि बालकांच्या जीवावर उठली आहेत. शेततळ्यात पडून आणि बुडून मृत्यू झाल्याच्या काही घटना सोलापूर जिल्ह्यातही अलीकडच्या काळात घडल्या असून सोमवारी पुन्हा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथे घडली आणि तीन चिमुरड्यांचा या घटनेत मृत्यू झाल्याने सोलापूर जिल्हा पुन्हा एकदा हादरून गेला आहे. शेटफळ येथील एका शेततळ्यात दोन सख्ख्या भावासह तीन बालकांचा अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यातील दोन मुले ही अवघ्या सात वर्षे वयाची असून एक मुलगा आठ वर्षे वयाचा आहे. याबाबत मुकेश हिंगमिरे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. 


मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील भरत निकम हे मोहोळ तालुक्यातील शेटफळ येथील आपले मेहुणे मुकेश हिंगमिरे यांच्या शेतात शेतमजुरी करण्यासाठी आलेले होते. गेल्या काही महिन्यांपासून ते आपली पत्नी रेश्मासह महेश तानाजी डोंगरे यांच्या शेतात काम करीत होते. सोमवारी देखील ते सकाळीच मजुरीसाठी शेतात गेले होते. आई वडील शेतात काम करण्यासाठी गेल्यानंतर त्यांची मुले आपल्या मामाचा मुलगा कार्तिक यांच्यासोबत खेळत खेळत त्यांच्या रस्त्यात असलेल्या संतोष जनार्दन डोंगरे यांच्या शेततळ्याकडे गेले. पोहायला म्हणून ते शेततळ्यावर गेले आणि पाय घसरून ते पाण्यात पडले. (Three children drown in farm pond) यातच तीनही बालकांचा शेततळ्यात बुडून मृत्युमुखी पडले. 


तीन बालकांचा मृत्यू 
सिद्धेश्वर भरत निकम (वय ७), विनायक भरत निकम (वय ८) आणि कार्तिक मुकेश हिंगमिरे (वय ७) या तीनही बालकांचा शेततळ्यात पडून मृत्यू झाला आहे. सिद्धेश्वर आणि विनायक हे मंगळवेढा तालुक्यातील माचनूर येथील असून कार्तिक हा शेटफळ येथील आहे. कार्तिकचे वडील मुकेश हिंगमिरे हे पुणे येथे चालक म्हणून काम करीत असतात. 


आणि धक्का बसला !
दुपारच्या वेळी ही मुले शेततळ्यात पडली परंतु याची कुणालाच खबर नव्हती. शेतातील काम उरकून आई वडील घरी आले तेंव्हा त्यांना मुले दिसली नाहीत त्यामुळे त्यांच्या काळजाचा ठोका चुकला. त्यांनी शोधाशोध केली असता मुले कुठेच दिसत नव्हती. शोधात शोधत आई रेश्मा निकम या शेततळ्याजवळ गेल्या असता त्यांना मुलाच्या चप्पल दिसल्या आणि आईने हंबरडा फोडला ! 


रुग्णालयात नेले पण --
शेततळ्याच्या बाहेर चप्पल दिसल्यावर मुले पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. तातडीने त्यांना पाण्याच्या बाहेर काढण्यात आले परंतु पाण्यात बुडून त्यांना काही तास झालेले होते. या बालकांना तातडीने मोहोळ येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले परंतु तेथे डॉक्टरांनी या तीनही मुलांना मृत घोषित केले. 


दोन गावावर शोककळा !
या घटनेने मोहोळ तालुक्यातील शेटफळ आणि मंगळवेढा तालुक्यातील माचणूर या दोन गावावर शोककळा पसरली. माचणूर येथील निकम कुटुंब पोटासाठी मजुरी करण्याच्या निमित्ताने शेटफळ येथे पोहोचले होते पण या दुर्घटनेत त्यांची दोन मुले मृत्युमुखी पडली तर शेटफळ येथील त्यांच्या मेहुण्याचा एक मुलगा कार्तिक याचाही याच घटनेत मृत्यू झाला. एकाच घटनेत दोन गावावर शोककळा पसरली आहे. 


हे देखील वाचा >>>






कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !