BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

अखेर ताे ‘पुरूष’ हाेता ! अभिनेत्री जयश्री गडकर यांचा थरारक अनुभव !

 


अखेर तो 'पुरुष' होता  !

रविवार मनोरंजन  : अशोक गोडगे 



चित्रपट कलावंतांचा पडद्यावरील झगमगाट सर्वांनाच दिसताे खरा, पण त्यांचं आयुष्य किती धकाधकीचं असतं याची काेणाला माहिती नसते. त्यातल्या त्यात स्त्री कलाकाराला पडद्यामागं किती प्रकारच्या यातना सहन कराव्या लागतात याची तर कुणाला जाणीवही नसते. आजच्या अनेक कलावती सगळं काही धाडसानं करतात तर कुणी तडजाेडीही स्विकारतात. पूर्वीच्या काळाची परिस्थिती तर एकदम वेगळी होती. आज विविध प्रसारमाध्यमांमुळं प्रेक्षक शहाणे झालेले आहेत. पडद्यावरचं वेगळं आणि खाजगी आयुष्य वेगळं असतं याची कल्पना आता जवळपास सगळ्यांनाच आली आहे पण पूर्वीच्या काळी पडद्यावरच्या खलनायकाला रस्त्यावरही लाेक घाबरत असत. 


तमाशापटात तमाशाच्या स्टाईलने रंगढंग करणारी अभिनेत्री खाजगी आयुष्यातही अशीच रंगेल असणार अशी लाेकांची खात्री असायची. चित्रपटातील जशी इमेज असेल तशाच नजरेनं त्याच्याकडं खाजगी आयुष्यातही पाहिलं जायचं. पूर्वी तर महिला सिनेमा नाटकांतून कामच करीत नव्हत्या पण नंतर स्त्रिया या क्षेत्रात उतरल्या तेंव्हांही त्यांना आजच्यासारखी प्रतिष्ठा नव्हती. आज सगळंच काही 'खपून' जातं पण त्याकाळी तसं नव्हतं. सिनेमा नाटकातील स्त्री कलाकारांकडे (Marathi Actress) पाहण्याची समाजाची नजर चांगली नव्हती आणि त्याचा त्यांना खाजगी आयुष्यात माेठा त्रास व्हायचा. वेगवेगळ्या ठिकाणच्या चित्रिकरणासाठी वेळेत पाेहाचायचे आणि तेही स्त्री कलाकाराने ! माेठ्या दिव्यातून त्यांना जावं लागायचं. मराठी चित्रपटसृष्टीतल्या आघाडीच्या जयश्री गडकर यांना प्रवासात एकदा तसाच धसका घ्यावा लागला हाेता. अगदी कळत नकळत ! अगदी त्यांनीच सांगितलेला हा प्रसंग !


‘बाई मी भाेळी’ चित्रपटाचं शूटिंग हाेतं म्हणून जयश्री गडकर आपल्या गाडीने काेल्हापूरला निघालेल्या हाेत्या. १९६६-६७  सालातली ही घटना. जयश्रीबाईंचं चित्रपटांत चांगलं नाव झालेलं हाेतं. मराठी प्रेक्षक त्यांना ओळखतही हाेता. त्याकाळातील अधिकाधिक तमाशापटात त्यांनी कामं केलेली हाेती आणि तमाशातील त्यांच्या नृत्यावरील अनेक गाणी मराठी प्रेक्षकांच्या ओठावर हाेती. त्यांना काेणी ओळखू शकणार नाही अशी परिस्थिती नव्हती. मुंबईतलं शूटींग उरकून जयश्रीबाई आणि त्यांच्या हेअर ड्रेसर प्रमिलाबाई या काेल्हापूरकडे निघाल्या हाेत्या. रात्रीचा प्रवास असला तरी स्वत:च्या गाडीतून त्या काेल्हापूरला चित्रिकरणासाठी निघालेल्या हाेत्या त्यामुळं त्यांना काही चिंताही नव्हती. 


कराडच्या पुढे गेल्यानंतर त्यांची गाडी आडरानातच बंद पडली. यावेळी रात्रीचे दाेन वाजलेले हाेते. आजूबाजूला अंधाराचं साम्राज्य पसरलेलं हाेतं. कुठं दूरदूरपर्यंत एखादा दिवा अथवा लाेकवस्तीच्या अन्य काहीच खूणा दिसत नव्हत्या. त्यांचा ड्रायव्हर भीमराव अंधारात गाडीचं बाॅनेट उघडून काही अंदाज घेत हाेता. अखेर मेकॅनिक आल्याशिवाय गाडी सुरू हाेणार नसल्याचं भीमरावच्या लक्षात आलं आणि आता रात्रभर गाडीत बसून राहण्याशिवाय काही पर्याय नसल्याचं त्यानं जयश्री गडकरांना सांगितलं. 


भीमरावनं अडचण सांगताच जयश्रीबाईंना दरदरून घाम फुटला. निर्मनुष्य परिसरात दाेन बायकांनी अशी रात्र काढायची कल्पनाही त्यांना भीतीदायक वाटली. शिवाय काेल्हापूरला शूटींगसाठी वेळेवर पाेहाेचता येणार नव्हतं. तेथे उशिरा जाण्यानं निर्मात्यांचं माेठं नुकसानही हाेणार हाेतं. अंधाऱ्या रात्रीचा सामना करण्यापेक्षाही त्यांना काेल्हापूरला पाेहाेचायला विलंब हाेत असल्याची चिंता लागलेली हाेती. मनात विचार सुरू असतानाच मागून एक ट्रक येताना त्यांना दिसला आणि कसलाही विचार न करता जयश्री गडकर गाडीतून उतरल्या आणि रस्त्यावर उभ्या राहून त्यांनी ट्रक ड्रायव्हरला गाडी थांबविण्यासाठी हात केला. ही काही साधीसुधी बाब नव्हती. निर्मनुष्य रस्ता आणि ट्रक ड्रायव्हरवर विश्वास ठेवणं हे सगळंच काही धक्कादायक हाेतं पण जयश्रीबाईंना निर्मात्यांचं नुकसान दिसत हाेतं.  त्यासाठी त्यांनी हे विचित्र धाडस केलं हाेतं.


अंधाराला चिरत निघालेल्या ट्रकच्या लाईटस् वयानं तरूण आणि देखण्या असलेल्या जयश्री गडकर यांच्या चेहऱ्यावर पडल्या. ट्रक थांबला तसा ड्रायव्हर उडी मारूनच खाली उतरला आणि त्यांच्याजवळ गेला. ट्रकमध्ये आणखी काहीजण बसलेले हाेते. ड्रायव्हरने जयश्री गडकर यांना ओळखलं आणि त्याने त्यांचे अनेक चित्रपट पाहिले असल्याचंही सांगितलं. ड्रायव्हर मराठी माणूस असल्यानं जयश्री गडकर ( Jayashri Gadakar) यांना नाही म्हटलं तरी थाेडासा आधार वाटलेला हाेता. जयश्रीबाईंनी त्याला आपल्या गाडीचा बिघाड सांगितला आणि काेल्हापूरला सकाळ हाेण्याआधी पाेहाेचण्याची गरज असल्याचे सांगितले. हेअर ड्रेसर प्रमिलाबाईही गाडीतून खाली उतरून जवळ आल्या. ड्रायव्हर माेठ्या आनंदाने तयार झाला, ताेही काेल्हापूरलाच निघालेला हाेता. ड्रायव्हरने क्लिनरला मागच्या बाजूला पाठवलं आणि अन्य दाेघांना आपल्या जवळ जागा करून दिली. भीमरावला गाडीजवळ थांबऊन दाेघीही त्या ट्रकमध्ये बसल्या आणि ट्रक काेल्हापूरकडे निघाला. 


डाेळ्यावर झाेप येत हाेती पण जयश्रीबाई झाेपायचं टाळत हाेत्या. ड्रायव्हरच्या मनात कधी काही वाईट विचार आले तर 'सावध' असावं म्हणून त्या जाग्याच रहात हाेत्या.   नुसतं जागं राहून त्यांनी समाधान मानलं नाही तर त्या ड्रायव्हरशी बाेलत राहिल्या. ड्रायव्हर जयश्रीबाईंच्या एकेका चित्रपटातील एकेका भूमीकेबाबत विचारत हाेता आणि त्या त्याला माहिती देत हाेत्या. जयश्री गडकर यांच्या अनेक भूमीका आणि अनेक गाणी त्याला चांगलीच माहिती हाेती. याच्या डाेळ्यासमाेर तमाशातली प्रतिमा निर्माण हाेऊ नये यासाठी गडकर सतत विषय बदलत हाेत्या.


आपलं लग्न झालं असून पती इंजिनिअर आहेत आणि आपल्याला मुलंही आहेत असं चक्क खाेटंही त्यांनी त्या ड्रायव्हरला सांगितलं हाेतं. काही करून त्याच्या मनात काही भलतं सलतं येऊ नये यासाठीच जयश्री गडकरांची धडपड सुरू हाेती. कॅमेऱ्यासमाेरच नव्हे तर इथं ट्रकमध्येही त्यांना आपली प्रतिभा पणाला लाऊन 'अभिनय' करावा लागत हाेता. यात त्यांच्या गप्पा इतक्या रंगल्या की ताे ड्रायव्हर असल्याचं आणि जयश्री गडकर या अभिनेत्री असल्याचं दाेघेही विसरून गेले. पडद्यावरच्या तमाशातील नाचीच आपल्याजवळ बसली आहे असे समजून त्याच्यातला 'पुरूष' जागा झाला तर...? हीच भीती जयश्री गडकर यांना हाेती. (Jayashree Gadkar Thrilling experience) शेवटी काही झालं तरी ताे ‘पुरूष’ हाेता.


ट्रक सव्वा पाचच्या सुमारास शिराेळ नाक्याजवळच्या पैलवान बापू गावडे यांच्या हाॅटेलसमाेर थांबला तशी गडकर यांनी ट्रकमधून खाली उडीच मारली.  बापू गावडे पैलवान असले तरी त्यांनी अनेक चित्रपटांतून छाेट्या माेठ्या भूमीका केलेल्या हाेत्या. जयश्री गडकर आणि गावडे यांचा चांगला परिचयही हाेता. ट्रकमधून उतरलेल्या जयश्रीबाईंना पाहून त्यांनाही धडकी भरली हाेती. जयश्रीबाईनी सगळी कथा सांगितल्यावर बापू गावडेंनी ड्रायव्हर आणि त्याच्या साथीदाराची चहापानाची व्यवस्था केली. 


ताे ड्रायव्हर जयश्रीबाईंना लाॅजपर्यंत पाेहाेचवताे म्हणत हाेता परंतू त्यांनी 'आता इथं घरी आल्यासारखंच आहे, येथेच स्नान आटाेपून पुढे जाताे' असे सांगितले आणि काही नाेटा काढून त्याच्यापुढे धरल्या. त्याने त्या घेतल्या नाहीत उलट तुम्ही आमच्या ट्रकमध्ये बसलात हेच आमचं माेठं भाग्य आहे, कुणाला सांगितलं तरी ते खरंही वाटायचं नाही असे बरेच काही बाेलून ताे पैसे न घेताच निघून गेला. पैलवान बापू गावडे यांनी जयश्रीबाईंना बरंच काही ऐकवलं. 'असलं कसलं धाडस केलंत तुम्ही? काही बरं वाईट झालं असतं म्हणजे...' वगैरे, वगैरे..!


ताे ट्रक ड्रायव्हर चांगला हाेता, सज्जन हाेता. पण ताे तसा नसता तर..? खरचं जयश्री गडकर यांनी हे माेठं धाडस केलं हाेतं. चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रात्रभर अनाेळखी ट्रकमध्ये आणि काहीही संबंध नसलेल्या ड्रायव्हरसाेबत.. बापरे! त्या ड्रायव्हरने जयश्री गडकर यांचे अनेक चित्रपट पाहिलेले हाेते. चित्रपटातल्या तमाशात नाचलेली आणि अनेक प्रकारे पाहिलेली एक बाई आपल्यासाेबत आहे. 'तमाशातील बाई' म्हणून त्याच्या मनात काही आलं असतं आणि तसं काही घडलं असतं तर गडकर यांना हे केवढ्यात पडलं असतं...! तसं काही घडलं नाही पण जर तशीच वेळ आली असती तर...? काही झालं तरी ताे ‘पुरूष’ हाेता.

                                                           

          - अशोक गोडगे 

 


हे देखील वाचा :>>

......................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !