BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१२ डिसें, २०२१

दिग्दर्शकाने कुत्र्यासारखं भुंकायला लावलं होतं या मोठ्या अभिनेत्याला !

 





केष्टो मुखर्जी ! केवळ नाव उच्चारलं तरी चेहऱ्यावर हसू उमटल्याशिवाय राहत नाही. असा एक कालखंड होता की केष्टो मुखर्जी यांच्याशिवाय हिंदी चित्रपट नव्हता. भूमिका लहान असो किंवा मोठी, केष्टो मुखर्जी यांचा चेहरा दिसणं गरजेचं होतं. हा चेहरा पडद्यावर दिसताच लोक हसायचे ! केष्टो मुखर्जी यांनी काही बोलण्याआधी प्रेक्षक हसत होते हे तर त्यांच्या अद्वितीय अभिनयाचे यश होते. नशेत तर्रर्र असलेला हा चेहरा प्रेक्षकांना खूप भावला होता. आयुष्यात एकदाही दारूला हात न लावलेले केष्टो मुखर्जी दारुड्याच्या भूमिकेसाठी अजरामर तर झालेच पण त्यांची जागा पुढे कुणीच भरू शकले नाही. पण याच कलावंताला जेंव्हा चित्रपटात काम पाहिजे होते तेंव्हा एका दिग्दर्शकाने त्यांना कुत्र्यासारखे भुंकायला लावले होते !


हिंदी चित्रपटसृष्टीत एकापेक्षा एक विनोदी अभिनेते होऊन गेले पण प्रत्येकाची छाप परस्परभिन्न राहिली. जॉनी वॉकर, मेहमूद, राजेंद्रनाथ, असरानी, जगदीप, टुणटुण, मुकरी, मोहन चोटी असे काही कलाकार प्रेक्षकांना हसविण्यासाठीच होते. यात केष्टो मुखर्जी यांचे नाव तितकेच महत्वाचे होते. कोलकाता येथे १९२५ साली जन्म घेतलेल्या केष्टो मुखर्जी यांनी गल्लीतल्या नाटकापासून रंगमंचावर नाटकातून अभिनय केला आणि चित्रपटाचे वेध लागताच त्यांनी मुंबई गाठली. चित्रपटसृष्टीत प्रवेश मिळवणं तेवढी सोपी बाब नव्हती, प्रचंड नाव मिळवलेल्या अभिनेत्यालाही सुरुवातीच्या काळात स्टुडिओच्या भोवती आणि निर्माते दिग्दर्शकाच्या आजूबाजूला फिरावे लागले होते. अपमान सहन करावे लागले होते. महानायक अमिताभ बच्चन यांनाही या विश्वात सहजपणे प्रवेश मिळाला नव्हता तिथं अन्य कलावंताचं काय !


केष्टो मुखर्जी चित्रपटात काम मिळविण्यासाठी धडपड करीत होते. रोज या स्टुडीओतून त्या स्टुडीओत चकरा मारणे हेच त्यांचे काम बनले होते. एखादा दिग्दर्शक आपल्याला छोटे मोठे काम देईल अशी आशा त्यांना होती आणि एके दिवशी प्रख्यात असलेले  दिग्दर्शक विमल रॉय यांच्याशी केष्टो मुखर्जी यांची भेट झालीच ! देवदास, दो बिगा जमीन, मधुमती, सुजाता अशा काही यशस्वी चित्रपट देणाऱ्या रॉय यांचा चित्रपट सृष्टीत चांगलाच दबदबा निर्माण झाला होता. एक यशस्वी दिग्दर्शक म्हणून त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालेलेच होते. अशा या दिग्दर्शकांच्या समोर जाऊन केष्टो मुखर्जी उभे राहिले. विमल रॉय यांनी केष्टो मुखर्जी यांना निरखून पाहिलं. डोक्यापासून पायापर्यंत त्यांची नजर केष्टो मुखर्जी यांच्या देहावरून फिरली आणि विचारले, "काय हवे आहे ?"  मग काय, केष्टो मुखर्जी म्हणाले, "साहेब, माझ्या योग्य काही काम असेल तर मला मिळावे !" काहीतरी काम मिळेल अशी आशा केष्टो मुखर्जी यांना होती पण रॉय यांनी नकार दिला. सद्या तरी काही काम नसल्याचं विमल रॉय यांनी केष्टो मुखर्जी यांना सुनावलं ! विमल रॉय एवढ्यावर थांबले नाहीत तर त्यांनी केष्टो मुखर्जी यांना पुन्हा कधीतरी भेटण्याचं सांगितलं आणि भविष्यातील एक आशा त्यांना दिली.  

विमल रॉय यांनी एवढं स्पष्ट सांगितलं पण केष्टो मुखर्जी हे काही तेथून हलले नाहीत. रॉय यांच्यासमोर तसेच ते उभे राहिले होते. उभे राहून ते विमल रॉय यांच्या चेहऱ्याकडे पहातच राहिले. रॉय यांना आश्चर्य वाटले आणि ते काहीसे वैतागलेही ! ते केष्टो मुखर्जी यांना म्हणाले, "आत्ता आम्हाला कुत्र्याच्या आवाजाची गरज आहे, कुत्र्याचा आवाज काढून दाखवणार काय ? कुत्र्यासारखं भुंकून दाखवणार काय ?' शेवटी ते केष्टो मुखर्जीच होते, त्यांनी लगेच होकार दिला आणि म्हणाले, 'होय, मी कुत्र्यासारखं भुंकून दाखवतो, एकदा संधी देऊन तर पहा !"   विमल रॉय त्यांच्याकडे पहात असतानाच केष्टो मुखर्जी यांनी हुबेहूब कुत्र्याचा आवाज काढून दाखवला.  मग काय, विमर रॉय यांनी आपल्याच एका चित्रपटात केष्टो मुखर्जी यांना छोटसं काम दिलं. अखेर केष्टो मुखर्जी यांची पडद्यावरील सुरुवात झाली.

 

पुढे असित सेन दिग्दर्शित  "मां और ममता"  या चित्रपटातील भूमिकेने मात्र केष्टो मुखर्जी यांना ओळख दिली. याच चित्रपटात पहिल्यांदा त्यांनी दारू पिलेल्या माणसाची व्यक्तिरेखा सादर केली होती. याचीही कथा तशी रंजक आहे. दिग्दर्शक असित सेन त्यांच्या या चित्रपटासाठी दारुड्याची भूमिका करण्यासाठी एका कलाकाराच्या शोधात होते. त्यांना केवळ तसा अभिनय करणारा कलाकार नको होता तर त्याचा चेहरा आणि एकूण व्यक्तिमत्व बेवड्याचं असलेला कलाकार त्यांना हवा होता. त्यांनी एकदा केष्टो मुखर्जी यांना पकडलं आणि म्हणाले, "चेहऱ्यावरून तर नशेडी वाटतो आहेस, माझ्या चित्रपटात दारुड्याचे काम करतोस काय ? "  केष्टो मुखर्जी यांना हे हवच होतं. भूमिका कोणतीही असो, त्यांना चित्रपटात काम मिळणं महत्वाचं होतं ! त्यांनी लगेच होकार दिला आणि केष्टो मुखर्जी यांनी ही भूमिका यशस्वी केली. प्रेक्षकांनी या भूमिकेला प्रचंड दाद दिली. एका रात्रीत त्यांना नाव मिळालं आणि चित्रपट निर्माते दिग्दर्शकांची रांग त्यांच्याकडे लागू लागली. अनेक चित्रपटांच्या ऑफर त्यांना मिळाल्या आणि केष्टो मुखर्जी यांनी त्या स्वीकारल्याही !


कामासाठी धडपड करणाऱ्या केष्टो मुखर्जी यांच्या समोर अनेक चित्रपट येऊन उभे राहिले पण गम्मत अशी होती की सगळ्या चित्रपटातील भूमिका या दारुड्याच्याच होत्या. त्यामुळे ते नाराज होते आणि त्यांनी निर्मात्यांना सांगतिले, :अरे बाबानो, मी काही दारुडा, बेवडा नाही, सगळ्या चित्रपटात मला याच भूमिका देत आहात, दुसऱ्या भूमिकाही मी करू शकतो" पण त्याचं कोण ऐकून घेतो ? निर्माते त्यांनाच म्हणायचे, "याच भूमिकेसाठी तुम्ही जन्माला आला आहात त्यामुळे दुसऱ्या भूमिका तुम्ही करूच नका " काय करणार ? शेवटी केष्टो मुखर्जी यांना काम तर पाहिजे होतं. इच्छा नसतानाही त्यांनी या भूमिका केल्या आणि पुढे हीच त्यांची ओळख बनली. हिंदी चित्रपट सृष्टीला एक दमदार कलाकार मिळाला. केष्टो मुखर्जी यांचा चेहरा जरी समोर आला तरी एक बेवडा दिसू लागतो आणि चेहऱ्यावर हास्य फुलतं !चुपके चुपके, गोलमाल, शोले, आप की कसम, पडोसन, गुड्डी, मेरे हम सफर, बॉम्बे टू गोवा, जंजीर, लोफर, प्रतिज्ञा अशा अगणित चित्रपटातून त्यांनी प्रेक्षकांचे भरभरून मनोरंजन केले. जवळपास १५० चित्रपटातून त्यांनी छोट्या आणि मोठ्याही भूमिका साकारल्या आहेत. १९८१ मध्ये आलेल्या खुबसुरत या चित्रपटासाठी त्यांना सर्वश्रेष्ठ विनोदी अभिनेत्याचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला.

 

आयुष्यभर प्रेक्षकांना भरभरून हसवणारा आणि मनोरंजन करणारा हा कलाकार आयुष्याच्या मावळतीला अत्यंत संकटात आला होता. दु:ख त्यांच्या वाट्याला आलं होतं. २ मार्च १९८२ रोजी या हास्य कलावंताचं निधन झालं. प्रेक्षकांना मनमुराद आनंद देणारा हा कलावंत निघून गेला आणि रसिकांचे डोळे पाणावले ! 

- अशोक गोडगे       

----------------------------------     




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !