BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१९ डिसें, २०२१

हे तलवार, दे दे मेरे आठ हजार !

 


मुसाफिर हुँ याराे...

ना घर है, ना ठिकाणा,

मुझे चलते जाना है...

बस्स, चलते जाना है....


असं म्हणत अगणित चाहत्यांचं मनाेरंजन करणारा एक मुसाफिर किशाेरकुमार,  एक दिवस खराेखरच निघून गेला आणि संगीताची दुनिया पाेरकी झाली. किशाेरकुमार खराेखरच एक मुसाफिर हाेता, १३ ऑक्टाेबर १९८९ हा दिवस संगीत क्षेत्रासाठी काळा दिवस ठरला. आपला जादुई आवाज इथंच ठेऊन किशाेरकुमारांनी या दुनियेचा निराेप घेतला. मायावी दुनियेत क्षणाक्षणाला स्थित्यंतरे हाेतात पण किशाेरकुमारांना जाऊन तब्बल वीस वर्षे झाली पण अजूनही त्यांची जागा रिकामीच आहे आणि कधी ती भरून निघेल असे वाटण्यालाही आता जागा नाही. लाखाे कराेडाे चाहत्याच्या हृदयावर अधिराज्य गाजविणाऱ्या किशाेरकुमारांचं आयुष्य मात्र एक काेडं बनलेलं हाेतं. त्यांच्या जीवनात अनेक वादळे निर्माण झाली,  खऱ्या  खाेट्या आराेपांच्याफैरी त्यांना झेलाव्या लागल्या.  त्यांच्या एकलकाेंडेपणाबध्दलही बरीच ओरड झाली परंतू मायावी नगरीत अशी गफलत हाेतच राहते आणि त्याची झळ ज्याला बसायची त्याला बसतेच. एकदा महंमद रफी आणि किशाेरकुमार यांच्यातील संबंध चांगले नाहीत असं छापून आलं आणि एकच गाेंधळ उडाला हाेता. रफींनी  मात्र ते हसण्यावर नेलं आणि आमचे संबंध आमच्यापेक्षा या नियतकालिकालाच अधिक माहित असावेत असं सांगून हवा काढली. महंमद रफीपेक्षा किशाेरकुमार लहान असले तरी रफी किशाेरकुमारला दादा म्हणायचे, पण हे किशाेरकुमारांना ते आवडत नव्हतं. पार्श्वगायक म्हणूनही आणि वयानंही रफी  अगाेदरचे हाेते पण प्रत्येक बंगाली माणसाला आपण दादा म्हणताे असं रफीनं सांगितल्यावर त्यांना कसंबसं ते पटलं. रफी  म्हणायचे, ‘गायक म्हणून किशाेरकुमार मला खूप आवडताे, गाण्याचा मूड पाहून ताे प्रत्येक गाणं गात असताे त्यामुळं त्याचं गाणं श्रवणीय हाेतं’.




किशाेरकुमारने आवाजाच्या दुनियेत अलाैकिक यश मिळवलं पण त्याला कधी याचा गर्व नव्हता, अहंकाराची बाधा झाली नाही. एवढ्या महान गायकानं कधी त्याची प्राैढीही मिरवली नाही. रफीसह सगळ्यांकडूनच त्याचे आणि त्याच्या गाण्याचे काैतुक व्हायचे, तरीही त्याने याबाबतचा आपला नम्रपणा कधी साेडला नाही. गाण्यातले जे काही आपल्याला समजले नाही त्याची ताे माेकळेपणे कबुलीही द्यायचा. स्वत: रसिकमान्य गायक असतानाही पडद्यावर दुसऱ्यांचा  आवाज घ्यायचाही त्याला कधी कमीपणा वाटला नाही. एका शास्त्रीय गाण्यासाठी किशाेरकुमारने रफीचा आवाज उसना घेतला हाेता. तसं पाहिलं तर एकाच क्षेत्रातील दाेन बड्या व्यक्तींच्यात परस्परात  किमान मत्सराची भावना तरी असतेच पण इथं तेही कधी दिसलं नाही. एका म्यानात दाेन तलवारी बसत नाहीत पण इथं मात्र 'एक म्यान आणि दाेन तलवारी' चपलख बसत. किशाेरकुमारांच्या नावाला गायक म्हणूनच अधिक प्रसिध्दी मिळाली, पण किशाेरकुमार हे एक वास्तव अभिनयाचे अभिनेतेही हाेते. अभिनयापेक्षा गाण्यातच त्यांची अधिक प्रभावी ओळख झाली आणि त्यांच्यातील अभिनेता गुदमरून गेला. ‘चलती का नाम गाडी’, ‘दूर गगन की छाँव में’, ‘मुसाफिर’, ‘दिल्ली का ठग’, ‘गर्ल फ्रेंड’, ‘मनमाैजी’, ‘नाैकरी’ आदी 34 चित्रपटांतून त्याने भूमीका केल्या पण तरीही अभिनयापेक्षा गायकीतच त्यांचे खरे नाव झाले. ‘दूर गगन की छाँव मे’  हा तर त्यांचा असामान्य चित्रपट ठरला. अत्यंत जीव ओतून त्यांनी या चित्रपटात अभिनय केला आहे पण त्यांचा ‘चलती का नाम गाडी’ हाच चित्रपट प्रेक्षकांना अधिक भावला आणि स्मरणातही राहीला. या एका चांगल्या विनाेदी चित्रपटाची निर्मिती किशाेरकुमारने केली. आजही दूरदर्शनच्या पडद्यावर हा चित्रपट आला तरी प्रेक्षक एकाग्र हाेऊन पाहतात आणि मनमुराद दाद देतात पण  याच चित्रपटाने किशाेरकुमारांकडे पाठ फिरवली आणि तेंव्हापासून त्याच्यातील अभिनेता त्यांच्यापासून दूर जाऊ लागला.


पार्श्वगायन आणि अभिनय या दाेन्ही कला एकाच व्यक्तिंच्या जवळ असणं हे त्याकाळी तसं दुर्मिळच. गायक हा नायक आणि नायक हा गायक हाेत नव्हता. हल्ली गायक जमतील तशी गाणी गाताे आणि काॅमेडीसुध्दा (!) करताे.  नायकही गाणी गाताे.  हल्ली काहीही आणि कसंही घडतं पण त्याकाळी तसं नव्हतं. गुणवत्तेलाच महत्व दिलं जात हाेतं, तसं आज नसतं. त्याकाळीही किशाेरकुमार यांनी आपल्याकडील या दाेन्हीही प्रतिभा तेवढ्याच समर्थपणे जगाला दाखऊन दिल्या. गायक म्हणून नाव मिळाल्यानंतर छाेटी माेठी भूमीका करणारे अनेकजण आपण पडद्यावर पाहिलेले आहेत. नायक म्हणून नाव मिळालेलेही अनेकजण गाणी गाऊन गायक हाेऊ घातलेले आहेत पण त्याकाळी तसं नव्हतं. किशाेरकुमार यांच्याकडे कसलंही नाव नसताना त्याने गाणीही गायली आणि अभिनयही केला. कलाकार हा जन्मावाच लागताे असं म्हणतात ना! किशाेरकुमारांनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश करताना गायन आणि अभिनय अशा दाेन्ही कला घेऊनच प्रवेश केला. या महान गायकाने सर्वप्रथम आपला आवाज सदाबहार नायक देवानंद यांच्यासाठी दिला हाेता.


मरनेकी दुआएं क्यू मांगू,

जीनेकी तमन्ना काैन करे..


किशाेरकुमारचं हे पहिलं चित्रपट गीत.बाँबे टाॅकिजचा ‘जिद्दी’ चित्रपट 1९४८ साली आला हाेता. या चित्रपटासाठी किशाेरकुमारनं सर्वप्रथम या गाण्याला आपला आवाज दिला. याच चित्रपटात किशाेरकुमारनं एका माळ्याची लहानशी भूमीका करून अभिनयाचाही श्रीगणेशा केला आणि लहानशी भूमीका करणारा हा बंगाली बाबू पुढे माेठा अभिनेता झाला. ‘चलती का नाम गाडी’, ‘प्यार किये जा’, ‘शरारत’, ‘पडाेसन’, ‘झुमरू’, ‘दूर गगन की छाँव में’ अशा कितीतरी चित्रपटातून त्याने जिवंत आणि नैसर्गिक अभिनयाचे दर्शन घडविले. किशाेरकुमार म्हणजे पैलू पाडलेला एक कसदार हिरा हाेता. अभिनयातील विविधता त्याच्याकडे हाेती, अवखळ विनाेदी भूमीका जशा ताे साकारायचा तशाच धिरगंभीर भूमीकातही त्याने आपला जीव ओतला. गाण्यातही त्याने आपला प्राण ओतला, झिंग आणणारे गाणे, तरूणांना नाचायला लावणारे गाणे गाणारा किशाेर श्राेत्यांना डाेळ्यातनं पाणीही काढायला लावताे. किशाेरचं ‘याडलिंग’ हे तर त्यानंच आणलं, त्यालाच जमलं. किशाेरला मिठाई खूप आवडाची, रबडी तर त्याची अगदीच आवडीची.


किशाेरकुमारच्या एकलकाेंड्या स्वभावाबध्दल मात्र सतत वादळ उठत राहिलं पण किशाेरकुमारला लाेकांचे हे आराेप मान्य नव्हते. किशाेर लहरी हाेता  आणि आपल्या खाजगी जीवनात डाेकावलेलं त्याला आवडत नव्हतं. ताे चिडला की मग त्याच्यावर असे एकलकाेंडेपणाचे आराेप व्हायचे. त्याच्या चार विवाहाबध्दल चर्चा व्हायची. किशाेरच्या लहरीपणाचा प्रत्येकानं वेगळा अर्थ घेतला. रफी, मुकेश आणि किशाेर कुमार हे त्रिकुट आपापलं वेगळेपण सांभाळून हाेते. दिलीपकुमारसाठी रफी, राजकपूरसाठी मुकेश आणि देवानंदसाठी किशाेर आवाज देत हाेते. किशाेरने पुढे राजेश खन्ना, अमिताभ यांच्यासाठीही आवाज दिले. मुकेश यांच्या निधनानतर राज कपूर म्हणाले हाेते, ‘मुकेशबराेबर माझा आवाजही गेला, रफी गेला, दिलीपचाही आवाज गेला. शेवटी उरला ताे किशाेर’. किशाेरकुमारही खांडव्याला जाऊन विश्रांती घेण्याच्या विचारात हाेता पण काळाने त्याची ही मनिषा पूर्ण हाेऊ दिली नाही. मनात एक हाेतं पण घडलं दुसरंच.. किशाेर कायमच्या विश्रांतीला निघून गेला. जिवनाबध्दल काेण काय सांगणार? किशाेर गेला आणि रेडिओवर त्याचच गाणं वाजू लागलं,

‘जिंदगी इक सफर, है सुहाना

यहाँ कल क्या हाेगा किसने जाना...’


किशोरकुमार म्हणजे एक अफलातून माणूस ! वेदना घेऊन जगला पण इतरांना आनंद दिला. लहरी, हेकेखोर म्हणूनही प्रसिद्धीला आला. त्यांच्या आयुष्यातील ढीगभर किस्से असे चर्चेचे आहेत.  त्यांनी आपल्या घराच्या बाहेर लावलेली पाटी तर कायम चर्चेत राहिली. शहरात लोक घरात कुत्री पाळतात आणि दारात, गेटवर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी लावतात. अगदी तशाच प्रकारे किशोर कुमार यांनीही आपली घरावर एक पाटी लावली होती पण ती कुत्र्यापासून सावध करणारी नव्हती. त्यांनी लावलेल्या पाटीवर लिहिलेले होते. "किशोरकुमार से सावधान"!  एकदा निर्माते आणि दिग्दर्शक असलेले एच. एस. रवैल त्यांच्या घरी गेले. किशोरकुमारचे काही राहिलेले पैसे देण्यासाठी ते गेले होते. पैसे दिल्यानंतर त्यांनी किशोरकुमारचा हात हातात घेतला पण किशोरकुमारांनी तो थेट आपल्या तोंडात घातला आणि चावायला सुरुवात केली. अचानक घडलेल्या या अनोख्या प्रकाराने रवैल गोंधळले तेंव्हा किशोरकुमार म्हणाले. 'आपण दारावरची पाटी वाचली नाही वाटतं ? "किशोरकुमार से सावधान" !    


आपल्या हक्काच्या पैशाबाबत किशोरकुमार प्रचंड सतर्क होते. व्यवहार म्हणजे व्यवहार ! ठरलेले पैसे पूर्ण मिळायलाच हवेत हा त्यांचा अट्टाहास. नाही मिळाले तर ते काही काय करतील याचा कुणालाच भरवसा नव्हता. अनेकांना याचा अनुभवही आलेला आहे. एका चित्रपटात काम करीत असताना निर्मात्याने त्यांना ठरल्यापेक्षा अर्धीच रक्कम दिली होती. किशोर कुमार यांना हे आवडलं नव्हतं. त्यांनी मग चित्रीकरणावेळीच निर्मात्यांना चांगलीच अद्दल घडवली. शुटींगवेळी किशोरकुमार अर्धीच मेकअप करून सेटवर आले. दिग्दर्शकांनी ते पाहिलं आणि त्यांनी किशोर कुमार यांना पूर्ण मेकअप करून येण्यास सांगितले. तेंव्हा किशोर कुमार दिग्दर्शकाला म्हणाले, " आधा पैसा, आधा काम .. पुरा पैसा, पुरा काम ! "  


आणखी एका हिंदी चित्रपट निर्मात्यांची तर किशोर कुमार यांनी चांगलीच जिरवली होती. निर्माता आर. सी. तलवार हे एका चित्रपटासाठी किशोर कुमार यांना घेऊन काम करीत होते.  या महाशयांनीही किशोर कुमार यांच्या कामाचे अर्धेच पैसे दिले होते. किशोर कुमार आपल्या कामाचे पैसे असे केसे बुडून देतील ? किशोर कुमाराच ते ! निर्माता उरलेले पैसे द्यायला चालढकल करीत आहे म्हटल्यावर किशोर कुमार यांनीही एक शक्कल लढवली. रोज सकाळी ते निर्माते तलवार यांच्या घराच्या समोर जात होते आणि जोरजोरात ओरडत होते . " हे तलवार, दे दे मेरे आठ हजार",  'हे तलवार, दे दे मेरे आठ हजार !' 

  - अशाेक गाेडगे

--------------------

हे वाचा : >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !