BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ जाने, २०२२

--आणि निळूभाऊ म्हणाले, 'आरं, बाई तरी बदला' ..!




--आणि निळूभाऊ म्हणाले, .


'आरं, बाई तरी बदला '..!



निळू फुले ! बस्स, नाम ही काफी है ! मोठा कलावंत पण त्यापेक्षाही मोठा माणूस ! आभाळाएवढा ... नव्हे, आभाळापेक्षाही मोठा.. उत्तुंग ! जेवढा मोठा तेवढाच साधेपणा ! ना कसला गर्व ना कसला डामडौल ! काही काही वर्षांच्या अंतरानं माझ्या चार पाच भेटी झाल्या, कधी घाईघाईत तर कधी निवांत गप्पा टप्पा ! एकदा त्यांच्यासोबत चित्रपटात भूमिका करण्याची वेळ चालून आली, मी त्यांच्यासाठी एक भूमिका लिहिली होती. त्यानिमित्तानं त्यांच्या घरी गेलो तर त्यांच्या डोळ्यावर शस्त्रक्रिया झालेली आणि प्रकाशापासून दूर राहण्याचा सल्ला त्यांना मिळालेला. संधी हुकली ती कायमचीच!  अत्यंत नम्र आणि एवढे मोठेपण मिळूनही इतके साधेपण जपणारा हा असामान्य माणूस ! वेगवेगळ्या भूमिका करायची इच्छा असूनही सतत खलनायक मिळत गेला. तरीही 'कुली', 'ओ सात दिन', 'चोरीचा मामला', 'हात लावीन तिथं सोनं', 'पिंजरा', सिहांसन', 'सामना' असे काही चित्रपट आणि 'नाजूका' सारखी मालिका यात त्यांना वेगळ्या छटा असलेल्या भूमिका मिळाल्या आणि त्यांनी कायमची छाप सोडली. त्यांच्या आयुष्यावर आणि चित्रपट कारकीर्दीवर कुणीही कितीही लिहिलं तरी पूर्णत्व येणार नाही आणि येथे माझा तो हेतूही नाही. 


निळूभाऊ फुले यांचे हस्ताक्षर !


मराठी पडद्यावरचा त्यांचा खलनायक मराठी प्रेक्षकांनी कायम स्वीकारला होता. अलीकडे त्यांच्या नावावर खपवलेला 'बाई वाड्यावर या' ! याच्याशी त्यांचा काही संबंध नाही पण त्यांचा खलनायक मराठी महिलांच्या सतत शिव्या खात राहिला. पडद्यावर त्यांची एन्ट्री झाली की चित्रपटगृहात बसलेल्या बायका नाक मुरडत बोटं मोडायला आणि शिव्या द्यायला सुरुवात करायच्या ! सरपंचापासून आमदार, मंत्र्यांपर्यंत भूमिका असली की ती निळूभाऊंनीच करायची. निर्मात्यांना आणि प्रेक्षकांना या भूमिकांसाठी दुसरा कलाकार मान्यच नसायचा ! अत्यंत साधे, प्रचंड प्रेमळ आणि समाजसेवी वृत्तीने निळूभाऊ पडद्यावर आले की प्रेक्षक शिव्या घालायचेच ! पडद्यावर कशाला ? त्यांची प्रतिमाच अशी काही वाईट बनून गेली होती की ते कुठेही दिसले तरी महिलांना भीती वाटायची.



निळूभाऊ एक किस्सा वारंवार सांगायचे, नाटकाच्या दौऱ्यानिमित्त ते कोकणात गेले होते. तिथल्या एका त्यांच्या परिचित मित्रानं निळूभाऊंना घरी जेवणासाठी निमंत्रण दिलं. या मित्रानं आपल्या घरीही 'मोठ्ठा माणूस आपल्या घरी जेवायला येणार आहे, सगळी बडदास्त नीटनेटकी ठेवा' असं फर्मान काढलं होतं . साहजिकच या कुटुंबानं या मोठया माणसाच्या स्वागताची जय्यत तयारी केली होती. निळूभाऊ या मित्रांसोबत जेवणासाठी त्याच्या घरी गेले. दारात पाय ठेवताच या मित्राच्या वयोवृद्ध आजीने 'कोण मोठा माणूस आहे' ? या उत्सुकतेनं पहिला तर समोर निळूभाऊ दिसले. निळूभाऊंना पाहताच या आज्जीबाईचा पारा असा काही चढला की तिने बोटं मोडत शिव्या घालायला सुरुवात केली. निळूभाऊंना पाहताच ही आजीबाई जवळजवळ किंचाळलीच, 'आरं आरं ... या मुडद्याला घरात कशाला घेतलं' ? ह्याला चपलेनं हाणाय पायजे' म्हणत आजीबाई संतापल्या. निळूभाऊंच्या या मित्राचा चेहरा भलताच केविलवाणा झाला होता. आवर्जून घरी आणलेल्या निळूभाऊंच्या दारातच असा अपमान  सहन होत नव्हता. त्याने आजीबाईची समजूत काढण्याचा प्रयत्न केला खरा पण उपयोग झाला नाही. आजीबाई म्हणाल्या,  'काय सांगू नको, मला समदं माहिती हाय, म्या चांगलं वळकते या मुडद्याला'! निळूभाऊ मात्र हसत होते. त्यांनीच समजूत काढली आपल्या या मित्राची !



चित्रपटात अस्सल खलनायक साकारणारे निळू फुले खऱ्या आयुष्यात समाजाला दिशा दाखविणारे खरेखुरे नायक होते. निळूभाऊ यांच्या जीवनावर एक चित्रपट आता येऊ घातलाय ! निळूभाऊंच्या आयुष्याचा प्रवास नव्या पिढीलाही मोठ्या पडद्यावर लवकरच पाहायला मिळणार आहे !


 

अशोक गोडगे आणि निळूभाऊ फुले !


काय होणार दुसरं ? त्याकाळी तर चित्रपटांचा खूप पगडा होता मराठी माणसांवर ! आणि निळू भाऊंची भूमिका म्हटलं की, गरीब महिलेवर अत्याचार करणारा, कुणाच्या चांगल्या संसारात आग लावणारा, नाहीतर गावात माणसामाणसात भांडणं लावणारा खलनायक ! निळू फुले म्हटलं की तो वाईट माणूस अशी पक्की धारणाच झालेली. गावात कुणी वाईट वागणारा माणूस असला तरी गावकरी त्याला 'निळू फुले' म्हणायचे ! एवढी त्यांच्या भूमिकांची छाप तळागाळापर्यंत पोहोचलेली. त्याकाळी पडद्यावरचा कलावंत प्रत्यक्षात पाहायला मिळणं जवळपास अशक्यच ! चित्रपटांच्या पडद्याशिवाय कलावंतांची छबी दिसायचे दुसरे माध्यम नव्हते. आणि निळूभाऊ पडद्यावर जेंव्हा दिसायचे ते खलनायक म्हणून !   व्यक्तिगत जीवनात 'देवमाणूस' असलेल्या निळूभाऊंना खेडोपाडी, वाडी वस्त्यांवर केवळ एक अत्यंत वाईट प्रवृत्तीचा माणूस म्हणून ओळख मिळाली होती, अर्थात हीच तर त्यांच्या जिवंत अभिनयाची खरीखुरी पावती होती !


जवळपास त्यांच्या सगळ्याच चित्रपटात त्यांना अत्याचार, बलात्कार अशी दृशे साकारावी लागायची. अशा दृश्यांच्या चित्रीकरणाचाही कंटाळा आल्याचं निळूभाऊ अनेकदा बोलून गेले. निळूभाऊशिवाय मराठी चित्रपट नाही आणि एखाद्या तरी बलात्काराच्या दृष्याशिवाय निळूभाऊंची भूमिका नाही. हे अगदी पक्कं समीकरणच ठरून गेलं होतं ! अशा दृश्यांच्या चित्रीकरणासंदर्भातला निळूभाऊंचा एक धम्माल किस्सा आहे. निळूभाऊंचं एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या चित्रपटांचं शूटिंग होतं. त्या दिवशीच्या पहिल्या शूटिंगच्या सेटवर निळूभाऊ पोहोचले. एक सावकार (अर्थात निळूभाऊ) एका गरीब शेतकऱ्याच्या पत्नीवर अत्याचार करतो असा प्रसंग चित्रित करायचा होता. दिग्दर्शक दत्ता माने यांनी सर्व तयारी पूर्ण केली होती. गरीब सावकाराची पत्नी होत्या अभिनेत्री जयश्री गडकर.  या दृश्याचे चित्रीकरण झाले आणि निळूभाऊ तेथून दुसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी निघून गेले. 


दुसऱ्या चित्रपटाच्या सेटवर पोहोचल्यावर त्यांनी दिग्दर्शकांकडे दृष्याबाबत चौकशी केली. तेथेही दिग्दर्शकाने सगळी तयारी करून ठेवली होती आणि दृश्यही तसेच होते. एक महिलेची अब्रू घेण्याचा प्रसंग येथेही चित्रित करायचा होता. निळूभाऊ या चित्रीकरणासाठी सज्ज झाले. तेथेही ज्या महिलेची अब्रू घ्यायची आहे ती महिला होती पुन्हा जयश्री गडकर ! निळूभाऊंनी हा सीन चित्रित केला आणि तिसऱ्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी तिसऱ्या सेटवर गेले. तेथेही महिलेवर अत्याचार करण्याचाच सीन होता आणि ती महिलाही होती जयश्री गडकरच ! खरं तर निळूभाऊ वैतागले होते, तरीही दिग्दर्शकांना त्यांनी जो सल्ला दिला त्यावर अख्ख्या सेटवर मात्र हास्यकल्लोळ उडाला.   दिग्दर्शकाला  निळूभाऊ म्हणाले, 'प्रसंग तोच ठेवता, निदान बाई तरी बदला'                          

               - अशोक गोडगे  

 


हे देखील वाचा :>>

......................................

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !