BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१६ डिसें, २०२१

हिंदी चित्रपटातील नामांकित अभिनेत्यावर आली ढाब्यावर भजी तळण्याची वेळ !

 



कुणावर कधी आणि कशी वाईट वेळ येईल हे नाही कुणाला सांगता येत ! तसं पाहिलं तर जीवनाचंच हे सत्य आहे. रंकाचा राव आणि रावाचा रंक कधी होईल हे कुणाला सांगता येत नाही आणि ते कुणाच्या हातीही नसतं ! माणूस ठरवतो एक आणि घडते मात्र दुसरेच .. नियतीच्या हातातल्या गोष्टी सगळ्या. ही नियती कुणालाही आणि कुठेही नेऊन ठेवते आणि मग आयुष्याचं सारं गणितच बिघडून जातं ! हिंदी चित्रपट सृष्टीतील एका नामवंत आणि प्रतिभावंत कलाकारावर अशीच एक वेळ आली आणि झगमगाटाच्या दुनियेतून रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर भजी तळायची आणि लोकांचे उष्टे कप धुवायची वेळ आली !


संजय मिश्रा ! घराघरात पोहोचलेला दमदार कलावंत. 'ऑफिस ऑफिस' ही मालिका प्रचंड लोकप्रिय झाली होती आणि या मालिकेने या कलावंताला प्रत्येक घरात पोहोचवले.  हिंदी चित्रपटाच्या पडद्यावरील एक आश्वासक चेहरा म्हणून त्यांची प्रेक्षकांना ओळख आहे. सत्या, 'फिर भी दिल है हिंदुस्थानी ' , 'बंटी और बबली', 'दिल से',  'गोलमाल ', 'बॉंबे टू गोवा', 'धमाल', 'वेलकम', 'गोलमाल रिटर्न', 'अतिथी, तुम कब जाओगे', 'भूतनाथ रिटर्न' आदी चित्रपटांची भली मोठी यादी आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्कारांचीही मोठी यादी तयार झाली आहे. दूरदर्शन वाहिन्यांवरील लोकप्रिय मालिका आणि हिंदी चित्रपट यातून त्यांचा चेहरा नेहमीच पाहायला मिळतो. अत्यंत सहजसुंदर अभिनय करणारा हा कलाकार प्रेक्षकांना निखळ आनंद देतो पण याच कलाकारावर मन सुन्न करणारी वेळ आली आणि रुपेरी पडद्यावरून हा अभिनेता एका ढाब्याच्या अंधाऱ्या कोपऱ्यात अंडा ऑम्लेट, भजी तळू लागला, लोकांचे उष्टे कप विसळू लागला. अभिनेता संजय मिश्रा यांची या दुर्दैवी प्रसंगाची माहिती दिली आहे. 


काही वर्षांपूर्वी संजय मिश्रा अत्यंत त्रासिक आजाराने ग्रस्त झाले होते. त्यांच्या पोटात इन्फेक्शन झाल्याचे नंतर समोर आले. सतत अंथुरणावर खिळून राहण्याची वेळ त्यांच्यावर आली. हे दिवस ते आपल्या वडिलांच्या जवळ काढत होते पण एके दिवशी अचानक त्यांच्या वडिलांचे निधन झाले आणि संजय मिश्रा एकटे पडले. वडिलांच्या निधनानंतर ते आतून खूपच उद्ध्वस्त झाले, मनानं खचून, ढासळून गेले. याच अस्वस्थ मानसिकतेत त्यांनी मुंबई सोडली आणि थेट ऋषिकेश गाठले. ऋषिकेश येथे पोहोचले पण पोटासाठी काही करणे आवश्यक होते. चित्रपटसृष्टी सोडून ते खूप दूर आले होते आणि नवं जीवन जगण्यासाठी काहीतरी करणं क्रमप्राप्त होतं.  रस्त्याच्या कडेला असलेल्या एका ढाब्यावर त्यांनी काम करायला सुरुवात केली. आपली ओळख लपविण्याचा आटोकाट प्रयत्न त्यांनी केला.


लखलखीत प्रकाशझोतात रमणारा हा कलाकार गरम भट्टी खोलीत पोहोचला होता. सगळं जीवन बदलून टाकलं होतं..  ढाब्यावर ऑम्लेट बनवणे, भट्टीवर उभे राहून भजी तळणे, मधूनच लोकांचे उष्टे कप धुणे अशी कामे त्यांनी सुरु केली. या कामासाठी त्यांना केवळ १५० रुपये मिळायचे. कधी मॅगी विकून चार पैसे मिळविण्यासाठी त्यांची धडपड सुरु असायची.  गोलमाल चित्रपटातील त्यांची भूमिका त्यावेळी गाजलेली होती आणि ढाब्यावर लोक त्यांना ओळखत होते. संजय मिश्रा यांनी ओळख लपविण्याचा प्रयत्न केला तरी ती लपली जात नव्हती आणि नाही म्हटलं तरी ही ओळख त्यांना अडचणीची ठरत होती. 


वाचा : दिग्दर्शकाने कुत्र्यासारखं भुंकायला लावलं होतं या मोठ्या अभिनेत्याला !


दररोज पन्नास उष्टे कप धुण्याची त्यांच्यावर जबाबदारी देण्यात आली होती. ढाब्यावर लोक त्यांना ओळखायचे. गोलमाल चित्रपटाचा संदर्भही द्यायचे आणि त्यांच्यासोबत फोटोही काढायचे. यादरम्यान त्यांच्या आईचे फोन त्यांना यायचे आणि ती संजय मिश्रा याना परत बोलवायची. आई फोनवर रडायची आणि संजय मिश्रा यांचे काळीज गलबलून जायचे. अभिनयाचे शिक्षण घेऊन मायानगरीत अवतरलेले संजय मिश्रा अचानक या वेगळ्या दुनियेत रमण्याचा प्रयत्न करीत होते. चित्रपटाकडे कधीच परतायचं नाही असा निर्धार ते करीत होते आणि अचानक एके दिवशी रोहित शेट्टी यांच्या कार्यालयातून संजय मिश्रा यांना फोन आला. 'ऑल द बेस्ट' या चित्रपटातील भूमिकेसाठी हा फोन होता. संजय मिश्रा यांनी अखेर रोहित शेट्टी यांचे कार्यालय गाठले आणि भट्टीच्या खोलीतील घुसमट कायमची थांबली. मिश्रा पुन्हा रुपेरी दुनियेत प्रकटले ! 

               

                   - अशोक गोडगे       

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !