BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१ मे, २०२२

जेष्ठ आणि गुणी मराठी अभिनेत्री प्रेमा किरण यांचे निधन !

 

अशोक गोडगे आणि प्रेमा किरण : चित्रपट > भक्तीची सत्वपरीक्षा !


पुणे : मराठी चित्रपट क्षेत्रातील आघाडीच्या आणि प्रसिद्ध अभिनेत्री प्रेमा किरण यांचे आज निधन झाले असून त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. 


आज महाराष्ट्र दिनी प्रेमा किरण यांचे पहाटे हृदयविकाराने निधन झाले असून त्यांनी वयाच्या ६१ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांच्यासोबत 'धुमधडाका' या चित्रपटातून त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्या होत्या. माहेरचा आहेर, दे दणादण, अर्धांगी, गडबड घोटाळा, सौभाग्यवती सरपंच, पागलपन, कुंकू झाले वैरी, लग्नाची वरात, लंडनच्या घरात अशा अनेक चित्रपटातून त्यांनी अभिनय साकारला होताच पण त्यांनी 'उतावळा नवरा' आणि 'थरकाप' या चित्रपटांची निर्मिती देखील केली होती. मराठीसह गुजराती, भोजपुरी, अवधी, बंजारा भाषेतील चित्रपटात देखील त्यांनी महत्वपूर्ण भूमिका केल्या होत्या. अलीकडेच त्यांच्या एकुलत्या एका मुलाचे निधन झाले होते आणि तेंव्हापासून त्या एकट्या पडल्या होत्या. 


१९८०-९० च्या दशकात त्यांनी गाजलेल्या अनेक चित्रपटातून भूमिका केल्या होत्या, लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या जोडीने त्यांनी दिलेले काही चित्रपट मराठी प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. 'धुमधडाका' मधील 'अंबाक्का' ही त्यांची व्यक्तिरेखा प्रचंड गाजली आणि 'पोलीसावल्या, सायकलवाल्या' हे त्यांच्यावर चित्रित झालेलं गाणं आजही मराठी प्रेक्षकांच्या ओठावर आहे. (Actress Prema Kiran passes away) अशोक सराफ, महेश कोठारे, दादा कोंडके यांच्यासोबतचे अनेक चित्रपट गाजले आहेत. 


पंढरपूरशी संबंध !

पंढरीत वामनराव गायकवाड निर्मित 'भक्तीची सत्वपरीक्षा' या चित्रपटाचे चित्रीकरण करण्यात आले तेंव्हा काही दिवस त्यांचा पंढरीत मुक्काम होता. पंढरपूरबद्धल त्यांना कायम जिव्हाळा होता आणि येथील स्थानिक कलावंतासोबत त्यांनी अत्यंत आपुलकीचे नाते निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांशी देखील त्या मोकळेपणे संवाद साधताना दिसत होत्या. 


लावणी स्पर्धेला हजेरी 

सहकार शिरोमणी वसंतदादा काळे सहकारी साखर कारखान्यावर आयोजित केलेल्या लावणी स्पर्धेस प्रेमा किरण उपस्थित राहिल्या होत्या.  यावेळी प्रेक्षकांच्या आग्रहास्तव त्यांनी 'झाल्या तिन्ही सांजा' हे गाणे सादर करून प्रेक्षकांना आनंद दिला होता. 


नापासांच्या शाळेला भेट 

अभिनेत्री प्रेमा किरण या आपल्या काही सहकारी कलावंतासोबत पंढरीच्या विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी आल्या होत्या. यावेळी त्यांना भैया सर यांच्या नापासांच्या शाळेबाबत माहिती मिळाली असता त्यांनी व्यस्त कार्यक्रमात देखील 'नापासांची शाळा' पहिली. यावेळी या शाळेचे प्रमुख पांडुरंग भुजंगे यांनी त्यांचे स्वागत केले होते.   

 

हे देखील वाचा :>

   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !