पंढरपूर : एस. टी. कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते सतत नवनव्या अडचणीत येत असताना पंढरीत देखील मराठा समाज आक्रमक झाला असून आता सदावर्ते विरोधात पंढरीत गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
वकील असलेले गुणरत्न सदावर्ते हे शरद पवार यांच्या निवासस्थानावरील हल्ल्यापासून सातत्याने अडचणीत येत आहेत. बेताल विधानांमुळे चर्चेत राहिलेले सदावर्ते आता कायद्याच्या कचाट्यात अडकू लागले असून मराठा आरक्षणाच्या विषयाने त्यांनी केलेली विधाने मराठा समाजाला असह्य झालेली आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज उदयनराजे आणि छत्रपती संभाजीराजे यांच्यासंदर्भात केलेल्या विधानामुळे सातारा पोलिसांनी त्यांना अटक केली होती. चार दिवस पोलीस कोठडीची हवा खाल्ल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे तथापि राज्यातील इतर पोलीस ठाण्यात देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्या प्रकरणी देखील त्यांना अटक होण्याची शक्यता आहे.
सातारा नंतर पुणे, कोल्हापूर, अकोला पोलीस सदावर्ते यांना ताब्यात घेण्याची चिन्हे असून पंढरपूर येथेही सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करावा यासाठी मराठा समाज आक्रमक झालेला आहे. मराठा समाजाबद्धल सतत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्ये केल्याप्रकरणी सदावर्ते विरोधात गुन्हा दाखल करावा अशी मागणी मराठा समाजाने पंढरपूर शहर पोलिसांकडे केली आहे. मराठा समाजाच्या विविध संघटनांनी सदावर्ते विरोधात जोरदार घोषणाबाजी करीत त्यांचा निषेध देखील केला आहे. पंढरीतील मराठा संघटना अत्यंत आक्रमक झालेल्या असून सदावर्ते विरोधात दोन दिवसात गुन्हा दाखल न झाल्यास मराठा समाज तीव्र आंदोलनाचे हत्यार उपसणार असून तशी घोषणा देखील करण्यात आली आहे.
विविध माध्यमांतून गुणरत्न सदावर्ते मराठा समाजाच्या बद्धल बदनामीकारक वक्तव्ये करीत आहेत, छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज तसेच मराठा समाजातील महिला यांच्याबाबत करण्यात आलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. शिवाय जाती जातीत तेढ निर्माण होत आहे त्यामुळे त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करावा अशा मागणीचे एक निवेदन मराठा संघटनांनी पंढरपूर शहर पोलिसात दिले आहे.
कारवाईचे आश्वासन !
गुणरत्न सदावर्ते विरोधात तत्काळ गुन्हा दाखल करण्याचा मराठा संघटनांचा आग्रह होता परंतु याबाबत दोन दिवसात कार्यवाही करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले.. वादग्रस्त वक्तव्याचे व्हिडीओ तसेच इतर माहिती घेवून याबाबत दोन दिवसात कार्यवाही करण्याचे आश्वासन पोलिसांनी दिले आहे, (Awaiting filing of case against Gunaratna Sadavarte in Pandharpur) त्यामुळे आता पंढरीत देखील गुन्हा दाखल होण्याची प्रतीक्षा आहे.
कोल्हापूर पोलीस मुंबईत !
कोल्हापूर येथील शाहूपुरी पोलीस ठाण्याचे विशेष पथक आज सकाळीच मुंबईत दाखल झाले असून गुणरत्न सदावर्ते यांचा ताबा घेणार आहेत त्यामुळे आज रात्री पर्यंत कोल्हापूर पोलीस त्यांना अटक होण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच सदावर्ते विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बीड मध्येही गुन्हा !
छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी अपशब्द वापरणे, मराठा समाजाला अत्याचारी म्हणून संबोधित करणे, मराठा आरक्षणाबाबत वेळोवेळी मराठा समाजाचा अपमान करणे आणि भावना दुखावणे याबाबत गुणरत्न सदावर्ते विरोधात बीड येथेही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे सदवार्तेना बीड चा प्रवास देखील करावा लागणार आहे.
सदावर्ते कारागृहात !
सातारा न्यायालयाने सदावर्ते यांना न्यायालयीन कोठडीचा आदेश केल्यानंतर त्यांना मुंबईतील कारागृहात पाठवण्यात आले आहे. शाहूपुरी पोलीस आज त्यांचा ताबा मिळविण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज करणार असून न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांना ताब्यात घेऊन कोल्हापूरला नेण्यात येणार आहे. अकोला पोलीसही त्यांचा ताबा मिळविण्याच्या प्रयत्नात आहेत.
हे देखील वाचा : (बातमीवर क्लिक करा )
- ⭕ तडीपार गुंडाचा सोलापूर पोलिसावर हल्ला !!
- ⭕ सोलापूर महावितरण अधिकारी सापडला रंगेहात !
- ⭕ सोलापूर जिल्ह्यातील शाळांच्या वेळेत बदल !
- ⭕ चिमुटभर तंबाखुसाठी साखर कारखाना कामगाराचा खून !
- ⭕ खोटे बोल पण रेटून बोल !
- ⭕ पंढरपूर- मिरज मार्गावरील अपघातात पोलीस ठार !
- ⭕ शेतकऱ्याचं पोरगं डॉक्टर होणार, गावाला कौतुक !
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !