BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१८ एप्रि, २०२२

राज ठाकरे यांचे खोटे बोल पण रेटून बोल ....!

 



मुंबई : मशिदीवरील भोंग्यावरून गेल्या काही दिवसांपासून राजकीय भोंगे जोरजोरात ओरडत असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी न्यायालयाचा हवाला देवून भोंगे उतरविण्याचा इशारा दिलाय पण कुठल्याच न्यायालयाचा असा निकालच नाही असे जेष्ठ विधिज्ञ ऍड असीम सरोदे यांनी स्पष्ट करून ठाकरे याना आव्हान दिले आहे. 


मशिदीवरील भोंगे हा विषय अनेकदा चर्चेला येतो, राजकीय भोंगे वाजतात आणि पुन्हा सगळेच काही शांत होते असा अनेकदा अनुभव आलेला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत बोलताना पुन्हा मशिदीवरील भोंगा बाहेर काढला आणि राज्यातील वातावरण पुन्हा एकदा दूषित झाले. राज्यात दंगल घडविण्याचा हा कट असल्याचा आरोप देखील राज ठाकरे यांच्यावर होत आहे. भोंगे आणि हनुमान चालीसा या प्रकाराने वातावरण तणावात जाऊ लागले आहे. सगळे जाती धर्म गुण्यागोविंदाने नांदत असलेल्या या देशात राजकीय हेतूने कुणीतरी धार्मिक तेढ निर्माण करून वातावरण बिघडवत असते हे या आधीही घडले आहे. 


मशिदीवरील भोंग्याबाबत समन्वयाने मार्ग काढण्याची गरज असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. मशिदीवरील भोंग्यामुळे त्रास अनेकांना त्रास होतो हे अनेकांनी सांगितले आहे. राज ठाकरे यांचा अजानला विरोध नाही, केवळ मशिदीवरील भोंग्याला विरोध आहे हे अनेकदा मनसेने  आणि खुद्द राज ठाकरे यांनी देखील सांगितले आहे. भोंगे उतरविणे हा कुठल्या धर्माचा अनादर होत नाही हे जरी खरे असले तरी राज ठाकरे यांनी दिलेला न्यायालयाचा हवाला हा मात्र खोटा असल्याचे समोर आले आहे. (Raj Thackeray lies) राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही कुठल्याच न्यायालयाचा असा निकाल नसल्याचे स्पष्ट केलेले आहे. त्यानंतर आता प्रख्यात वकील ऍड असीम सरोदे यांनी हाच मुद्दा स्पष्ट करून राज ठाकरे याना आव्हान दिले आहे. 


राज ठाकरे यांच्या पक्षाला निवडणुकीत किती मते मिळतात हा प्रश्न बाजूला ठेवला तर त्यांच्या सभेला उदंड प्रतिसाद मिळतो हे उघड सत्य आहे. त्यांचे विचार सामान्य जनतेलाही पटतात आणि राज ठाकरे यांचे प्रत्येक विधान हे सत्यावर आधारित असते, पुराव्याशिवाय ते बोलत नाहीत अशी देखील त्यांची प्रतिमा आहे परंतु राज ठाकरे खोटे देखील बोलतात असे दर्शविणारा प्रकार मशिदीवरील भोंग्याच्या प्रकरणातून पुढे येऊ लागला आहे. मशिदीवरील भोंगे काढण्याबाबत न्यायालयाचा आदेश आहे असे राज ठाकरे यांनी जाहीर सभेत सांगितले त्यामुळे असा काही आदेश असेल यावर लोकांनी विश्वास ठेवला पण सभेत टाळ्या घेण्यापुरतेच हे विधान होते असे आता समोर येऊ लागले आहे. ( Advocate Asim Sarode's challenge to Raj Thackeray) राज ठाकरे चुकीचे अथवा खोटे काही सांगत असतील यावर कुणाचा विश्वास बसणे कठीण असले तरी या विषयावर मात्र ते विधान खोटे असल्याचे समोर येऊ लागले आहे. 


राज ठाकरे याना आव्हान 
न्यायालयाचा हवाला देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे याना खोटे बोलण्याचा अधिकार नाही, न्यायालयाचा असा एक तरी आदेश त्यांनी दाखवावा, भारतातील कोणत्याही न्यायालयाने मशिदीवरील भोंगे काढा असा कोणताच आदेश कधीही दिलेला नाही, न्यायालयाचा हवाला देत ठाकरे हे खोटे बोलू शकत नाहीत. त्यांनी असा एक तरी आदेश दाखवावा असे आव्हानच ऍड असीम सरोदे यांनी दिले आहे.  


राज यांचे अल्टिमेटम 
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्यासाठी राज्य शासनाला अल्टिमेटम दिला आहे. ३ मे पर्यंत मशिदीवरील भोंगे नाही हटवले तर समोर भोंगे लावून हनुमान चाळीस वाजविण्याचा इशारा त्यांनी सभेत दिला होता. त्यानंतर काल पुण्यात पत्रकार परिषद घेऊन मनसैनिकांना तयार राहण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. यामुळे वातावरण बिघडण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. 

 
शासनाचा निर्णय !
मंदिर असो की मशीद असो, भोंगे आणि स्पीकर लावण्यासाठी पूर्व परवानगी आवश्यक करण्यात आली असून तसा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. हा निर्णय राज्यातील सर्वांसाठी असून परवानगी न घेता भोंगे लावले गेले तर त्याविरुद्ध कारवाई करण्याचा हा निर्णय आहे.


मनसे ठाम !
राज ठाकरे यांनी दिलेल्या ३ मे च्या अल्टिमेटवर मनसे ठाम असून आम्हाला पोलीस आयुक्त अथवा राज्य शासन यांच्या आदेशापेक्षा राज ठाकरे यांचा आदेश महत्वाचा असून आम्ही या आदेशावर ठाम आहोत असे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे. या प्रकारामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन येत्या काही दिवसात राज्यातील कायदा सुव्यवस्था धोक्यात येण्याची शक्यता आहे.    



हे देखील वाचा :   (बातमीवर क्लिक करा )




 अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !      




   

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !