BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

चोर पोलिसात रात्रभर रंगला थरार ... अखेर ---!

 



लातूर : चोर आणि पोलिसात रात्रभर थरार रंगला अखेर लाखोच्या नोटा वाचल्या पण चोरटे मात्र  पसार होण्यात यशस्वी झाले. चोर पळून जाण्यात यशस्वी झाले पण त्यांची जीप मात्र पोलिसांच्या ताब्यात आली. 


रस्त्यावर लुटमार, रात्रीची घरफोडी करणारे चोर आता बँक आणि एटीम मशीनकडेच वाळलेले दिसू लागले आहेत. गेल्या काही महिन्यात राज्याच्या विविध भागात बँकेत चोरी झाली आहे आणि एटीम मशीन चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. काही किरकोळ घटनात त्यांना यात यश देखील आलेले आहे तर अनेक घटनात त्यांचा डाव फसला आहे. लातूर शहरातील एक एटीम मशीन चोरण्याचा डाव चोरांनी आखला पण यात त्यांना यश आले नाही. एटीम मशीन कापून काढले पण अखेरच्या क्षणी त्यांचा हा बेत फसला आणि तेथून पळ काढावा लागला आहे. 


लातूर शहरातील कन्हेरी चौकातील एका बँकेचे एटीम मशीन चोरून त्यातील रक्कम हडप करण्याचा डाव काही चोरांनी आखला आणि ते  एक जीप घेवून रात्री या ठिकाणी पोहोचले. जागेवरच एटीम मशीन फोडून त्यातील रक्कम घेऊन पळून जाण्याचा त्यांचा बेत नव्हता तर संपूर्ण एटीम मशीनच घेऊन जाण्याचा त्यांचा डाव होता. वेल्डिंग मशिनच्या सहाय्याने त्यांनी एका राष्ट्रीयकृत बँकेचे एटीम मशीन कापून काढले. तोपर्यंत कुणाला काही थांगपत्ता लागला नाही. एटीम मशीन उचलून त्यांनी आणलेल्या जीपमध्ये टाकण्याच्या दरम्यान काही आवाज झाला आणि आजूबाजूच्या नागरिकांचे लक्ष वेधले गेले. 


आवाजाच्या दिशेने नागरिकांनी पहिले असता एटीम मशीनच पळवून नेण्याचा प्रकार समोर घडत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यातील काही जागरूक नागरिकांनी तातडीने पोलिसांशी संपर्क साधला. पोलिसांना माहिती मिळताच पोलीस अत्यंत जलद गतीने घटनास्थळी पोहोचले. पोलिसांचा सुगावा लागताच चोरट्यांनी कापलेली एटीम मशीन तेथेच टाकली आणि जीप घेवून सुसाट पळत सुटले. काही वेळेत पोलीसही त्यांच्या मागावर पाठलाग करीत गेले. रात्रीच्या अंधारात चित्रपट स्टाईल थरार सुरु झाला होता. चोर पुढे धावत होते आणि पाठीमागून पोलीस धावत होते. 


चोर जीमधून वेगाने पळून  जात होते पण त्यांना पोलिसांच्या पाठलागाची जाणीव नव्हती. पोलीस आपल्या मागावर येत आहेत याची शंकाही त्यांना आलेली नव्हती. एक मोठा डाव उधळला गेल्याची चुटपूट चोरांना लागलेली होती. रिकाम्या हाताने परतणे चोरांना मान्य नव्हते त्यामुळे त्यांनी जाता जाता पुन्हा चाकूर येथील एक एटीम मशीन फोडण्याचा प्रयत्न केला. पण दरम्यान पोलीस आपल्या मागावर असल्याची जाणीव त्यांना झाली आणि त्यांनी तेथूनही पळ काढला. येथून पळताना मात्र त्यांना जीप तेथेच सोडून पळावे लागले. चोर निसटले पण त्यांची जीप मात्र पोलिसांच्या हाती लागलेली होती. रात्रभर चोर पोलीस पाठलागाचा थरार रंगला होता. 


लातूर शहरातील कन्हेरी चौकातील एटीम पळविण्याचा त्यांचा डाव यशस्वी होता होता अखेरच्या क्षणी फसला होता. चोरांनी कापून काढलेल्या या एटीम मशीनमध्ये तब्बल १६ लाखांची रक्कम होती. जागरूक नागरिक आणि दक्ष पोलीस यांच्यामुळे बँकेचे १६ लाख वाचले. चोरांच्या ताब्यातील जीप पोलिसांच्या हाती लागल्याने चोरांची ओळख सहज पटू शकेल अशी पोलिसांची अपेक्षा होती पण तसे घडले नाही. सदर जीप हिंगोली जिल्ह्यातील असल्याची माहिती उपलब्ध झाली पण ही जीपही चोरांनी चोरून आणली होती हे समोर आले. चोरीची जीप घेऊन चोर चोरी करण्यासाठी निघालेले होते. पोलीस आता या चोरांचा शोध घेत आहेत.  +


खालील बातम्याची वाचा,
त्यासाठी त्या बातमीवर क्लिक करा ! 



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !