पंढरपूर : "काय झाडी, डोंगार" मुळे राज्यभर प्रसिद्धीला आलेल्या सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या गावात आता युवा शिवसेना नेते आदित्य ठाकरे दाखल होत असून ते सांगोल्यात येऊन काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
शिवसेनेतून फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत चाळीस आमदार गेले आणि यात सांगोला मतदार संघातील शिवसेनेचे आमदार शहाजीबापू पाटील आघाडीवर होते. शिवसेनेच्या आमदारांचे बंड जेवढे गाजले तेवढाच शहाजीबापूंचा फोनवरील संवाद गाजला. "काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ... ओक्के" हे त्यांचे वाक्य एवढे व्हायरल झाले की राज्याच्या सीमा ओलांडून ते बाहेर गेले. त्यांच्या या वाक्यावर काही गाणी देखील आली आणि विविध वृत्तवाहिन्यांनी शहाजीबापू पाटील यांची कधी नव्हे एवढी दखल घेतली. शहाजीबापू यांची माणदेशी गावरान भाषा अनेकांना भावली. त्यांची ऑडीओ क्लिप समाज माध्यमावर प्रचंड व्हायरल झाली. अर्थात शहाजीबापू यांच्यावर नेटकरी मंडळीनी बरीच टीका देखील केली आहे.
राज्यात सत्तांतर होऊन शिवसेनेतून फुटलेल्या गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले पण शहाजीबापू यांच्या नावाची चर्चा थांबली नाही. जवळपास सर्वच पक्षातील नेत्यांनी शहाजीबापू पाटील यांच्या या संवादावर जाहीर सभेत भाष्य केले आहे. त्यानंतर युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर सतत तोंडसुख घेतले आणि आ. पाटील यांनी देखील सडेतोडपणे उत्तरे दिली आहेत. शिवसेनेला (Shivasena) मोठा धक्का बसल्यानंतर युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्र पिंजायला सुरुवात केली आहे. बंडखोरी केलेल्या आमदारांच्या मतदार संघात जेंव्हा ते जातात तेंव्हा तेथील बंडखोर आमदारांचा अनेकवेळा गद्दार म्हणून ते उल्लेख करतात शिवाय स्थानिक बंडखोर आमदार यांच्याविरोधात प्रखर टीका करतात, जनतेशी संवांद साधत शिवसेना पुन्हा बळकट करण्याचा प्रयत्न करतात.
आदित्य ठाकरे हे सातारा, कोल्हापूरच्या दौऱ्यानंतर सोलापूर जिल्ह्यातील सांगोला आणि परंडा (Tanaji Sawant) येथे देखील जांत आहेत. ठाकरे हे राज्यातील विविध भागात फिरत असले तरी बंडखोर ४० आमदार आणि १२ खासदार यांच्या मतदारसंघाकडे त्यांची विशेष नजर आहे. शिवसेनेतून छगन भुजबळ, त्यानंतर राज ठाकरे आणि नारायण राणे यांनी बंड केले होते, त्यावेळी बराच गोंधळ उडाला होता पण यावेळचे बंड हे अधिक मोठे असून शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे हे बंड शिवसेनेच्या जिव्हारी लागले आहे.
या बंडाच्या दरम्यान सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील हे भलतेच चर्चेत राहिले आहेत त्यामुळे त्यांच्यावर आदित्य ठाकरे यांच्याकडून कडक शब्दात टीका होण्याची शक्यता आहे. आदित्य ठाकरे हे सांगोल्यात आल्यानंतर पुन्हा एकदा "काय झाडी, काय डोंगार" ( Kay zadi, kay dongar, kay Hatil ) याचा उल्लेख होणार असून येथे ते काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. शिवसेनेने मंत्री केलेले तानाजी सावंत यांनीही शिवसेनेतून बंडखोरी केली आहे त्यामुळे त्यांच्या परंडा मतदार संघात देखील आदित्य ठाकरे जाणार आहेत. मंत्रीपद न मिळाल्याने सावंत हे नाराज होते आणि आता ते शिंदे गटात सहभागी आहेत.
सोलापूर जिल्ह्यात एकनाथ शिंदे गटाचा प्रभाव अजूनतरी दिसत नसून शिंदे गटाला समर्थन देणाऱ्या एकालाही त्यांच्या नव्या कार्यकारिणीत संधी देण्यात आलेली नाही. शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिंदे यांनी नवी राज्य कार्यकारिणी घोषित केली आहे पण यात सोलापूर जिल्ह्याला स्थान मिळालेले नाही. सोलापूर जिल्ह्यातील बहुसंख्य शिवसैनिक आणि पदाधिकारी अजूनतरी शिवसेनेत आहेत. ज्यांनी शिंदे गटाशी जवळीक केली आहे ते फारसे राजकीय प्रबळ नसल्यामुळे त्यांच्यामुळे शिवसेनेला काहीही फरक पडत नसल्याचे सांगितले जात आहे. (Aditya Thackeray in MLA Shahajibapu's constituency) शिवसेनेत काहीच स्थान नसलेले काही जण शिंदे गटाची जवळीक साधत आहेत असेही चित्र आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !