BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

उजनी धरणातून आज पूर्ण क्षमतेने पाणी सोडणार !

 



पंढरपूर : सल्लागार समितीच्या बैठकीत ठरल्याप्रमाणे उजनी धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्याची प्रक्रिया सुरु झाली असून आज धरणातून पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे. 


सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणातून पाणी सोडण्याची प्रतीक्षा शेतकरी करीत होते आणि यावर्षी उजनी धरणात मुबलक पाणी असल्याने प्रशासनालाही अडचण निर्माण होणार नाही. रब्बी हंगामासाठी एक आवर्तन २८ जानेवारीपासून सोडण्याचा निर्णय  सल्लागार समितीच्या बैठकीत अंतिम झाला होता. जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कालवा सल्लागार समिती बैठकीत  हा निर्णय घेण्यात आला होता, त्यानुसार उजनी धरणातून पाणी सोडणे सुरु झाले आहे. 



धरणातून पाणी सोडणे सुरु केल्यानंतर सुरुवातीला २०० क्युसेक्स प्रमाणे सुरुवात करण्यात आली असून नंतर ठराविक अंतराने त्यात वाढ करणे सुरु आहे. आज सायंकाळपर्यंत पूर्ण क्षमतेने म्हणजे २८०० ते ३००० क्युसेक्सने पाणी सोडायची प्रक्रिया पूर्ण होईल. रब्बी हंगामासाठी सोडण्यात आलेल्या या पाण्याचे आवर्तन २८ फेब्रुवारीपर्यंत सुरु राहणार आहे. यंदा उजनी धरणात मुबलक म्हणजे  १०७ टक्के पाणी साठा आहे. सद्या सोडलेले पाणी हे शेतीसाठी असून सुमारे सहा लाख एकर शेतीला कालव्यातून पाणी मिळणार आहे.  भीमा सीना जोड कालवा (बोगदा) तसेच २ फेब्रुवारीपासून दहीगाव उपसा सिंचन योजनेत तर १ मार्च पासून सीना माढा सिंचन योजनेच्या आवर्तनास पाणी सोडले जाणार आहे.



२५ जानेवारी ते २८ फेब्रुवारी २०२२ डाव्या आणि उजव्या कालव्यातून ८ टीएमसी पाणी तर भीमा - सीना  जोड कालव्यातून दीड टीएमसी पाणी सोडण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री दत्तामामा भरणे यांनी दिली आहे. पहिल्या आवर्तनात ६.६५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे. या बैठकीत उन्हाळा हंगामाचे देखील नियोजन करण्यात आले आहे, त्यानुसार पहिल्या आवर्तनात १६.९० टीएमसी तर दुसऱ्या आवर्तनात १७.९० टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. यामध्ये नदी, कालवा, उपसा सिंचन, जोड कालवा यांचा देखील समावेश करण्यात आला आहे.


महावितरण गतिमान 

एकीकडे शेतीसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले आहे तर दुसरीकडे महावितरण विद्युत पुरवठा खंडित करण्याची कारवाई करीत आहे.  विद्युत बिलांच्या थकबाकीमुळे महावितरण वसुलीसाठी गेल्या काही महिन्यांपासून आक्रमक देशात आहे त्यातच आता उजनी धरणातून पाणी सोडण्यात आले असल्याने वीज पुरवठा तोडण्यावर अधिक भर देणे सुरु झाले आहे. पाणी सोडल्यामुळे महावितरण थकबाकी वसुलीसाठी अधिक सक्रीय झाले असून शेतकऱ्यांचा वीज पुरवठा तोडणे थांबविण्याची मागणी होत आहे. शेतकऱ्यांनी थकबाकीतील पन्नास टक्के रक्कम भरावी आणि थकबाकीमुक्त व्हावे असे महावितरण सांगत आहे तर कोरोनाची परिस्थिती आणि नैसर्गिक संकटे यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला असून बिले भरण्यास तो असमर्थ असल्याचे शेतकरी सांगू लागले आहेत. शेतीला पाणी सोडल्याने आनंद असताना महावितरण वीज पुरवठा तोडू लागल्याने या आनंदावर विरझण पडताना दिसत आहे.  


हे देखील वाचा : शाळा सुरु होण्याआधीच ३१ शिक्षकांना कोरोना !


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !