BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३१ जाने, २०२२

पंढरपूर शहरात पुन्हा एकदा मोठी चोरी !

 



पंढरपूर : पंढरपूर शहरात पुन्हा एकदा चोरीची घटना घडली असून चोरट्यांनी ३ लाखांचे दागिने चोरून नेल्याने खळबळ उडाली आहे. वारंवार होत असलेल्या चोरीमुळे नागरिकांच्या मनावर चोरांचे दडपण कायम आहे,


पंढरपूर शहर आणि उपनगरात सतत चोऱ्या होत असतानाच पुन्हा एकदा गोकुळनगर येथे मोठी चोरीची घटना घडली आहे. बंद घराचे कुलूप तोडून जुनी पेठ येथे नुकतीच एक चोरी झाली होती तोच आता गोकुळनगरात चोरीची घटना घडली आहे. तब्बल दहा तोळे सोने आणि चाळीस ग्रॅम चांदी चोरून नेली आहे. गोकुळनगर येथे राहणारे मोहसीन मुजावर यांच्या घरात चोरीची ही घटना  घडली आहे. प्राप्त माहितीनुसार मुजावर यांच्या कुटुंबातील लोक परगावी गेले होते. त्यामुळे मुजावर यांनी तळमजल्यावर कुलूप लावले होते. मोहसीन मुजावर आणि त्यांची पत्नी पहिल्या मजल्यावर जाऊन झोपले होते आणि तळमजल्यावर ही चोरी झाली आहे. 


तळमजल्यावरील  घराचे कुलूप आणि कोयंडा उचकटून चोरांनी घरात प्रवेश केला आणि घरातील कपाटात ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने चोरून नेले. यात सोन्याचे नेकलेस, मिनी गंठण, सोन्याची चेन, ठुसी, नथ, कानातील टॉप्स, लोमटा असे दहा तोळे सोन्याचे आणि चाळीस ग्रॅम चांदीचे दागिने असा ३ लाख १ हजार रुपयांचा ऐवज चोरटयांनी चोरून नेला आहे. सदर चोरीबाबत पंढरपूर शहर पोलिसात फिर्याद देण्यात आली असून पोलिसांनी अज्ञात चोरांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. चोरीच्या या घटनेने उपनगरी भागात पुन्हा एकदा चोरांची दहशत निर्माण झाली आहे.    


पंढरपूर शहर आणि परिसरात गेल्या काही महिन्यांपासून चोरीचे प्रकार अमर्याद वाढलेले आहेत. सतत कुठल्या न कुठल्या भागात चोरी होण्याची घटना घडत आहे. पंढरपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत असून शहराच्या सगळ्याच बाजूनी उपनगरे वाढलेली आहेत. लोकवसाहत वाढत असली तरी त्या तुलनेत पोलिसांची संख्या वाढताना दिसत नाही. चोरीच्या घटना आणि चोर यांच्यात मात्र मोठी वाढ होत आहे. भाविकांचे कपडे चोरण्यापासून घर फोडण्यापर्यंत सगळ्या प्रकारच्या चोऱ्या खुलेआम होत असतात. काही घटना पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचतात तर काही घटना केवळ चर्चेत राहतात आणि चर्चेतच संपतात. पंढरीत भाविकांची सतत ये जा असते, त्यांच्याही चोऱ्या होतात, घराच्या अंगणात लावलेल्या दुचाकी रातोरात गायब होतातच पण दवाखाने अथवा दुकानांच्या समोर उभ्या केलेल्या दुचाकीही विजेच्या चपळाईने चोरल्या जातात. बँकेत गेलेल्या नागरिकांचे अर्धे लक्ष बाहेर लावलेल्या गाडीकडे असते अशी कठीण परिस्थिती पंढरपूर शहरात निर्माण झालेली असतानाच पुन्हा एकदा  चोरी झाल्याची घटना घडली आहे. 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !