BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ डिसें, २०२३

सोलापुरी 'मासा' सांगलीत अडकला, पाण्याबाहेर येऊनही 'जाळ्यात' घावला !


शोध न्यूज : निवृत्त झालेला सोलापूर जिल्ह्यातील शिक्षणाधिकारी विष्णू मारुतीराव कांबळे याच्याकडे तब्बल ८३ लाखांची बेहिशोबी मालमत्ता आढळून आली असून, निवृत्त झाल्यानंतरही त्याच्यावर आणि त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण विभागातील भ्रष्ट शिक्षणाधिकारी नुकताच गोत्यात आला आहे. सोलापूर प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण अनंत लोहार, त्यांची पत्नी सुजाता किरण लोहार आणि  मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल झाला आहे. त्यांच्याकडे उत्पन्नापेक्षा १११.९३ टक्के अपसंपदा आढळली आहे. दरम्यान, लोहार यांनी परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने, कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक पाच कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची अपसंपदा जमविली आहे. त्यांची पत्नी सुजाता लोहार व मुलगा निखिल लोहार यांनी, किरण लोहार यांना भ्रष्ट मार्गाने अपसंपदा संपादित करण्यास अपप्रेरणा, तसेच  सहाय्य केल्याचे चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यानुसार तिघांच्याही विरोधात सोलापूर सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेची चर्चा सुरु असतांनाच, सोलापूर जिल्ह्यातील आणखी एक शिक्षणाधिकारी भ्रष्ट असल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील विष्णू मारुतीराव कांबळे हा सांगली जिल्ह्यात माध्यमिक शिक्षण अधिकारी या पदावर कार्यरत होता. त्याला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेताना पकडले होते. ७ मे २०२२ रोजी ही कारवाई झाल्यानंतर त्यांच्या घराची झडती घेण्यात आली होती. या झडतीत देखील मोठे घबाड हाती लागले होते.घरझडतीत १० लाख एक हजार १५० रुपये मिळाले होते. या रकमेबाबत कांबळेकडे विभागाने खुलासा मागितला होता. (Corrupt Education Officer Illegal Property) त्यावर कोणतेही कागदपत्रे कांबळे याच्याकडून देण्यात आली नव्हती. त्यानंतर त्याच्या मालमत्तेची अधिक चौकशी झाली असता, त्याच्याकडे तब्बल ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपयांची मालमत्ता  भ्रष्ट आणि अवैध मार्गाने मिळविली असल्याचे चौकशीत समोर आले. 


अवैध मार्गाने ८३ लाखांची मालमत्ता संपादित केल्याने तत्कालीन प्राथमिक शिक्षणाधिकारी  विष्णू कांबळे व त्याच्या पत्नी जयश्री विष्णू कांबळे  यांच्या विरुद्ध सांगलीच्या विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यांनी १६ जून १९८६ ते ६ मे २०२२ या कालावधीत संपादित केलेली मालमत्ता ही ज्ञात स्रोताच्या विसंगत असल्याने ८२ लाख ९९ हजार ९५२ रुपये एवढी मालमत्ता गैर मार्गाने मिळवली आणि पती विष्णू कांबळे याला पत्नी जयश्री कांबळे हिने साथ दिली असा आरोप असून, या दोघांच्या विरोधातही हा गुन्हा दाखल केला गेला आहे. किरण लोहार आणि कुटुंबीय यांच्यावर कारवाई होताच ही दुसरी कारवाई झाली आहे त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील दोन मासे जाळ्यात सापडले आहेत.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !