BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

पठ्ठ्याला हवीय बायको, पण ती निवडणूक लढविण्यासाठी !

 


 

औरंगाबाद : रस्त्यावर अनेक प्रकारचे वेगवेगळे फलक आपण पाहतो पण औरंगाबादच्या एका पट्ठ्याने बायको पाहिजे म्हणून एक जाहिरात केलेली आहे, विशेष म्हणजे ही बायको त्याला निवडणूक लढविण्यासाठी हवी आहे त्यामुळे या फलकाची चर्चा तर होणारच !


राजकारणाची हौस कोण कशी पूर्ण करील सांगता येत नाही. काही करून निवडणूक लढविणारे काही जण असतात. गल्लीत कुणी विचारात नसलं तरी तालुक्याची निवडणूक लढविण्याची हौस भागविणारे अनेकजण असतात पण लोकशाहीने दिलेला अधिकार असल्यामुळे कुणी काही म्हणण्याचा प्रश्नच येत नाही. घटनेने दिलेल्या अधिकारात कुणीही पात्र व्यक्ती निवडणूक लढवू शकतो. पण एक तरुण निवडणुकीसाठी अपात्र ठरत असल्याने त्याने निवडणुकीला उभे राहण्यासाठी बायको हवी असल्याचा जाहिरातवजा फलक लावला आहे आणि हा फलक भलताच चर्चेत आला आहे. मोठ्या उत्सुकतेने लोक हा फलक पाहत आहेत आणि सांगोपांग चर्चादेखील करीत आहेत. 


कुठलाही फलक हा लोकांनी पाहण्यासाठीच लावलेला असतो. गल्लीतला कुत्रा ज्याच्याकडे पाहून भुंकत देखील नाही अशांच्यासुद्धा वाढदिवसाचे भले मोठे फलक चौकाचौकात पाहायला मिळत असतात आणि लोक गालातल्या गालात हसत पुढे निघून जात असतात. आपल्याच पैशाने फलक तयार करून स्वतःच स्वत:च्या नावापुढे 'माननीय' असे लिहून वेगवेगळ्या बिरुदावल्या लावलेल्या असतात. रमेश पाटील यांनी लावलेल्या या फलकाचे वैशिष्ठ्य मात्र वेगळे आहे. त्यात त्यांची अत्यंत प्रामाणिक भावना दिसते पण आपल्या घरातील कुणीतरी निवडणूक लढवावी ही मात्र त्याची प्रबळ इच्छा असल्याचे दिसते. 


औरंगाबाद शहराच्या गुलमंडी या अत्यंत महत्वाच्या भागात हा फलक एक वेगळेच आकर्षण ठरला आहे. 'आपल्याला तीन अपत्ये असल्याने आपण निवडणूक लढवू शकत नाही, त्यामुळे निवडणूक लढविण्यासाठी बायको पाहिजे, जातीची अट नाही, वय वर्षे २५ ते ४०, अविवाहित, विधवा, घटस्फोटीत चालेल. फक्त दोन अपत्यापेक्षा जास्त असणारी चालणार नाही'  अशा प्रकारचा हा फलक आहे. हा फलक रमेश विनायकराव पाटील यांनी लावलेला असून अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे.   महानगरपालिका निवडणूक लढविण्याची त्यांची तीव्र इच्छा आहे पण त्यांना तीन अपत्य आहेत त्यामुळे ते अपात्र ठरतात. अर्थातच त्यांना निवडणूक लढवत अयेत नाही. 


तीन अपत्य असल्यामुळे मला तर निवडणुका लढवत येत नाही, आपल्या घरातील कुणीतरी राजकारणात असावे अशी आपली प्रबळ इच्छा असून त्यामुळे आपण लग्नासाठी बायको शोधतो आहे. तिच्याशी लग्न करून तिलाच निवडणुकीत उभे करता येईल आणि तिलाच  निवडून आणण्याचा प्रयत्न करता येईल. केवळ त्यासाठीच हा प्रयत्न असून यासाठीच आपण जातीची अट घातलेली नाही' असे हा फलक लावणारे पाटील सांगतात. पाटील यांची ही इच्छा पूर्ण होतेय की नाही हे लवकरच दिसेल पण हा फलक मात्र सर्वांचे लक्ष वेधून घेत असून अनेकांच्या चर्चेसाठी देखील नवा विषय मिळाला आहे.     



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !