BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ मे, २०२२

भाजप खासदार नाईक निंबाळकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल !

 




फलटण : माढा मतदार संघातील भारतीय जनता पक्षाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी आणि अन्य काहींच्या विरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


माढ्याचे खासदार रणजीतसिंह निंबाळकर आणि त्यांचे एकेकाळचे सहकारी दिगंबर आगवणे यांच्या गेल्या काही काळापासून संघर्ष सुरु असून एकेकाळचे जवळचे सहकरी परस्परांच्या विरोधात उभे ठाकले आहेत. स्वराज कारखाना आणि स्वराज पतसंस्थेच्या माध्यमातून खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि संचालक मंडळानी खोटी बिले आणि पावत्या तयार करून कोट्यावधी रुपयांची  फसवणूक केली असल्याचा आरोप दिगंबर आगवणे मागील काही कालापासून करीत आलेले आहेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करावा अशी देखील त्यांची जुनी मागणी होती. या मागणीसाठी त्यांनी मार्च महिन्यात उपोषण देखील केले होते.  भीक मांगो आंदोलन करीत त्यांनी हे उपोषण केले होते. आरोपकर्ते दिगंबर आगावणे हे पूर्वाश्रमीचे नाईक निंबाळकर यांचे एकनिष्ठ सहकारी होते त्यामुळे हा विषय सातारा जिल्ह्यात चर्चेचा झाला होता. 


आगवणे यांनी फलटण पोलिसांकडे वेळोवेळी याबाबत तक्रारी दाखल केल्या होत्या. अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेवून आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील त्यांनी केला होता. पोलीस त्यांच्या तक्रारीची दखल घेत नसल्याचे पाहून त्यांनी थेट न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने या प्रकरणी पोलिसांना आदेश केल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फलटण न्यायालयाने कलम १५६ (३) नुसार गुन्हा दाखल करून तीन महिन्याच्या आत अहवाल देण्याचे आदेश पोलिसांना दिले होते त्यानुसार तातडीने पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे. (Fraud case against MP Ranjit Singh Nimbalkar) . भाजप खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आगावणे यांच्यातील वाद संपूर्ण सातारा जिल्ह्यात चर्चेचा झाला होता परंतु गुन्हा दाखल झाल्याने मात्र खळबळ उडाली आहे.


चौघांवर गुन्हा दाखल 
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह त्यांच्या पत्नी जिजामाला रणजितसिंह नाईक निंबाळकर, विनय ठाकूर आणि लतीफ तांबोळी या चौघांच्या विरोधात फलटण पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


विविध कलमान्वये गुन्हा 
सदर चौघांच्या विरोधात न्यायालयाच्या आदेशांनंतर गुन्हा दाखल केला गेला असून या गुन्ह्यात भारतीय दंड विधान कलम ४२० सह ४०५, ४०६, ४१८, ४६७, ४६८  अशी कलमे लावण्यात आलेली आहेत. न्यायालयाने आदेश देताच फलटण पोलीस सक्रीय झाले आणि विद्यमान खासदार, त्यांच्या पत्नी आणि अन्य दोघे अशा चौघाविरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. 


माढ्यातून झाले खासदार 
खा रणजितसिंह नाईक निंबाळकर हे माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र असून फलटण येथील राष्ट्रवादीचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे कट्टर विरोधक म्हणून त्यांची ओळख आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी माढा मतदार संघातून कॉंग्रेसकडून उमेदवारीची मागणी केली होती पण ही जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि राष्ट्रवादीच्या संजय शिंदे यांचा पराभव करून ते निवडून आले.    


हे देखील वाचा >>>



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !