BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० जाने, २०२२

महिलेचा विनयभंग, अवघ्या छत्तीस तासात आरोपीला शिक्षा !

 



पुणे : महिलेचा विनयभंग करणाऱ्या आरोपीस गुन्हा घडल्यापासून ७२ तासात तर आरोपपत्र दाखल झाल्यापासून ३६ तासात न्यायालयाने खडी फोडायला पाठवले असून या जलद न्यायाचे जोरदार स्वागत होत आहे. 


न्यायालयात अनेक कारणांमुळे निर्णय येण्यास उशीर लागतो. विलंबाने न्याय मिळणे म्हणजे न्याय नाकारल्यासारखेच मानले जाते. अनेक खटले वर्षानुवर्षे न्यायालयात प्रलंबित राहतात. अनेकदा न्याय मागण्यासाठी न्यायालयात देलेल्या व्यक्तीचे निधन होते पण न्यायालयाचा निर्णय आलेला नसतो. न्यायदानातील अशा विलंबामुळे अनेकजण न्याय मागण्याचेही धाडस दाखवत नाहीत. 'तारीख पे तारीख, तारीख पे तारीख..' असा अनुभव न्यायालयात नेहमीच घ्यावा लागतो पण पुण्याच्या एका न्यायालयाने अत्यंत जलद निर्णय देऊन नागरिकांत एक वेगळा विश्वास निर्माण केला आहे. .


पिंपरी चिंचवड येथील एका महिलेचा विनयभंग होण्याची घटना घडली आणि पाच दिवसात आरोपी गुन्हेगाराचा शिक्का मारून घेऊन थेट शिक्षा भोगायलाही गेला आहे. हॉटेल व्यावसायिक समीर श्रीमंत जाधव हा आरोपी पिडीत महिलेच्या घरात घुसला आणि त्याने या महिलेच्या शरीराला स्पर्श करण्याचा प्रयत्न करू लागला. पिडीत महिलेकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याने या समीर जाधवने या महिलेस जीवे ठार मारण्याची धमकी दिली. सदर प्रकरणी महिलेने पुण्याच्या हिंजवडी पोलीस ठाण्यात आपली तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी समीर जाधव या हॉटेल व्यावसायिकावर गुन्हा दाखल केला. पोलीस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांनी या घटनेचा तपास उपनिरीक्षक रवींद्र मुदळ यांच्याकडे सोपविला.  


तपासाची सूत्रे येताच रवींद्र मुदळ यांनी एका बाजूला आरोपीचा शोध सुरु ठेवला तर दुसऱ्या बाजूला सबळ पुराव्यांची जमवाजमव करून आरोपपत्र तयार केले. दरम्यान आरोपी जाधव याच्या मुसक्या आवळून पोलीस ठाण्यात आणले आणि न्यायालयासमोर उभे केले. ही सगळी प्रक्रिया अत्यंत वेगवान सुरु होती. एरवी पोलीस नेहमीच टीकेचे धनी होत असतात पण येथे पोलिसांचा वेग काही वेगळाच होता. अटक, आरोपपत्र अशा सगळ्याच बाबींची पूर्तता करून हिंजवडी पोलिसांनी केवळ ३६ तासात हे प्रकरण जलदगती न्यायाल्यालासमोर आणले. 


जलदगती न्यायालयासमोर विनयभंगाचे हे प्रकरण येताच न्यायमूर्ती श्रद्धा डोलारे यांच्यासमोर या प्रकरणाची सुनावणी देखील लगेच सुरु झाली. सलग तीन दिवस सुनावणी घेत न्यायालयाने या खटल्याचा निकाल देखील दिला. आरोपी समीर जाधव यास विनयभंग केल्याच्या प्रकरणी दोषी धरून सहा महिन्याची सक्त मजुरी आणि ९ हजार रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली.  पुणे सत्र न्यायालयाचा हा ऐतिहासिक निकाल मानला जात आहे.  अत्यंत जलद निकाल आल्याने जनतेतून अत्यंत समाधान व्यक्त होत असून न्यायालयावरील विश्वास द्विगुणीत झाला आहे.  हिंजवडी पोलिसांनी देखील अत्यंत वेगाने सर्व कार्यवाही पूर्ण केली त्यामुळे पोलिसांचे देखील कौतुक होऊ लागले आहे.




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !