BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

३० ऑग, २०२२

मंत्र्यांच्या समोरच तरुणाचा आत्महत्येचा प्रयत्न !


 

शोध न्यूज : भारतीय जनता पक्षाचे जेष्ठ मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमोरच एका तरुणाने अंगावर रॉकेल ओतून घेत पेटवून घेण्याचा प्रयत्न केल्याची घटना आज घडली आहे. 


नुकतेच राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु असताना मंत्रालयासमोर एक शेतकऱ्याने पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आणि दुर्दैवाने सदर शेतकऱ्याचा उपचार सुरु असताना दुर्दैवी शेवट झाला. त्यानंतर आज पुन्हा एकदा एका तरुणाने असाच प्रयत्न केला आहे. सरकार दरबारी सामान्य जनतेची कामे होत नाहीत त्यामुळे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असे पाउल उचलले जाते. प्रशासनातील अधिकारी काम करीत नाहीत आणि मंत्री दखल घेत नाहीत. अशा अवस्थेत टोकाचे पाऊल उचलण्यापर्यंत हा विषय जात असतो. कोल्हापुरात आज आत्मदहनाचा प्रयत्न केलेल्या तरुणाचे देखील अनुकंपाचे काम रखडले असल्याने त्याने हे कृत्य केले आहे. 


मंत्री चंद्रकांत पाटील आणि जिल्हाधिकारी यांच्या समोरच शिरोळ तालुक्यातील दानोळी येथील संतोष राजू कांबळे या तरुणाने जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला आणि जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एकच खळबळ उडाली. १९८६ पासून अनुकंपाचे काम होत नाही म्हणून त्याने हा आत्मदहन करण्याचा प्रयत्न केल्याचे सांगण्यात आले. २२ वर्षापासून प्रयत्न करीत राहिलो तरी देखील आपले काम होत नाही अशी तक्रार हा तरुण करीत होता. जयसिंगपूर नगरपालिका येथे अनुकंपा तत्वानुसार त्याच्या भाऊजीना नोकरीस घेतले जात नसल्याचे कारण या तरुणाने सांगितले आहे. 


कोल्हापूर जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच्या बाजूला संतोष कांबळे याने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा केलेला प्रयत्न हाणून पाडण्यात आला आहे. जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेरच असलेले चतुर्थश्रेणी कर्मचारी आणि पोलीस यांनी झडप घालून संतोष याच्या हातातील रॉकेलची बाटली वेळीच काढून घेतली (A youth attempted suicide in front of the minister) त्यामुळे पुढील अनर्थ टळला. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत पुढील कार्यवाही सुरु केली आहे.   


आपल्या बहिणीचे पती परशुराम कांबळे यांना अनुकंपा तत्वानुसार नोकरी दिली जात नाही आणि अधिकारी भेटत नाहीत त्यामुळे संतोष याने हे पाऊल उचलले असल्याची माहिती परशुराम कांबळे आणि संतोष कांबळे यांनी पोलिसांना दिली आहे. जिल्हाधिकारी दालनाच्या बाहेरच ही घटना घडली त्यामुळे येथे रॉकेलचा वास सगळीकडे येत होता. या घटनेने गोंधळ उडाला असला तरी त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी पुढील बैठक सुरु ठेवली. मंत्री चंद्रकांत पाटील हे एका बैठकीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. बैठक संपवून ते बाहेर येत असतानाच संतोष कांबळे याने जिल्हाधिकारी यांना भेटण्याबाबत आग्रह धरला होता. यावेळी चंद्रकांत पाटील जिल्हाधिकारी यांच्या दालनाच्या बाहेर आले होते. हा सगळा गोंधळ सुरु असतानाच पाटील मात्र तेथून निघून गेल्याचे सांगितले गेले.  


आपल्या कामासाठी सतत पत्रव्यवहार केले, अधिकाऱ्यांनी आपल्याकडून पैसे घेतले पण आपले काम केले नाही, आवश्यक सगळी कागदपत्रे आपल्याकडे आहेत पण आपले काम केले जात नाही, विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नगर विकास मंत्री होते तेंव्हा आपण त्यांचीही भेट घेतली होती. अनेक चकरा मंत्रालयात देखील मारल्या आहेत पण आता आमच्याकडे तेवढे पैसेही नाहीत त्यामुळे मुंबईला हेलपाटे घालू शकत नाही अशी व्यथा या तरुणाने येथे व्यक्त केली. मंत्री चंद्रकांत पाटील काही विचारपूस करतील अशी त्याची अपेक्षा होती परंतु तसेही काही घडले नाही.   




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !