BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

२० सप्टें, २०२२

बनावट एसएमएस आले तरी फसू नका ! महावितरणचे आवाहन !

 


शोध न्यूज : बनावट मेसेज पाठवून लुटण्याचे उद्योग वाढीला लागलेले असून वीज विभागाच्या नावानेही फसवणूक केली जात असून बनावट मेसेज आल्यास त्याला फसू नका असे आवाहन महावितरणने केले आहे.

 
इंटरनेटच्या माध्यमातून अत्यंत उपयुक्त सोईसुविधा उपलब्ध झाल्या असल्या तरी लुटारू मंडळीनी गैरफायदा उठवत फसवणुकीचे एक मोठे जाळे निर्माण केले आहे. हल्ली बहुतेक लोकांच्याकडे स्मार्ट फोन असून इंटरनेटचा सर्रास वापर केला जात आहे. बहुतेक कामे ऑनलाईन करण्याकडे कल वाढलेला असून यामुळे कामे बिनचूक आणि जलद होतात पण त्याचबरोबर फसवणूक होण्याची टांगती तलवार सतत लटकत असते. भूलथापा देत काही क्षणात हे लुटारू बँक खाते रिकामे करून टाकतात. अशा फसवणुकीचे असंख्य प्रकार समोर आलेले आहेत आणि सायबर पोलिसांकडे तक्रारी देखील दाखल होत आहेत. 


सायबर लुटारू प्रत्येकवेळी नवा फंडा वापरतात आणि जनतेला अत्यंत सहजपणे फसवतात. काही मेसेज पाठवून, कुठलीतरी लिंक पाठवून अथवा एखादे सॉफ्टवेअर डाउनलोड करायला सांगून किंवा आपली काही माहिती विचारून क्षणार्धात गंडा घातला जात आहे. त्यामुळे सदैव सावधानता हाच यावरील उत्तम उपाय आहे. वीज ग्राहकांना फसविण्याचे प्रकार अलीकडे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, काहींची यात फसवणूकही झाली आहे. त्यामुळे महावितरणने ग्राहकांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला आहे. व्यक्तिगत क्रमांकावरून वीज ग्राहकांना बनावट मेसेज पाठवला जाऊ लागला आहे. त्याद्वारे ग्राहकांना वीज बिल अपडेट करायला सांगितले जाते. एक लिंक पाठवून सॉफ्टवेअर डाऊनलोड करण्यास सांगितले जाते आणि त्याच्या सूचनाप्रमाणे केल्यास फसवणूक अटळ असते. 


'आपण वीज बिल भरले आहे परंतु ते जमा होत नाही त्यासाठी या लिंकवर क्लिक करा म्हणून एक बनावट लिंक दिली जाते. सॉफ्टवेअर डाऊनलोड करायला सांगितले जाते, आपली वीज थोड्या वेळात बंद केली जाणार आहे असाही मेसेज येतो. लोक घाबरून भामटे सांगतील त्याप्रमाणे करू लागतात आणि फसतात. वैयक्तिक मोबाईल क्रमांकावरून आलेल्या कुठल्याही अशा मेसेजला आजीबात प्रतिसाद देवू नका असे आवाहन महावितरणनेच केले आहे. महावितरणकडून कोणत्याही ग्राहकांना वयक्तिक मोबाईल क्रमांकावरून अशा प्रकारे मेसेज अथवा व्हॉटसऍप मेसेज दिले जात नाहीत. त्यामुळे अशा मेसेजला बळी पडून फसू नका असे आवाहन करण्यात आले आहे. 


महावितरणकडून येणारे संदेश हे मोबाईल क्रमांकाची नोंदणी केली असलेल्याच वीज ग्राहकांना येतात. यात देखभाल दुरुस्ती, स्वतः मीटर रिडींग पाठविण्याचे आवाहन, मीटर रिडींग घेतल्याची तारीख, वीज वापर युनिट, विद्यतु पुरावठा खंडित झाल्यास तो पूर्ववत होण्यास लागणार कालावधी, दरमहा वीज बिलाची रक्कम, वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असल्याची माहिती अशा प्रकारचे संदेश महावितरण देत असते. महावितरणच्या नावाने येणारे बाकी संदेश हे बनावट असतात. तरीही काही शंका असल्यास १८००१०२३४३५ अथवा १८००२३३३४३५ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधल्यास शंका दूर होऊ शकते.   


विविध प्रकारे संदेश अथवा कॉल करून नागरिकांची फसवणूक केली जाते. (Fraud by fake SMS in the name of Mahavitran)  अशा वेळी कोणत्याही मेसेजला अथवा त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सावधगिरी बाळगावी तसेच ग्राहकांनी cybercrime.gov.in या पोर्टलवर आपली तक्रार नोंद करावी असे आवाहन देखील करण्यात आलेले आहे.  

   



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !