BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

४ नोव्हें, २०२३

ठरलं एकदाचं ! उजनी धरणातून शेतीसाठी सोडले पाणी !




शोध न्यूज : उजनी धरणातून शेतीसाठी पाणी देण्याचा निर्णय अखेर झाला आणि आजपासून धरणातून शेतीसाठी पाणी सोडणे सुरूही झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा जीवात जीव आला आहे.


सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीत, १ नोव्हेंबर पासून उजनी धरणातून पाणी सोडण्याला तत्वत: मान्यता मिळाली होती पण ३ नोव्हेंबर उजाडला तरी देखील धरणातून पाणी सोडण्यात आले नव्हते. यावर्षी पावसाने दगा तर दिलाच पण, शासन आणि प्रशासन देखील दगा देतेय काय ? याची भीती बळीराजाला होती. उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरले नसल्याने, धरणातील पाणी देखील आता काटकसरीने वापरावे लागणार आहे, मागील वर्षी कालवा सल्लागार समितीचे नियोजन चुकले म्हणून उजनीची अवस्था कठीण झाली असल्याचा आरोप शेतकरी करू लागले आहेत. यावर्षी तर धरणात पुरेसा पाणी साठा नाही त्यामुळे, थोडीसी चूक देखील भविष्यातील मोठ्या संकटाचे निमंत्रण ठरू शकते अशी भीती आहे. आता या सल्लागार समितीच्या बैठकीत २९ फेब्रुवारी पर्यंतचे नियोजन करण्यात आले असून, पिकासाठी पहिले आवर्तन आजपासून म्हणजे ४ नोव्हेंबर पासून १४ डिसेंबर पर्यंत दिले जाणार आहे तर दुसरे आवर्तन १ जानेवारी पासून १० फेब्रुवारी पर्यंत दिले जाणार आहे. असा निर्णय बैठकीत झाल्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले आहे. 


आजपासून धरणातून कालव्यातून पाणी सोडले सुरु झाले असल्यामुळे, आजूबाजूच्या परिसरातील वीज पुरवठा खंडित करण्यात येणार असून तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना देखील देण्यात आलेल्या आहेत. पाणी अंतिम टप्प्यापर्यंत पोहोचण्यासाठी सर्व त्या उपाय योजना करण्यात येणार असून संबंधित विभागांना तशा स्पष्ट सूचनाही देण्यात आल्या आहेत. (Water for agriculture from Ujani dam from today) माण नदीवरील सात कोल्हापूर टाईप बंधारे आणि सीना नदीवरील ९ कोल्हापूर टाईप बंधारे भरून घेतले जाणार आहेत. आजपासून सोडले जाणारे पाणी १४ डिसेंबर पर्यंत सुरु राहणार असून, यासाठी ८ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. दुसऱ्या आवर्तनात म्हणजे १ जानेवारी ते १० फेब्रुवारी दरम्यान ७ टीएमसी पाणी सोडले जाणार आहे. 


भीमा सीना जोड कालव्यातून दोन आवर्तने देताना एकूण  ६.३५ टीएमसी पाणी सोडण्यात येणार आहे.४ नोव्हेंबर ते ४ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत हे पाणी सोडले जाणार आहे.  सोलापूर शहरासाठी १ ते १० डिसेंबर या कालावधीत ५ टीएमसी आणि भीमा नदीतून हिळ्ळी पर्यंत १ ते १० फेब्रुवारीपर्यंत ६ टीएमसी पाणी सोडले जाईल. असे नियोजन करण्यात आले आहे.  आजपासून सोडल्या जाणाऱ्या पाण्यामुळे आणि केलेल्या नियोजनानुसार रब्बी हंगामातील पाण्याचा वापर ४४.२७ टीमसी एवढा राहणार असून २९ फेब्रुवारी अखेर धरणाची पाणी पातळी ४८.७२ टीएमसी एवढी असेल. उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा उणे १४.९५ टीएमसी म्हणजेच २७.९० टक्के) होणार आहे. अशी माहिती लाभक्षेत्र विकास प्राधिकरण अधिकाऱ्यांनी दिली आहे.


सीना माढा - ३३३ क्युसेक्स, दहीगाव उपसा सिंचन योजनेसाठी १२० क्यूसेक्स, बोगदा -  २०० क्यूसेक्स आणि मुख्य कालव्यातून ५०० क्युसेक्सने सकाळी पाच वाजल्यापासून पाणी सोडण्यात आले आहे. कालव्यातील पाणी हे टप्प्याटप्प्याने वाढवले जाणार आहे. उजनीचे पाणी कधी येतेय याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा आता संपली असून पाण्याचा अपव्यय टाळण्याची मात्र मोठी गरज आहे. 



सोलापूर जिल्ह्यातील घटना : ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या दिवशीच उमेदवाराचा मृत्यू , निवडणूक रद्द !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !