BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

१४ सप्टें, २०२२

'तो' पुन्हा आला आणि पोलिसांच्या नजरेने हेरला !

 


शोध न्यूज : एकदा चोरी करून तो पुन्हा आला आणि पोलिसांच्या नजरेने त्याला बरोबर हेरले. त्याच्या डोक्यात वेगळेच नियोजन होते पण पोलिसांनी त्याला थेट तुरुंगाची हवा खायला पाठवले.


पंढरपूर हे तीर्थक्षेत्र असल्यामुळे भाविकांची रोजच गर्दी होत असते. रोजची गर्दी विशेषत: विठ्ठल मंदिर परिसर आणि नामदेव पायरीच्या परिसरात असते. भाविकांच्या या गर्दीत चोरटे देखील मिसळलेले असतात. भाविक चंद्रभागेच्या स्नानाला जातात तेंव्हा देखील या चोरांची नजर त्यांच्या साहित्यावर असते तशी मंदिराजवळच्या गर्दीत या चोरट्यांची नजर महिला भाविकांच्या गळ्यातील सोन्याकडे असते. अशीच संधी साधून नामदेव पायरीजवळ भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन चोराने पळवली होती. सांगोला तालुक्यातील वासूद येथील सुनीता राजेंद्र गव्हाणे, सीमा तानाजी केदार, सविता सिद्धेश्‍वर भालके या महिला भाविक विठ्ठल दर्शनासाठी ७ सप्टेंबर रोजी पंढरपूर येथे आल्या होत्या. त्या नामदेव पायरीच्या जवळ असतना सुनिता गव्हाणे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरून चोरटा पसार झाला होता. 


भर दुपारी चोरट्याने भाविक महिलेच्या गळ्यातील सोन्याची चेन पळविल्यानंतर एकच गोंधळ उडाला होता. भाविकांची गर्दी होती आणि त्यातच एकत्र आलेल्या महिला गर्दीमुळे विखुरल्या गेल्या होत्या. तेवढ्यात चोरट्याने आपली 'हात की सफाई' दाखवली. पाउण तोळे सोन्याची चेन चोरांनी पळविल्याची तक्रार सुनीता गव्हाणे यांनी पोलिसात दिली होती. त्यानंतर पोलिसांनी सध्या वेषात नामदेव पायरीजवळ पोहोचले आणि  त्यांची नजर गर्दीत फिरू लागली. महिलांच्या गर्दीत एक व्यक्ती अकारण फिरत असल्याचे पोलिसांच्या नजरेने बरोबर हेरले. गव्हाणे यांच्या गळ्यातील सोन्याची चेन चोरणारा चोर पुन्हा एकदा महिलांच्या गर्दीत शिरला होता आणि तो आपले 'सावज' हेरत होता. त्याला त्याचे सावज मिळण्याआधीच पोलिसांनी त्याला हेरला होता. महिलांच्या गर्दीत इकडून तिकडे फिरणाऱ्या या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले.


बाजूला घेवून त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सवयीने उडवा उडवी केली खरी पण पोलिसांच्या तावडीतून तो सुटू शकला नाही. खास आपल्या पद्धतीने चौकशी करीत पोलिसांनी त्याची झडती घेतली, त्यानंतर मात्र त्याने चोरी कबूल केली. सोलापूर येथील सेटलमेंट परीसातील मंजुनाथ नगर येथे राहणारा विक्रम उर्फ विकी महादेव गायकवाड असे नाव असल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले. चोरीचा गुन्हा कबूल तर केलाच पण सुनिता गव्हाणे यांची चोरलेली सोन्याची चेन देखील पोलिसांनी त्याच्याकडून हस्तगत केली. (Police caught the thief near Pandharpur Vitthal temple) पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे चोरीला गेलेले सोने तर परत मिळालेच पण चोराला देखील तुरुंगाची हवा मिळाली.   


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !