BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२३

पंढरपूर - मोहोळ मार्गावर तिहेरी अपघात !

 




शोध  न्यूज : अपघाताचे प्रमाण वाढत असतानाच, पंढरपूर - मोहोळ रस्त्यावर आणखी एक अपघात झाला असून या अपघातात एका वृद्ध महिलेचा मृत्यू झाला आहे. फिरायला गेलेल्या वृद्धेस आणि एका दुचाकीस चार चाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला आहे.


रस्ते चकाचक झाल्यापासून अपघातांचे प्रमाण वाढले आहे, दररोज विविध रस्त्यावर अपघात होत असून अनेक निष्पाप जीव जात आहेत. हल्ली प्रत्येकाला घाई आहे आणि या घाईतून वाहनांच्या वेगावर कसलेच नियंत्रण उरले नाही, त्याचा परिणाम म्हणून रस्त्यारस्त्यावर रक्त सांडले जात आहे. रोज अपघात होऊन जीव जात असतानाही कुणाच्याही वेगावर मर्यादा येताना दिसत नाही. रस्त्यावरून पायी जात असलेल्या नागरिकांच्या जीवाचा तर आता कसलाच भरवसा उरला नाही, याची अनेक उदाहरणे आपल्या अवतीभवती रोज घडत असतात. शहरातील रस्त्यावरही असे अपघात घडतात. सकाळी व्यायामासाठी फिरायला जाणाऱ्या अनेक नागरिकांना आजवर आपले प्राण गमवावे लागले आहेत. असाच प्रकार पंढरपूर - मोहोळ पालखी मार्गावर घडला असून, लोकांच्या भावनाही संतप्त आहेत. पेनूर येथील एका वृद्ध महिलेला कुणाच्या तरी बेपर्वाईमुळे आपला जीव गमवावा लागला आहे.


पेनूर येथील मंगल भाऊसाहेब सलगर या साठ वर्षे वयाच्या वृद्धा पहाटेच्या वेळी फिरायला म्हणून घरातून बाहेर पडल्या होत्या, पंढरपूर - मोहोळ पालखी मार्गावरून त्या व्यायामासाठी चालत निघालेल्या असताना, त्यांना आणि अन्य एका दुचाकीला, एका भरधाव वेगातील चार चाकी वाहनाने जोराची धडक दिली. (Triple accident on Pandharpur - Mohol route) या घटनेत मंगल सलगर यांचा जागीच मृत्यू झाला आहे. पेनूर येथील विनायक शिवाजी काळे या ३० वर्षीय दुचाकीस्वार देखील या अपघातात गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच सलगर यांच्या नातेवाइकानी अपघातस्थळी धाव घेतली. तोपर्यंत मंगल यांचा मृत्यू झाला होता तर विनायक काळे हा रस्त्याच्या बाजूला जखमी अवस्थेत पडलेला होता.


मोहोळच्या दिशेने निघालेले चार चाकी वाहन, अपघात केल्यानंतर तेथून पळून गेले आहे, या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. दरम्यान, व्यायामासाठी फिरायला निघालेल्या मंगल सलगर यांचा अपघाती मृत्यू झाल्याने पेनूर गावात हळहळ व्यक्त होत आहे तर वाहन चालकांच्या बेपर्वाईचा संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्याचे रुंदीकरण केल्यापासून पंढरपूर - मोहोळ या दरम्यान अनेक अपघात झाले आहेत. काही अपघातात जीव गेले आहेत तर कित्येकजण गंभीर स्वरुपात जखमीही झाले आहेत. 


 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !