BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२३

पट्ठ्याने चक्क ऐतिहासिक, शिवकालीन किल्ल्यावरच केला दावा !




शोध न्यूज : लोक दुसऱ्यांची घरे, शेती बळकावतात, पण एका पट्ठ्याने चक्क ऐतिहासिक किल्लाच बळकावण्याचा प्रयत्न करीत, मालकीहक्काचा दावा सांगितल्याचा अजब प्रकार समोर आला आहे. या अजब प्रकाराने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.

इतरांच्या संपत्तीवर, मालमत्तेवर दुसऱ्याच कुणातरी हक्क सांगणे हे काही नवे नाही, अनेकजण वेगवेगळ्या युक्त्या करून इतरांची मालमत्ता हडप करीत असतात. अशा घटना आपल्या अवतीभवती घडत असतातही, त्यामुळे यात फारसे काही वेगळे आहे असे वाटत नाही. पण कुणाच्या मनात कधी काय येईल आणि कोण कधीं कशावर हक्क सांगेल याचाही काही भरवसा राहिला नाही. अशीच एक घटना घडली असून एका बहाद्दराने चक्क ऐतिहासिक किल्ल्यावरच आपली मालकी असल्याचा दावा केला आहे. केवळ दावा करून तो थांबला नाही तर त्याने काही कागदपत्र देखील सादर केली. पण प्रत्यक्षात ही कागदपत्र तपासणी झाली तेंव्हा मात्र वेगळाच प्रकार समोर आला आणि किल्ल्यावर दावा करणाऱ्यावर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्याच्या विविध भागात शिवकालीन किल्ले आहेत आणि ते जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत येतात. याच किल्ल्यावरून शिवरायांनी स्वराज्याचा इतिहास घडवला आहे आणि जनता या किल्ल्यांकडे मोठ्या अभिमानाने पहात आहे. किल्ल्याचे पावित्र्य राखण्यासाठी अनेकजण प्रयत्नशील असतात. एक बहाद्दर मात्र थेट शिवकालीन किल्ला आपलाच असल्याचा दावा करू लागला आणि यामुळे खळबळ उडाली. कल्याणमध्ये एका व्यक्तीने शिवकालीन किल्ले दुर्गाडीवर आपला हक्क सांगत, हा किल्ला आपलाच असल्याचा दावा केला आहे.  सुयश शिर्के सातवाहन नावाच्या या व्यक्तीने हा दावा केला आहे.  माळशेज घाट वनक्षेत्र आणि पर्यटनस्थल विकास समितीचे अध्यक्ष असल्याचे त्यांनी सादर केलेल्या अर्जात म्हटले आहे. या अर्जात त्याने किल्ले दुर्गाडी वर आपले नाव लावण्यात यावे अशी मागणी केली आहे.  कल्याण मधील किल्ले दुर्गाडी हा किल्ला शिवकालीन असून अचानक या किल्ल्याचा मालक अवतरल्याने प्रशासन देखील सुरुवातीला बुचकळ्यात पडले. जिल्हाधिकारी यांच्या अखत्यारीत असलेल्या या किल्ल्याचा मालक अचानक समोर आला आणि आपले नाव लावण्याची मागणी करू लागला. यामुळे प्रशासन आश्चर्यचकित झाले.

सातवाहन याने जमिनीच्या उताऱ्यावर ना हरकत दाखला देखील मागितला होता. त्याचा हा अर्ज ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे चौकशीसाठी गेला. तेथे चौकशी होऊन तो कल्याण तहसीलदार यांच्याकडे पोहोचला.  कल्याण तहसील कार्यालातील मंडळ अधिकारी प्रीती गुडे यांनी मात्र थेट पोलीस ठाणे गाठले आणि शिर्के याच्या विरोधात तक्रार दिली.  किल्ले दुर्गाडीच्या जागेवर दावा सांगणाऱ्या शिर्के सातवाहन याने सादर केलेली कागदपत्रे ही साक्षांकीत आणि नोंदणीकृत नसल्याचे दिसून आले. तसेच अधिकची तपासणी आणि छाननी केली असता शिर्केची कागदपत्रे ही संशयास्पद, बनावट आणि बोगस असल्याचे दिसून आले होते, त्यामुळे शिर्के याच्या विरोधात थेट पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी पुढील कार्यवाही सुरु केली असून याची चर्चा देखील सुरु आहे.

इतरांच्या मालमत्ता हडपल्या जातात आणि त्याची असंख्य प्रकरणे न्यायालयात जातात, या बहाद्दराने तर चक्क शिवकालीन किल्ल्यावरच आपला हक्क सांगितला आणि यामुळे प्रशासनालाही सुरुवातीला आश्चर्य वाटले. चौकशी केल्यानंतर मात्र ही बोगसगिरी असल्याचे लक्षात आले. (Claimed on the historical fort durgadi)  या घटनेची मात्र मोठी चर्चा असून, कोण कधी आणि कशावर हक्क सांगतील याचा भरवसा नसल्याचे हे उदाहरण समोर आले, त्यामुळे अनेकांनी तोंडात बोटे घातली आहेत. शिवकालीन किल्ल्यांवर देखील मालकी सांगणाऱ्या या पठ्याची मात्र सगळीकडे चर्चा होऊ लागली आहे.  

 


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !