BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

५ नोव्हें, २०२३

आणखी एक बलिदान ! उपोषण करताना आला मृत्यू !

 


शोध न्यूज : मराठा आरक्षणासाठी आणखी एका मराठ्याचे बलिदान झाले असून, आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मराठा बांधवाचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. या घटनेमुळे समाजात प्रचंड हळहळ व्यक्त होत आहे. 


मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी, मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केले आणि त्याला राज्यभरातून मोठा पाठींबा मिळत गेला. गावोगाव मराठा बांधव उपोषण करून, जरांगे यांना पाठींबा देवू लागले. यात काही तरुणांनी निराश होत आपल्या आयुष्याचाही शेवट करून घेतला. कुठे जाळपोळ झाली तर कुठे दगडफेक झाली. मराठा आंदोलकांच्या आड दडून इतरांनी आपले राजकीय वैमनस्य बाहेर काढले. अशा घटना घडत असतानाच, शासन आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात चर्चा होऊन, उपोषणाची सांगता झाली . मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिन्यांसाठी उपोषण स्थगित केले परंतु त्यांना पाठींबा देण्यासाठी उपोषणाला बसलेल्या एका मराठा बांधवाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याचे समोर आले आणि अनेकांना मोठा धक्का बसला.


मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी गावोगाव साखळी उपोषणे सुरु होती, त्याप्रमाणे कळमनुरी तालुक्यातील सिंदगी येथे देखील साखळी उपोषण सुरु करण्यात आले होते. या उपोषणात ५४ वर्षीय प्रकाश  नामदेव मगर हे देखील सहभागी झाले होते. ते उपोषणासाठी आले असता, त्यांना अस्वस्थ वाटू लागले, दुपारी दोन वाजण्याच्या दरम्यान त्यांना त्रास जाणवू लागला आणि चार वाजण्याच्या सुमारास त्यांच्या छातीत वेदना होऊ लागल्या. त्यामुळे त्यांना तातडीने जवळच्याच प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथे त्यांना आराम वाटला नाही उलट त्यांची प्रकृती अधिकच बिघडली, त्यामुळे त्यांना हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दाखल केले गेले. येथे मात्र त्यांची प्राणज्योत मालवली आणि मराठा बांधवाना आणखी एक धक्का बसला. मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट झाले नसले तरी, उपोषणाच्या दरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे ही दुर्घटना घडली असल्याचे सांगण्यात येत आहे. 


मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण स्थगित झालेले असले तरी त्यांनी अजून हार मानलेली नाही किंवा अजून त्यांच्या मागणीला पूर्णत्व आलेले नाही. (Maratha reservation, died during hunger strike) शासनाने दोन महिन्यांची मुदत मागितली आहे त्यानुसार ही मुदत मान्य करण्यात आली असली तरी, गावोगाव सुरु असलेले साखळी उपोषण तसेच सुरु ठेवण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे. त्यानुसार सिंदगी येथे देखील साखळी उपोषण सुरु होते. याच दरम्यान एका उपोषणकर्त्या मराठा बांधवाचा मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

  


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !