BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

९ नोव्हें, २०२३

लग्नपत्रिकेवर नेत्यांची जागा घेतली मनोज जरांगे पाटलांनी !

 



लग्नपत्रिकेवर आले जरांगे, 

पुढारी झाले बेपत्ता !


शोध न्यूज : विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवरील देव देवतांची आणि त्यानंतर राजकीय पुढाऱ्यांची जागा आता मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील घेवू लागले असल्याचे सोलापूर जिल्ह्यातील एका विवाह सोहळ्यात दिसून आले आहे. 


कुठल्याही कुटुंबातील लग्न सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर पूर्वी देवदेवतांचे फोटो छापले जायचे पण काळानुरूप या निमंत्रण पत्रिकेत लक्षणीय फरक दिसू लागला आहे. राष्ट्रपुरुष आणि देवतांची छायाचित्रे आवर्जून आणि न चुकता निमंत्रण पत्रिकेवर छापली जात होती. कुटुंबातील हा सोहळा असल्यामुळे लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेवर कुटुंबातील आणि भावकीतील सर्वांची नावे आवर्जून छापण्याची पद्धत होती पण ती देखील बदलत गेली. मित्रमंडळ, गणेशोत्सव मंडळ, लेझीम पथक, भजनी मंडळ , कार्यवाहक अशी वेगवेगळी नावे छापली जाऊ लागली, एवढेच काय पण, कुटुंबाशी आणि नात्याशी कसलाही संबंध नसणाऱ्या पुढाऱ्यांचे चेहरे लग्न पत्रिकेवर झळकू लागले. पुढारी आणि अन्य नावांच्या यादीत वधू वरांची नावे आणि विवाहाचे स्थळ शोधत राहण्याची वेळ आली आहे, लग्न हा एक कौटुंबिक सोहळा असतो पण येथेही राजकीय पुढाऱ्यांचे आक्रमण झाले आहे. नंतरच्या काळात वधू वरांचेही फोटो छापणे सुरु झाले परंतु या सगळ्यांना छेद देत, सोलापूर जिल्ह्यातील मानेगाव येथील एका विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेने मात्र सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे.


गेल्या महिन्यापासून राज्यात केवळ आणि केवळ मराठा आरक्षण हाच एकमेव विषय राज्यात चर्चेला आहे, माध्यमातील सगळी जागा मराठा योद्ध मनोज जरांगे पाटील यांनीच घेतली आहे. मराठा आरक्षण आणि मनोज जरांगे यावरच महाराष्ट्र केंद्रित झाला आहे. एक सामान्य कुटुंबातील मराठा नेता उदयास आला आहे. त्याच्या साधेपणाचे आणि प्रामाणिकतेचे हे यश आहे. कुठल्याही अमिषाला बळी न पडणारे असल्यामुळे, आणि मराठा समाजाचे दु:ख घेवून लढत असल्यामुळे मराठा समाजाचे तर ते गळ्यातील ताईत होऊन बसले आहेत. पण आता ते मराठा समाजाच्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर जाऊन बसले आहेत. गायकवाड परिवाराने छापलेल्या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर ' मराठ्यांचा योद्धा' म्हणून मनोज जरांगे यांचे मोठी छायाचित्र छापण्यात आले आहे, मोठ्या अक्षरात 'एक मराठा, लाख मराठा' असे लिहिण्यात आले आहे. हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज आणि देवतांचे फोटो तर आहेतच, पण मनोज जरांगे यांचे छायाचित्र देखील ठळक छापण्यात आले आहे. त्यामुळे या निमंत्रण पत्रिकेची देखील चर्चा होऊ लागली आहे.


एकीकडे सोशल मीडियावर आणि प्रसार माध्यमातून फक्त जरांगे पाटील दिसत असताना, लोकांच्या मनामनात केवळ त्यांनीच जागा व्यापली असताना, आता मराठ्यांच्या विवाह सोहळ्यातील निमंत्रण पत्रीकेवरही मनोज जरांगे पाटील आले आहेत, (Manoj Jarange Patil instead of leaders on the wedding invitation) यावरून मराठा समाजाच्या मनात जरांगे पाटील किती खोलवर रुजले आहेत याचीच प्रचीती येताना दिसत आहे. स्वाभाविकपणे या विवाह सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेची चर्चा सगळीकडेच सुरु असून, सोशल मीडियात देखील या निमंत्रण पत्रिकेचा बोलबाला दिसू लागला आहे .




कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !