BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

८ नोव्हें, २०२३

--- तर मंदिर समितीच्या पदाधिकाऱ्यानाही काळे फासू ! मराठा आक्रमक

 



शोध न्यूज : मराठा आरक्षणा आणि कार्तिकीच्या महापूजा या विषयावरून पंढरपूर येथे मराठा बांधव आक्रमक झाले आणि त्यांनी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या बैठकीत घुसून घोषणा देत जोरदार इशारा दिला आहे.


मराठा आरक्षण हा कळीचा मुद्दा बनला असताना, राजकीय नेते समाजात तेढ निर्माण होईल अशी विधाने करीत आहेत, त्यामुळे शांत झालेले वातावरण पुन्हा दुषित होण्याची भीती व्यक्त होत आहे. राज्य सरकारमध्ये मंत्री असलेले छगन भुजबळ यांच्या काही विधानामुळे तर वातावरण बिघडून जाण्याची परिस्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे, मराठा हा कुणबी असल्याच्या नोंदी सापडत असल्यामुळे तर मराठा हे कुणबीच आहेत यावर देखील शिक्कामोर्तब होत आहे. मराठा आंदोलन शांत असले तरी ते संपलेले नाही याचीही प्रचीती राज्यात येत असताना आज पंढरपूर येथे मराठा समाज बांधव पुन्हा आक्रमक झाल्याचे दिसत आहे. मराठा आरक्षणासाठी नेत्यांना गावबंदी करण्यात आल्यापासूनच, कार्तिकी एकादशीची पूजा करण्यासाठी कोणत्याही उप मुख्यमंत्र्यांना येवू देणार नाही असा पवित्रा घेतलेला आहेच, आज मात्र मराठा बांधव थेट मंदीर समितीच्या बैठकीत घुसले आणि जोरदार घोषणा देत इशारा दिला आहे.


पंढरीतील आषाढी एकादशीची शासकीय महापूजा राज्याचे मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते तर, कार्तिकी एकादशीची महापूजा, उप मुख्यमंत्री यांच्या हस्ते होत असते. यावेळी तर दोन उप मुख्यमंत्री (Ajit Pawar) असल्यामुळे कार्तिकीची पूजा कुणाच्या हस्ते होणार ? याबाबत चर्चा होतीच पण आता ही पूजा करण्यास कुठल्याही उप मुख्यमंत्र्यांनी येवू नये असा इशारा मराठा आंदोलकांनी दिला आहे. जोपर्यंत मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत, उप मुख्यमंत्री अथवा कुठल्याच मंत्र्यांना पूजेसाठी येवू दिले जाणार नाही आणि येण्याचा पर्यंत केला तर त्यांच्या तोंडाला काळे फासू असा इशारा आधीच दिला होता.  मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या उपस्थितीमध्ये आज पंढरपूर येथे समिती सदस्यांची बैठक बोलावण्यात आली होती. भक्त निवासामध्ये मंदिर समितीची बैठक सुरु असतानाच, राज्य समन्वयक रामभाऊ गायकवाड यांच्यासह मराठा आंदोलक या बैठकीच्या ठिकाणी घुसले. आत प्रवेश करीत असतानाच त्यांनी 'एक मराठा, लाख मराठा' अशा जोरदार घोषणा दिल्या. अचानक झालेल्या या प्रकाराने बैठकीचे वातावरण बदलून गेले. 


विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने कार्तिकीच्या महापूजेसाठी कुठल्याही उप मुख्यमंत्री यांना निमंत्रण देवू नये अशी मागणी मराठा आंदोलकांनी केली. तसा जर पर्यंत झाला तर पंढरीत येणाऱ्या उप मुख्यमंत्र्यांच्या तोंडाला तर काळे फासुच पण, समितीने जर निमंत्रण देण्याचा प्रयत्न केला तर, समिती अधिकारी यांच्या तोंडालाही काळे फासू, यावेळी जर पोलीस बळाचा वापर करण्याचा प्रयत्न केला तर मात्र २०१८ साली झाले होते, त्यापेक्षा अधिक उग्र आंदोलन करू असा इशाराच समन्वयक रामभाऊ गायकवाड यांनी दिला आहे. (Maratha community again aggressive in Pandharpur)  त्यावेळच्या आंदोलनापेक्षाही मोठे आंदोलन पंढरपूर येथे होईल आणि त्याला जबाबदार हे प्रशासनच असेल असा सणसणीत इशाराही यावेळी देण्यात आला आहे. त्यामुळे समिती देखील पेचात आली आहे. 


सन २०१८ साली पंढरीत मोठे आंदोलन झाले होते आणि मराठा आरक्षणाच्या मागणीसाठीच त्यावेळचेही आंदोलन झाले होते. देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanavis )हे राज्याचे मुख्यमंत्री होते आणि आषाढी एकादशीच्या महापूजेसाठी ते पंढरीत येणार होते, त्यांच्या महापुजेला मराठा आंदोलकांनी विरोध केला होता. हा विरोध एवढा प्रखर होता की, मुख्यमंत्री फडणवीस यांनी पंढरीला (Pandharpur) येण्याचे टाळले होते आणि मुंबईतच मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थान 'वर्षा' येथे त्यांनी विठ्ठलाची पूजा केली होती. 


आता पुन्हा तशाच प्रकारचा विरोध होऊ लागला असून, रोखठोक इशारा देण्यात आला आहे. (Maratha arakshan) दरम्यान, या इशाऱ्यानंतर मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी, मराठा समाजाच्या या इशाऱ्याबाबत. विधी व  न्याय खात्याला कळविण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता कार्तिकीची शासकीय पूजा कुणाच्या हस्ते होतेय ? बळाचा वापर करून उपमुख्यमंत्री पूजेला पंढरीत जाणार की वारकऱ्याच्या हस्ते पूजा केली जाणार याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.       


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !