BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

६ नोव्हें, २०२३

सांगोल्यात बापूंना झटका तर पंढरीत भाजपला फटका !




शोध न्यूज : ग्रामपंचायत निवडणूक निकालात सांगोला तालुक्यात, एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांना जोराचा झटका बसला आहे तर पंढरपूर तालुक्यातील निकालात देखील गुरसाळे, ईश्वर वठार ग्रामपंचायतीचे निकाल चर्चेचे ठरले आहेत.


'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील ... समदं ओक्के' या एका संवादाने बहुचर्चित ठरलेले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या सांगोला तालुक्यात त्यांना मोठा धक्का बसला आहे. मुळात हा धक्का अनपेक्षित नाही, कारण आ. पाटील यांनी शेवसेनेतून बंड करून, गुवाहाटी गाठली तेंव्हाच त्यांच्या राजकीय भवितव्याचा निकाल लागला असे म्हटले जात आहे. शिवसेनेतून बंड केल्यावरही शहाजीबापू यांनी अनेकदा, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर तोंडसुख घेतले तर शरद पवार, अजित पवार यांच्या संदर्भात देखील टीका केली होती. त्यामुळे विधानसभा निवडणूक त्यांच्यासाठी अडचणीची ठरणार अशी चर्चा सोलापूर जिल्ह्यात आधीपासूनच आहे, आता तर त्यांच्या तालुक्यातील ग्रामपंचायत देखील त्यांना आपल्याकडे घेता आले नाहीत असे दिसून आले आहे.


सांगोला तालुक्यातील खवासपूर, सावे आणि वाढेगाव या तीन ग्रामपंचायतीवर शेतकरी कामगार पक्षाने विजय मिळवला आहे त्यामुळे शहाजीबापू पाटील यांच्यासाठी समदं तर नाहीच पण थोडं सुद्धा ओक्के नाही हेच दिसून आले आहे. बापूंच्या गावात म्हणजे चिकमहूद येथील ग्रामपंचायतीचीही निवडणूक झाली आहे पण अद्याप तो निकाल हाती आलेला नाही. येथे काय होणार हे अत्यंत महत्वाचे ठरणार आहे. चार पैकी तीन ग्रामपंचायत मात्र शेतकरी कामगार पक्षाकडेच गेल्या आहेत, त्यामुळे आगामी विधानसभेसाठी हा कल महत्वाचा ठरणार आहे. 


पंढरपूर तालुक्यातील गुरसाळे आणि ईश्वर वठार येथील ग्रामपंचायातीचेही निकाल लागले असून गुरसाळे ग्रामपंचायतीवर शरद पवार गटाची सत्ता आली आहे तर ईश्वर वठार येथे मोठे सत्तांतर झाले आहे.   ईश्वर वठार ग्रामपंचायतीत सर्वपक्षीय स्थानिक आघाडीची सत्ता स्थापन झाली आहे. सरपंच पदावर नारायण देशमुख हे विजयी झाले आहेत तर गुरसाळे ग्रामपंचायतीवर दीपक शिंदे यांचा सरपंचपदी विजय झाला आहे. (Grampanchayat Election result Sangola Pandharpur) ईश्वर वठार ग्रामपंचायतीमध्ये 30 वर्षांनंतर सत्तांतर झाल्याचं पाहायला मिळालं. भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य सुभाष माने गटाला धक्का बसला आहे. स्थानिक आघाडीचे नारायण देशमुख गटाची सत्ता आली आहे.  या दोन्ही ग्रामपंचायतीच्या निकालानुसार आमदार बबनदादा शिंदे यांच्यासाठी झटका मानला जात आहे.


भाजप आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना मोठा धक्का बसला आहे. माळशिरसमध्ये ३० वर्षांनंतर सत्तांतर झालं आहे. सोलापूर जिल्ह्यातील  माळशिरस येथे गेल्या ३० वर्षांपासून या ग्रामपंचायतीवर, भाजपची सत्ता होती. मात्र, राष्ट्रवादीने भाजपचा गड उध्वस्त केला असून एकहाती सत्ता मिळवली आहे. आमदार विजयसिंह मोहिते पाटील यांना बसलेला हा मोठा धक्का मानला जात आहे.


सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील ग्रामपंचायत निकालाकडे सगळ्यांचेच लक्ष लागले होते. सांगोल्याचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी शिवसेनेत केलेले बंड जनतेला किती मान्य आहे याचाही अंदाज या निवडणुकीत येणार होता. तालुक्यातील जनतेने बापूंच्या बंडावर वेळोवेळी नाराजी व्यक्त केली होती. शिवाय त्यांनी केलेली टीका देखील लोकांना आवडत नव्हती. केवळ, 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील'  चा संवाद बहुचर्चित झाला म्हणून 'समदं ओक्के' असेल असे नाही. आणि ते या निकालात देखील समोर आले आहे. 


पंढरपूर तालुक्यात अभिजित पाटील गटाने सरशी केली आहे. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमनपद त्यांच्याकडे असून, आगामी विधानसभा निवडणुकीत ते शरद पवार गटाचे उमेदवार असणार आहेत. त्यांना एकेक ग्रामपंचायत आपली  करणे हे देखील महत्वाचे ठरणार आहे. गुरसाळे येथील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली असून, पराभूत झालेल्या गटाने देखील आपली शक्ती दाखवून दिलेली आहे. मतदानाच्या अखेरच्या क्षणापर्यंत येथे चुरस दिसत होती.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !