BREAKING

✪ ✪ ✪➤ ✪➤ ✪➤ . ✪ ✪➤ ✪➤ . ✪➤

७ नोव्हें, २०२३

लग्नासाठी तरुणाने आयुष्याचाच केला शेवट !

 



शोध न्यूज : लग्न जुळत नसल्याने निराश झालेल्या एका चोवीस वर्षांच्या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केल्याची एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली असून, अशा घटनात आणखी भर पडली आहे.


गेल्या काही वर्षांपासून लग्न जुळणे ही एक मोठी समस्या बनली असून, अनेक तरुणांचे वय उलटून गेले तरी विवाह होत नाहीत. यामुळे नैराश्य आलेले तरुण टोकाचे पाउल उचलतात आणि आपल्या आयुष्याचा शेवट करून घेतात. आजवर अशा अनेक घटना घडल्या आहेत आणि अजूनही घडताना दिसत आहेत. शिक्षण पूर्ण करूनही नोकरी मिळत नाही, शेती बेभारोशाची असल्याने, शेतकरी तरुणाशी विवाह करायला तरुणी धजावत नाहीत. त्यात गेल्या काही वर्षापासून तरुणाच्या अपेक्षा वाढलेल्या असल्याचे दिसत आहे. शिपाई असला तरी चालेल पण सरकारी नोकरी असावी, मोठ्या शहरात  राहण्याची स्वत:ची व्यवस्था असावी, गाडी असावी अशा प्रकारच्या वाढलेल्या अपेक्षाही याला कारणीभूत ठरू लागल्या आहेत. लग्नासाठी प्रयत्न करीत असतानाच वय उलटून जाते आणि पुन्हा वय जास्त आहे म्हणून लग्न जुळत नाहीत असे दुष्टचक्र सुरु झाले आहे.


लग्नच होत नसेल तर जगण्याचा काय अर्थ आहे ? लग्न होत नसल्यामुळे आपल्याला जगावेसे वाटत नाही अशा प्रकारचा विचार करून चाळीसगाव तालुक्यातील पिलखेडा गावाच्या, अवघ्या २४ वर्षे वयाच्या प्रशांत भगवान पाटील या तरुणाने आपल्या आयुष्याचा शेवट केला आणि विवाह जुळणे ही केवढी मोठी समस्या बनलेली आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित केले. प्रशांत हा शेतीचे काम करून उदरनिर्वाह चालवत होता. शेतकरी असल्यामुळे त्याचे लग्न जुळत नव्हते.अशा परिस्थित जगून तरी काय करायचे ? असा विचार त्याने नातेवाइकाजवळ बोलूनही दाखवले होते.  यामुळेच आलेल्या नैराश्यातून प्रशांत याने गिरणा नदी काठावरील एका झाडाला गळफास घेतला आणि आपल्या आयुष्याचा शेवट केला.  


याबाबत माहिती मिळताच नातेवाईक धावत गेले आणि प्रशांत यास तातडीने रुग्णालयात नेण्यात आले परंतू त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेने मोठी खळबळ उडाली आहेच पण हळहळ देखील व्यक्त होत आहे, (A young man ended his life for marriage) याबरोबरच तरुणांचे विवाह जुळणे ही एक मोठी समस्या बनून गेल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. अशा घटनामुळे तरुणांच्या कुटुंबात देखील चिंता व्यक्त होताना दिसत आहे. 

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !