शोध न्यूज : विजेची चोरी होणे काही नवे नाही पण, राज्याचे मुख्यमंत्री पद ज्यांनी भूषविले आहे ते देखील वीज चोर निघाल्याने अनेकांनी कपाळ बडवले असून कित्येकांचा तर या घटनेवरच विश्वास बसला नाही.
वीज चोरी मोठ्या प्रमाणात होत असते आणि वीज कंपन्या सतत या चोरांच्या मागे लागलेल्या असतात. मोठ्या प्रमाणात होत असलेल्या गळती आणि वीज चोरीमुळे वीज कंपनी सतत आर्थिक अडचणीत सापडत असते. प्रामाणिकपणे विजेचे बिल भरणाऱ्या ग्राहकांना मात्र याचा अकारण फटका बसत असतो. काही चोरी प्रकरणी कंपनीचे देखील काही कर्मचारी सामील असतात अशी चर्चा नेहमीच सुरु असते. सामान्य लोक विजेची चोरी करतात आणि विद्युत कंपनीचा तोटा करत असतात. हे सर्वांनाच माहित आहे पण, राज्याचे मुख्यमंत्री पदावर काम केलेल्या व्यक्तीने वीज चोरी केली असल्याचे सांगितले तर कुणाचा विश्वास बसणार नाही. पण ही घटना सत्य तर आहेच शिवाय, त्यांनी मोठ्या रकमेचा दंड देखील भरला आहे.
कर्नाटक राज्याचे माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांना वीज चोरी केल्याबद्धल दंड भरण्याची वेळ आली आहे. कुमारस्वामी यांनी आपल्या घरासाठी विजेची चोरी केल्याची धक्कादायक आणि मोठी बाब समोर आली आहे, त्यामुळे केवळ राज्यातच नव्हे तर अन्य राज्यातही याची मोठी चर्चा होऊ लागली आहे. विजेची चोरी करणारे हे केवळ माजी मुख्यमंत्रीच नव्हे तर ते, देशाचे माजी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे पुत्र देखील आहेत. वीज चोरी केल्याप्रकरणी त्यांना ६८ हजार ५२६ रुपयांचा दंड भरावा लागला आहे. कुमारस्वामी यांनी मात्र दंड वसूल करण्यात आलेल्या पद्धतीवर आक्षेप घेतला असून दंडाच्या रकमेची गणना चुकीच्या पद्धतीने केल्याचे म्हटले आहे.
वीज चोरीचे प्रकरण उघडकीस येताच कुमारस्वामी यांनी मोठा त्रागा करायला सुरुवात केली आहे. आपल्या संमतीशिवाय आपल्या घरासाठी वीज कंत्राटदाराने अशा प्रकारे वीज घेतली होती असे त्यांचे म्हणणे आहे. दिवाळीसाठी घरी करण्यात आलेल्या रोषणाईसाठी, आपल्या घरी काम करणाऱ्या कंत्राटदाराने केवळ टेस्टिंगसाठी अशा प्रकारे वीज घेतली होती असा कुमारस्वामी यांचा दावा आहे. शिवाय त्यांनी कॉंग्रेसकडे बोट दाखवत, आपण कॉंग्रेस विरोधात आवाज उठवल्यामुळे ही कारवाई करण्यात आली असल्याचे त्यांनी म्हटले आहे. चुकीच्या आणि बेकायदेशीर पद्धतीने वीज घेतल्याचे मात्र त्यांनी नाकारले नाही. वीज चोरी सापडली हे खरे असल्याने , इतर राजकीय पक्षाकडे बोट दाखविण्याच्या त्यांच्या कृतीचे देखील आश्चर्य व्यक्त होऊ लागले आहे. या घटनेने मात्र माजी मुख्यमंत्री यांची इभ्रत धोक्यात आली आहे.
या घटनेनंतर नागरिकात चर्चा होणे तर स्वाभाविक आहेच आणि राजकीय पक्ष तरी अशी संधी कशी सोडतील ? (Former Chief Minister electricity thief) माजी मुख्यमंत्र्यांचे घर दिवाळीत चोरीच्या विजेने उजळले होते, त्यांच्या गरिबीमुळे त्यांच्यावर वीज चोरण्याची वेळ आली ही शोकांतिका आहे असा टोला कॉंग्रेसने लगावला आहे. 'वीजचोर कुमारस्वामी' असे पोस्टर देखील लावण्यात आले आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !