शोध न्यूज : सोलापूर जिल्ह्यात उजनीचा कालवा फुटून शेतकऱ्यांच्या पिकात पाणी घुसले असून यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. आधीच संकटात असलेला शेतकरी यामुळे पुन्हा अडचणीत आला असून नुकसान भरपाई देण्याचीही मागणी होऊ लागली आहे.
हवामान बदलाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत असून विविध संकटातून शेतकरी उभा राहण्याचा प्रयत्न करीत असतानाच आता कालव्याला भगदाड पडून उभ्या पिकात पाणी घुसले आहे त्यामुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होताना दिसू लागले आहे. शेतकरी बांधवांच्या पिकांना पाणी मिळावे म्हणून नुकतेच उजनी कालव्यातून पाणी सोडण्यात आले आहे परंतु या कालव्यानेच मोठा दणका दिला आहे. पहाटेच्या वेळेस मोहोळ तालुक्याच्या हद्दीत कालवा फुटल्याने कालव्यातील पाणी वाट मिळेल तसे शेतकऱ्यांच्या पिकात आणि शेतात घुसले आहे. या घटनेमुळे शेतकरी बांधवांचे मोठे नुकसान होताना समोर दिसू लागले आहे. उजनी कालवा किमी ११२ मध्ये ४५ फाट्याच्या पुढे मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावाच्या हद्दीत ओढ्याजवळ पहाटेच्या दरम्यान कालव्याला हे भगदाड पडले आहे.
कालव्याला भगदाड पडल्याने आणि धरणातून कालव्यात पाणी सोडण्यात आलेले असल्याने प्रवाहित कालव्यातून हे पाणी वाट मिळेल तसे शेतातून, पिकातून धावत सुटले आहे. यामुळे शेकडो एकर क्षेत्रात पाणीच पाणी झाले आहे. उभ्या पिकात पाणी घुसले असून यामुळे मोठे नुकसान होताना दिसत आहे. विहिरींचेही मोठे नुकसान समोर येत असून काढणीला आलेल्या द्राक्ष बागा देखील मोठ्या संकटात सापडल्या आहेत. पाण्याच्या वेगाने अनेक विद्युत मोटारी देखील वाहून गेल्या असल्याची माहिती शेतकरी देत आहेत. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात सुरू असून यामुळे उभ्या उसातून मातीसह पाणी मोठ्या प्रमाणात वाहत असल्याने ऊस शेतीचेही मोठे नुकसान झाले असल्याचे चित्र दिसू लागले आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा चिंतेत आला असून नुकसानीची मोठी धास्ती त्याला लागली आहे.
कालवा फुटीला जबाबदार कोण ? शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी कुणाची ? कालवा फुटेपर्यंत पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी काय करीत होते ? रात्री कालव्याकडे कुणाचे लक्ष नव्हते काय ? असे अनेक प्रश्न संतप्त शेतकरी विचारू लागले असून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावेत आणि नुकसान भरपाई तत्काळ मिळावी अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी करू लागले आहेत. (Ujni canal burst in Solapur district! loss to farmers) शेतकऱ्यांच्या शेतात आणि पिकात केवळ पाणी आणि पाणीच दिसत असून ही विदारक परिस्थिती पाहून शेतकरी अस्वस्थ आणि चिंताग्रस्त झाला आहे. कष्टाने वाढवलेले पीक उजनीच्या पाण्यात आणि कुणाच्या तरी बेफिकीरीत उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !