शोध न्यूज : अंत्यसंस्कारासाठी चालविलेला तरुण तिरडीवरून उठून बसला आणि राज्यभर चर्चेचा विषय बनला परंतु अखेर यातील सत्य समोर आले तेंव्हा सगळ्यांनीच कपाळावर हात मारून घेतला.
काल अकोल्यातील पातुर तालुक्यातील एक घटना अनेकांना बुचकळ्यात पाडून गेली होती. विवरा येथील एक तरुण मृत्युमुखी पडला त्यामुळे शोक व्यक्त करण्यात येत होता. नातेवाईक आक्रोश करू लागले होते तर मयत प्रशांत मेसरे या युवकाच्या मित्रांनी 'मिस यु प्रशांत' चे स्टेटस ठेवले होते. तिरडीवर घालून त्याला अंत्यसंस्कारासाठी नेले जात असताना तो चक्क तिरडीवरून उठून बसला आणि हा एक मोठा कथित चमत्कार लोकांना आपल्या डोळ्यांनी पाहायला मिळाला. बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि या तरुणाला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी उसळली. गर्दी एवढी वाढली की ती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना पाचारण करावे लागले. कुणी याला काळी जादू म्हणू लागले तर कुणाला हा चमत्कार वाटू लागला. अवघ्या महाराष्ट्रात या घटनेची चर्चाही झाली. प्रसारमाध्यमातून देखील या तरुणाची घटना दाखवली गेली.
तिरडीवरील तरुण जिवंत कसा झाला ? तो खरोखरच मृत झाला होता का ? अशा प्रकारचे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. विज्ञान युगात अशा विषयाला देखील एक वेगळे महत्व प्राप्त झाले होते. वैज्ञानिक दृष्टी असलेल्या कुणालाही मात्र ही घटना मान्य नव्हती. एक तर या तरुणाचा मृत्यू झालेलाच नसताना तसा गैरसमज करून घेतला असावा अशी शक्यता अधिक होती. डॉक्टरांनी मृत म्हणून घोषित केलेले अनेकजण स्मशानात नेल्यावरही हालचाल करताना यापूर्वी दिसून आले आहेत. तरीही अंधश्रद्धाळू लोकांचा या घटनेवर विश्वास बसला आणि एक चमत्कार म्हणून याकडे पाहू लागले.प्रत्यक्षात मात्र वेगळेच घडले होते आणि ते जेंव्हा समोर आली तेंव्हा अनेकांची बोलती बंद झाली आणि मती गुंग झाली.
प्रशांत या तरुणाचा मृत्यू झालेलाच नव्हता तर हे एक एका भोंदू, ढोंगी बाबाने रचलेले मोठे कारस्थान होते याचा उलगडा झाला. आपले महत्व वाढविण्यासाठी ढोंगी बाबाने रचलेला हा एक डाव होता हे उघडकीस आले. प्रशांत मेसरे या तरुणाचा मृत्यू झाला असल्याचे सांगत गावातून अंत्ययात्रा काढण्यात आली होती. अंत्ययात्रा सुरु असताना एका ढोंगी बुवाने 'आपण या तरुणाला जिवंत करू शकतो' असा दावा केला. अंत्यसंस्कार करण्यासाठी नेले जात असताना मृताला जिवंत करण्याचा दावा केला गेल्याने सगळेच आश्चर्यात पडले होते. अखेर या ढोंगी बुवाने मयत तरुणाला जिवंत केले आणि गाव आश्चर्याने पाहू लागले. साहजिकच या ढोंगी बाबाचे महत्व प्रचंड वाढले आणि या बाबाजवळ असलेल्या कथित शक्तीचा प्रत्यय लोकांनी आपल्या डोळ्यांनी पहिला.
या प्रकरणाची अधिक चौकशी झाली तेंव्हा सगळेच बिंग फुटले. प्रत्यक्षात हा तरुण मृत्युमुखी पडलेलाच नव्हता. ढोंगी बाबाने रचलेले हे कुभांड होते. असा प्रकार करून आपले महत्व वाढविण्यासाठी त्याने हा 'उद्योग' केला होता. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेवून चौकशी सुरु केली होती शिवाय त्याच्या कुटुंबाचे जबाब देखील पोलिसांनी नोंदले होते. (The dead youth came alive and the truth came out) सगळा प्रकार हा ढोंगी बाबाचा असल्याचे चौकशीत समोर आले आणि पोलिसांनी गणेश महाराज गोरले या मांत्रिकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला. शिवाय असे प्रकार पुन्हा घडू नयेत म्हणून पोलिसांनी अशा भोंदुगिरीवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन देखील केले आहे. सत्य जेंव्हा समोर आले तेंव्हा लोक तोंडात बोट घालून केवळ पहात राहिले होते.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !