शोध न्यूज : ऊसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचे टायर फोडणे वेगळ्याच वळणावर पोहोचले असून या प्रकरणी संबंधितांवर लुटमारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान मध्यरात्रीनंतर आंदोलन अधिक तीव्र झाल्याचे दिसत आहे.
सोलापूर जिल्ह्यात ऊस दर संघर्ष समिती आणि साखर कारखाने यांच्यात दराबाबत आंदोलन सुरु झाले असून आता या आंदोलनाने वेगळे वळण घेतले असल्याचे दिसत आहे. आंदोलनावर वेळीच तोडगा नाही निघाला तर हे आंदोलन अधिकच चिघळण्याची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पंढरपूर येथे घेण्यात आलेल्या ऊस परिषदेत संघर्ष समितीने विविध मागण्या केल्या आहेत. पहिली उचल अडीच हजार देण्यात यावी आणि अंतिम दर हा ३ हजार १०० रुपयांचा देण्यात यावा अशी मागणी संघर्ष समितीने केलेली आहे. दोन दिवसात मागणीप्रमाणे कारखान्यांनी जाहीर न केल्यास आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरु होण्याचा इशारा परिषदेत देण्यात आला होता. त्यानंतर उसाच्या फडात जाऊन समिती कार्यकर्त्यांनी उसाची तोड बंद पाडली. त्यानंतर उसाची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालक मालकांना हात जोडून, पाय धरून वाहतूक बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले.
विनंती करूनही ऊसाची वाहतूक ट्रॅक्टर चालकांनी सुरु ठेवली त्यामुळे आंदोलन वेगळ्या वळणावर गेले. वाखरी येथील बाजीराव विहिरीजवळ एका ट्रॅक्टरचे बारा टायर फोडून टाकण्यात आले. या घटनेननंतर ट्रॅक्टर चालकाच्या काहीशी दहशत निर्माण झाली पण टायर फोडणाऱ्या संबंधितांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील बोधर्डे येथील समाधान सुरेश पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. हा गुन्हा विविध कलमान्वये दाखल करण्यात आला असून यात लूटमार केल्याच्या देखील एका कलमाचा समावेश आहे.
आपण ऊस घेऊन पांडुरंग कारखान्याकडे निघालो असताना वाखरीजवळ ट्रॅक्टर व्हायबल होऊ लागला त्यामुळे टायर पंक्चर झाला असल्याचे वाटले. ट्रॅक्टर बाजूला घेत असताना पाठीमागील बाजूने एक जण स्प्लेंडर गाडीवरून आला आणि त्याने काही घोषणा दिल्या. उजव्या बाजूनेही दोघे पळत आले आणि त्यांनी देखील ऊस दर वाढीबाबत घोषणा दिल्या. त्यांच्या हातात बर्चीसारखे हत्यार होते आणि ते ट्रॅक्टरचे टायर फोडत आले होते. आपण खाली उतरत असतानाच आपल्याला चापट मारण्यात आली आणि आपल्या खिशातील एक हजार रुपये त्यांनी काढून घेतले. असे या फिर्यादीत म्हटले आहे.
खिशातून पैसे काढून घेतल्यानंतर आपल्याला शिव्या दिल्या आणि येथे थांबायचे नाही, दरवाढ मिळेपर्यंत ट्रॅक्टर चालवायचा नाही असे म्हणून ते निघून गेले. ट्रॅक्टरचे मोठे दोन आणि बाजूचा एक टायर तसेच ट्रॉलीचे आठ टायर फोडण्यात आले असून त्यामुळे आपले अडीच लाखांचे नुकसान झाले आहे अशी फिर्याद ट्रॅक्टर चालकाने दिली असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (A case of robbery has also been registered against sugarcane protesters) यात लूटमार केल्याच्या कलमाचा समावेश करण्यात आला आहे. भारतीय दंड संहिता १९६८ चे कलम ३४, ३४१,३९२, ४२७, ५०४, ५०६ यांचा यात गुन्ह्यात अंतर्भाव आहे.
आंदोलन तीव्र !
मध्यरात्रीच्या नंतर ऊस दर संघर्ष समितीचे आंदोलन अधिक तीव्र झाले असून विविध रस्त्यावरील ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर जागीच थांबले आहेत. वाखरीजवळ टायर फोडण्याची घटना घडल्यापासूनच हे आंदोलन भडक होताना दिसत होते परंतु आता त्याची तीव्रता वाढू लागली आहे. मंगळवेढा- पंढरपूर मार्गावरील ऊस वाहतूक देखील रोखली गेली असून टायरमधील हवा सोडून दिली जात आहे. बहुतांश ऊस तोड बंद पाडण्यात आली असल्यामुळे गाळप प्रक्रियेत मोठा व्यत्यय येऊ लागला आहे. जिल्हाधिकारी लवकरच समन्वय घडविणार असल्याची माहिती आहे.
अधिक बातम्यांसाठी येथे क्लिक करा !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपल्या प्रतीसादाबद्धल धन्यवाद !